Skip to main content
x

राजोपाध्ये, वसंत यशवंत

प्रामुख्याने संगीत शिक्षक असलेले, तसेच संगीत संबंधित पुस्तकांचे लिखाण केलेल्या वसंत यशवंत राजोपाध्ये यांचे वडील विद्वान व संगीतप्रेमी होते. वसंत  राजोपाध्येंना लहानपणापासूनच संगीताबद्दल आकर्षण होते. मॅट्रिक झाल्यानंतर १९३६ पासून ग्वालियर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. नारायण व्यास यांच्याकडे त्यांनी गाणे शिकण्यास सुरुवात केली. गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीत प्रवीण’ ही परीक्षा ते उत्तीर्ण झाले.
राजोपाध्ये १९४८ पासून अ.भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाचे कार्यवाह व नंतर अध्यक्ष झाले. काश्मीर शासनाच्या ‘म्युझिक अ‍ॅण्ड फाइन आर्ट्स’ या संस्थेत १९६७ ते १९७२ पर्यंत संस्थाप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. ‘व्यास संगीत विद्यालया’त संस्थापक म्हणून त्यांचा मोठा वाटा होता व नंतर ते याच विद्यालयाचे प्रमुख झाले. ‘संगीत कला विहार’ या संगीतविषयक मासिकाचेही ते सह-संस्थापक होते. संगीतातील परीक्षार्थींकरिता सहज समजावे असे लिखाण त्यांनी आपल्या पुस्तकांतून केले आहे. ‘संगीतशास्त्र’ हे संगीतशास्त्रावरील विद्यार्थ्यांना समजेल असे आटोपशीर लेखन असलेले पुस्तक; याबरोबरच ‘घर का रियाज’ हे पुस्तकही प्रसिद्ध झाले.
केसरबाई केरकर, बडे गुलाम अली, पं. विष्णू दिगंबर पलुसकर, वि.ना.भातखंडे इत्यादी अनेक गायक, गायिका, संगीतकार यांची व्यक्तिचित्रेही त्यांनी आपल्या लेखनातून साकारली आहेत. ‘काही वैशिष्ट्ये ग्वालियर गायकीची,’ ‘संगीतातून जीवनदर्शन’, ‘कव्वालीचे मूळ भारतीयच’, ‘स्त्रिया आणि संगीत’ अशा संगीताशी संबंधित विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. काही गायक-गायिकांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या. ग्वालियर घराणा संगीत संमेलनाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तसेच श्री. ना.दा.ठाकरसी या विद्यापीठाचे ते ‘गव्हर्नर्स नॉमिनी’ होते. संगीत रिसर्च अकॅडमी, कलकत्ता; अब्दुल हलीम अकादमी, मुंबई; स्वर साधना समिती इत्यादी संस्थांतर्फे राजोपाध्ये यांच्या संगीतसेवेबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

माधव इमारते

राजोपाध्ये, वसंत यशवंत