Skip to main content
x

रानडे, गणेश हरी

णेश हरी रानडे यांचा जन्म सांगलीला झाला. त्यांनी मराठी साहित्य आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांत अभ्यास केला, तसेच ते विज्ञानाचे पदवीधरही (बी.एस्सी.) होते. सांगलीच्या विलिंग्टन महाविद्यालयामध्ये व १९४० नंतर १९५८ पर्यंत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये त्यांनी भौतिकशास्त्र या विषयाचे अध्यापक म्हणून काम केले.

पं.गणपतीबुवा भिलवडीकर व नंतर पं. गुंडोबुवा इंगळे यांच्याकडून गणेश रानडे यांना ग्वालियर घराण्याची तालीम मिळाली. गायनाबरोबरच संगीतशास्त्रातही ते पारंगत होते. मुंबई सरकारच्या ‘संगीत शिक्षण समिती’च्या सचिवपदी त्यांची नेमणूक झाली होती. यामुळे त्यांना तत्कालीन सांगीतिक शैक्षणिक स्थितीचा वेध घेता आला. यातूनच त्यांच्याकडून ‘हिंदुस्थानी म्युझिक’ (अ‍ॅन आउटलाइन ऑफ इट्स फिजिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्थेटिक्स) या इंग्रजी पुस्तकाचे लिखाण झाले. मुंबई विद्यापीठातर्फे या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनार्थ अर्थसाहाय्य लाभले होते. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती १९५२ मध्ये निघाली. या पुस्तकाचे स्वागत भारतात इतरत्रही झाले. विविध संगीत विद्यालयांच्या पाठ्यक्रमांतही हे पुस्तक लावले गेले होते.

संगीत आणि भौतिकशास्त्र व सौंदर्यशास्त्र यांची संगती लावून भारतीय संगीतातील अनेक घटकांवर यात प्रकाश टाकलेला दिसतो. भारतीय संगीताचा ऐतिहासिक आढावा, संगीतोपयोगी ध्वनी, संगीत सप्तकाचे उगमस्थान, वैदिक श्लोकगायन व मंत्रोच्चार, सामगान, रसचर्चा, वृत्त-छंद, लोकसंगीत इत्यादी विषयांचा यात समावेश आहे.त्यांची १९५१ मध्ये अखिल भारतीय सांस्कृतिक अधिवेशनात संगीत विभागाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांना १९५५ मध्ये युनेस्को म्युझिक कॉन्फरन्सला (मनिला, फिलिपाइन्स) भारतीय सरकारतर्फे पाठविण्यात आले. संगीत नाटक अकादमीशीही त्यांचा संबंध होता. आकाशवाणीवरून गणेश रानडे यांचे संगीतविषयक भाषण प्रसारित झाले होते, तसेच संगीतासंबंधी त्यांचे अनेक लेख विविध मासिकांतूनही प्रकाशित झाले होते. त्यांनी ‘संगीताचे आत्मचरित्र’ हे पुस्तक लिहिले. तसेच ‘म्युझिक इन महाराष्ट्र’ हा त्यांचा ग्रंथ महाराष्ट्र सरकारने १९६७ साली प्रकाशित केला. त्यांचे पुण्यात निधन झाले.

— माधव इमारते

रानडे, गणेश हरी