Skip to main content
x

रानडे, जनार्दन लक्ष्मण

राठी भावगीत गायनाच्या वाटचालीतले अगदी आरंभीच्या काळातील अध्वर्यू गायक जे.एल. तथा जनार्दन लक्ष्मण रानडे यांचा जन्म आजोळी, इचलकरंजी येथे झाला. त्यांचे आजोबा कीर्तनकार दातार यांच्याकडून त्यांना संगीताचा वारसा लाभला. रानड्यांचे वडील सांगली संस्थानात उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) होते. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सांगलीच्या सिटी विद्यालय व विलिंग्डन महाविद्यालय येथे इंटरपर्यंत झाले. शालेय कार्यक्रमांत, गणपती उत्सवांतील मेळ्यांत या बालकलाकारातील चमक दिसू लागली. त्यांचे संगीताचे प्रारंभिक शिक्षण सांगलीस मोरूबुवा गोंधळी व गोडबोले या दोघांकडे झाले. शालेय वयातच त्यांनी पं. भातखंड्यांचे संगीतशास्त्र विषयक ग्रंथ वाचले होते व संगीत संशोधन करणार्‍या देवल आणि क्लेमेंट्स यांच्याशीही त्यांनी ओळख करून घेतली होती.
वडील, आई व आजी यांचे अनुक्रमे १९११,१९२१ व १९२४ साली निधन झाले आणि कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडल्याने संगीताची रुची व गती असूनही, त्या काळी संगीतास सामाजिक प्रतिष्ठा फारशी नसल्याने जनार्दन रानडे यांना नोकरी पत्करावी लागली. रावसाहेब देवलांच्या शिफारसीने त्यांना क्लेमेंट्स यांनी १९२८ साली जिल्हा न्यायालयात लेखापालाची नोकरी दिली व सांगली सोडून ते अहमदनगर येथे गेले. न्यायालयाच्या रूक्ष वातावरणातही क्लेमेंट्स यांनी रानडे यांच्या संगीताभिरुचीस उत्तेजन दिले, त्यांना हार्मोनिअमची स्वरजुळणी शिकवली. नगर (१९२८ ते १९४९), कोल्हापूर (१९४९ ते १९५३), पुणे (१९५३ ते १९५८) या ठिकाणी त्यांच्या बदल्या झाल्या व १९५८ साली ते न्यायालयातून शिरस्तेदाराच्या पदावरून निवृत्त झाले.
नोकरीच्या कालखंडात नगरहून दर शनिवारी-रविवारी पुण्यास जाऊन ते पं.विनायकराव पटवर्धन यांच्याकडून ग्वाल्हेर गायकी शिकले. त्यांनी जगन्नाथबुवा पुरोहित व हिराबाई बडोदेकर यांचेही मार्गदर्शन घेतले होते. जी.एन. जोशी व पंडितराव नगरकर यांसारखे गायक रागसंगीतासह भावपदे गाऊ लागले होते व रानडे यांनीही याच मार्गाने जाण्याचे ठरवले. कोल्हापूरला बालगंधर्व व गोविंदराव टेंबे यांना त्यांनी आपले गायन ऐकवले आणि या दोघांच्या शिफारसपत्राने रानड्यांसाठी मुंबई आकाशवाणी व एच.एम.व्ही.कंपनीचे द्वार उघडले. त्यांनी १९३३ मध्ये आकाशवाणीवर आपला प्रथम कार्यक्रम दिला व पुढे सुमारे ५० वर्षे ते आकाशवाणीसाठी गात होते.
त्यांचा १९३२ ते १९५२ हा सांगीतिकदृष्ट्या अत्यंत बहराचा काळ होता. या काळात नाट्यसंगीताची पीछेहाट सुरू होऊन भावगीत व चित्रपटगीत हे दोन नवे प्रकार मराठी रसिकांस खुणावत होते. भावगीत गायनाचा हा नवा प्रकार रानडे यांनी आपल्या गाण्यातून रुजवला. रानडे आपल्या मैफलीत एखादी रागदारी बंदिश, ठुमरी, नाट्यगीत, भावगीते, भजने गात. त्यांची ख्यालगायनाची तयारी विशेष नसली तरी गाणे रंजक, चटकन मोहवणारे, भावपूर्ण, तरीही तयारीचे असे. स.अ. शुक्ल, बाबूराव गोखले, ग.दि. माडगूळकर, दीक्षित यांसारख्या कवींची पदे ते स्वत: चाली लावून गात असत. ‘मराठी भाषेतील रागाधिष्ठित, विस्तारक्षम बंदिशीसारखी गीते’ असे त्यांच्या भावगीतांचे स्वरूप होते. भावगीताच्या या बाल्यावस्थेत त्यावर अर्थातच तत्कालीन कलासंगीत व नाट्यसंगीताचा प्रभाव असल्याने रानड्यांच्या भावगीत गायनात भावतत्त्वापेक्षा रागतत्त्वावर भर होता. रानडे पदे गाताना मनात त्याचा संपूर्ण आराखडा ठेवत असल्याने गीतांना बंदिस्त मोहकपणा येई. ध्वनिवर्धकाला अतिशय अनुकूल, स्वच्छ, सुरेल आवाज, सुस्पष्ट व माधुर्यपूर्ण शब्दोच्चार, स्वरोच्चारांतील सूचक विरामचिन्हे, संयत आलाप, लडीदार ताना, खटके, मुरकी इ. अलंकारांचे कोरीव काम, नेमके उच्चार, पल्लेदार ताना, तानांच्या तिहाया, ढंगदारपणा या गुणांमुळे त्यांचे भावगीत अल्पावधीतच तत्कालीन मराठी रसिकवर्गात, खास करून युवक वर्गात प्रिय ठरू लागले.
एच.एम.व्ही. कंपनीने त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका जुलै १९३४ मध्ये काढली. स.अ. शुक्ल या कवींची ‘कलिका गोड नाचे’, ‘नभी हसली चंद्रिका’, ‘कुणी काय जादू केली’ ही त्यांची काही पहिली गाजलेली गीते होत. एच.एम.व्ही.ने १९३४ ते १९५२ या अठरा वर्षांत त्यांच्या सुमारे ८० मराठी भावगीते, हिंदी बंदिशी, पदांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केल्या. गौडमल्हार, नंद, शुद्धसारंग, कल्याण, सूरमल्हार, बिलावल, तोडी, मालकंस, बिहाग, बागेश्री, भीमपलास, पटदीप, खंबावती, पूरिया, मारुबिहाग हे राग, तसेच ‘राम की महिमा अपरंपार’सारखी हिंदी भजनेही त्यांनी ध्वनिमुद्रिकांसाठी गायली. त्यांची मराठी भावपदे साधारणत: काफी, खमाज, पिलू, तिलंग, देस, तिलक कामोद, पहाडी भैरवी या रागांत आहेत; मात्र काही वेगळ्या वा त्या काळी अप्रचलित असणार्‍या रागांतही त्यांनी ‘चांद हसरा पुनवेचा’ (मधुवंती), ‘पायी पैंजण वाजती’ (पूरिया कल्याण), ‘नाजूक कुणी ललना’ (मुलतानी) अशी पदे गायली. प्राय: ते स्वत:च गीतांस चाल लावून गात, मात्र क्वचित ‘हासत ये’ (श्रीधर पार्सेकर), ‘सांग पोरी सांग’ (दत्ता वाळवेकर) अशी गीते अन्य संगीतकारांसाठीही गात.
या ध्वनिमुद्रिकांमुळे जनार्दन रानडे हे महाराष्ट्रातच नव्हे, तर पूर्ण भारत, आफ्रिका व आशियाई देशांत रसिकप्रिय गायक ठरले. ‘अति गोड गोड ललकारी’ या गीताच्या तर ५००० ध्वनिमुद्रिका खपल्या व एच.एम.व्ही.ने त्यांचा खास सत्कार केला. रानडे यांनी तीन मिनिटांच्या ध्वनिमुद्रिकेनुसार कमी वेळात, पण रंजक वाटेल असा आपला एक गाण्याचा साचा तयार केला व तो अत्यंत यशस्वी ठरला होता. त्यामुळे एच.एम.व्ही. नवोदित गायकांस ध्वनिमुद्रिकेसाठी असे साचेबंद गाण्याचे तंत्र शिकवण्यास त्यांना कधीकधी पाचारण करत असे व याद्वारे त्यांनी मल्लिकार्जुन मन्सूर, सुधीर फडके इ. कलाकारांस ध्वनिमुद्रिकेसाठी कसे गावे याचे प्रशिक्षणही दिले होते !
रानडे यांनी १९५८ ते १९६० अशी दोन वर्षे गारगोटी येथे मौनी विद्यापीठात लेखापालाची नोकरी केली. यानंतर १९६० ते १९८० अशी वीस वर्षे ते वर्धा येथील महिला आश्रमात संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते १९८० नंतर सांगलीस परतले व आपल्या ‘ललकारी’ या निवासस्थानी त्यांनी संगीत विद्यालय सुरू केले. तेथे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे परीक्षा केंद्र सुरू केले, ज्याद्वारे अनेक विद्यार्थ्यांस ते मार्गदर्शन करत, विशेषत: परीक्षांची तयारी अत्यंत उत्तम रितीने करून घेत. रानडे १९६१ ते १९९६ अशा दीर्घ काळासाठी अ.भा.गां.म.वि. मंडळाचे परीक्षक व मार्गदर्शक होते. १९८२ साली कर्नाटक विद्यापीठाच्या संगीत विभागाने त्यांना पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केले होते.
जाहीर जलसे, खाजगी मैफलींसह आकाशवाणीच्या दिल्ली, हैदराबाद, मुंबई, पुणे, सांगली, औरंगाबाद, नागपूर इ. अनेक केंद्रांवरून रानडे यांनी रागदारी व भावगीते दोन्हींचे असंख्य कार्यक्रम केले. पुणे केंद्रावरून डिसेंबर १९८६ मध्ये त्यांनी स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतली. वयाच्या नव्वदाव्या वर्षी आद्य मराठी नाट्यकार विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाच्या दीडशेव्या वर्षानिमित्त या नाटकास, तसेच कालिदासाच्या ‘मालविकाग्निमित्रम्’ या संस्कृत नाटकास त्यांनी सांगली आकाशवाणीसाठी संगीत दिले.
रानडे १९९२ साली पुण्यातील वृद्धाश्रमात दाखल झाले. ब्याण्णवाव्या वर्षापर्यंत ते गायन, मार्गदर्शन, मुलाखती इ.उपक्रमांत सुदृढतेने कार्यरत होते. निवारा वृद्धाश्रमात त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची १९७१ साली मुंबई दूरदर्शनवर ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या कार्यक्रमात जी.एन. जोशी यांनी मुलाखत घेतली होती. पुणे आकाशवाणीतही बबनराव नावडीकर व श्रीरंग संगोराम यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मुंबईत ३ जून १९९५ रोजी इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स असोसिएशन या संस्थेने सुधीर फडके, स्नेहल भाटकर, अशोक रानडे, यशवंत देव यांच्या उपस्थितीत या ‘भावगीताच्या भीष्माचार्यां’चा विशेष सत्कार केला होता.

चैतन्य कुंटे

रानडे, जनार्दन लक्ष्मण