Skip to main content
x

राणे, सरस्वती सुंदर

रस्वती सुंदरराव राणे या अब्दुल करीम खाँ व ताराबाई माने यांच्या कन्या व सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकरांची धाकटी बहीण होत. त्यांचा मिरजेला जन्म झाला. सकीना हे त्यांचे आधीचे नाव व घरातले लाडके नाव ‘छोटूताई’. त्यांचा विवाह सुंदर राणे यांच्याशी झाल्यावर त्या सरस्वती राणे या नावाने सुपरिचित झाल्या.

सरस्वती राणे त्यांचे गाण्यातले पहिले शिक्षण हिराबाईंकडे झाले. जयपूर घराण्याचे नत्थन खाँ, ग्वाल्हेर घराण्याचे बी.आर.देवधर यांच्याकडूनही त्या शिकल्या.

‘नूतन संगीत नाटक मंडळी’च्या संगीत नाटकात त्यांनी कामे केली. ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’तील त्यांच्या भूमिका व ‘ललना मना’ सारखी पदे गाजली. सुरुवातीला ‘ओडियन’ कंपनीने त्यांचे शास्त्रीय व सुगम संगीताचे ध्वनिमुद्रण प्रसिद्ध केले. त्यात बंदिशी, मराठी भावगीते, हिंदी भजने होती. यांतलीच काही गीते पुढे कोलंबिया, यंग इंडिया यांनी परत प्रसिद्ध केली.

बोलपटांच्या आरंभीच्या दोन दशकांत (१९३०-४०) हिंदी आणि मराठी सिनेमांसाठी अण्णासाहेब माईणकर, दादा चांदेकर, शंकरराव व्यास, के.सी.डे, सुधीर फडके, सी. रामचंद्र इ.अनेक संगीत दिग्दर्शकांसाठी सरस्वती राणे यांनी पार्श्वगायन केले. ‘पायाची दासी’, ‘पैसा बोलतो आहे’, ‘भरतभेट’, ‘सरगम’, ‘शहेनशहा अकबर’ ही त्यांतील काही चित्रपटांची ठळक नावे. आचार्य अत्र्यांच्या बर्‍याच चित्रपटांतून त्या गायिल्या आहेत. ‘अंगणात फुलल्या जाई जुई’ हे त्यांचे गाणे खूप गाजले. ‘रामराज्य’मधील ‘बीना मधुर मधुर कछु बोल’ हे त्यांचे सर्वांत गाजलेले गीत होय. त्यांचे नाव तेव्हा भारतभर झाले. स.अ. शुक्लांनी याच चालीवर लिहिलेले मराठी भावगीत ‘मैना मधुर मधुर वच बोल’ हेही त्यांनी गायले.

 पार्श्वगायन ही पद्धत जेव्हा नवीन होती, त्या काळात सरस्वतीबाईंच्या सुरेलपणामुळे त्यांनी अनेक बोलपटांत प्रभावी, उत्तम पार्श्वगायन केले. त्या काळात सरस्वतीबाई पार्श्वगायनात आघाडीच्या गायिका होत्या. नंतर १९७० मध्ये श्याम बेनेगलांच्या ‘भूमिका’ सिनेमात नात मीना फातर्पेकरांबरोबर त्यांनी शुद्ध कल्याणची बंदिश गायिली. त्यांचे रागदारी, भावगीत, चित्रपटगीत अशा सर्व प्रकारांचे ध्वनिमुद्रण निघाले आणि गाजलेही. ग.दि. माडगूळकर व सुधीर फडके यांचे ‘घनश्याम नयनी आला’ हे सरस्वतीबाईंनी अप्रतिम गायिलेले गीत प्रचंड गाजले.

अतिशय मधुर, सुरेल आवाज, स्वच्छ तान, गोलाई असलेले शब्दोच्चार ही त्यांची खास वैशिष्ट्ये होत. अजून एक विशेष म्हणजे हिराबाई बडोदेकर व त्यांची जुगलबंदी ही होय. ज्या काळात फक्त पुरुष कलाकार जुगलबंदी करायचे, त्या काळात गायिकांची जुगलबंदी या दोघींनी सुरू करून एक नवा पायंडाच पाडला. अत्यंत प्रभावी गायनाने ही जुगलबंदी हमखास रंगे असे उल्लेख मिळतात. त्यांच्या सहगायनाची ध्वनिमुद्रिकाही एच.एम.व्ही.ने काढली होती. त्यांच्या सहगायनाच्या १९६५ ते १९८० या काळात अनेक मैफली झाल्या.

त्या १९३३ पासून आकाशवाणीवर गाऊ लागल्या व आकाशवाणीच्या संगीत संमेलनांत, साखळी प्रसारण कार्यक्रमांत त्यांनी पेशावर ते कन्याकुमारी अशा भारतभर मैफली केल्या. त्यांचे गणेशोत्सवातही गावोगावी कार्यक्रम होत असत. सवाई गंधर्व संगीत महोत्सवातही त्यांचा सहभाग ठरलेला असे. बी.आर. देवधरांचा चंद्रकंस राग सरस्वतीबाईंनी पहिल्यांदा पेश केला. पहिल्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील कार्यक्रमात, तसेच पहिल्या महाराष्ट्र दिनी शिवनेरीवर झालेल्या विशेष कार्यक्रमात त्यांना गाण्याचा बहुमान मिळाला. गायन दर्जेदार असतानाच त्यांनी सत्तराव्या वर्षी मैफली गायनातून निवृत्ती घेतली हे विशेष होय.

साधारण १९५०-५५ नंतर त्यांनी विद्यादानाला वाहून घेतले. मीना जोशी, मीरा पणशीकर आणि नात मीना फातर्पेकर अशा शिष्या तयार केल्या. त्यांचे त्र्याण्णवाव्या वर्षी पुण्यात निधन झाले. त्यांना ‘बालगंधर्व’ पुरस्कार (महाराष्ट्र शासन, १९६६), ‘जीवन गौरव’ पुरस्कार (कोलकात्याच्या आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमीतर्फे, १९९१ मध्ये मुंबई व २००६ मध्ये दिल्ली येथे), ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार, उ. फैजाझ अहमद खाँ स्मृती ट्रस्टचा ‘किराणा घराणा सन्मान’ (१९९९)  देऊन गौरविण्यात आले.

        — डॉ. शुभदा कुलकर्णी

राणे, सरस्वती सुंदर