Skip to main content
x

राणे, विजयकुमार जनार्दन

         विजयकुमार जनार्दन राणे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागातून उपसचिव होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीचे सचिव म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबतही काम केले होते. विजयकुमार यांच्या आईचे नाव अनसुया असे होते.

१९४७ मध्ये विजयकुमार राणे यांनी मुंबई येथील विल्सन हायस्कूल मधून मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. राणे यांनी मुंबई येथील व्ही.जे.आय.टी. (सध्याचे वीरमाता जीजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट) मधून १९५२ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. १९५३ मध्ये ते भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले. बडोदा येथील रेल्वे स्टाफ कॉलेजमधील प्रशिक्षणानंतर १९५५ मध्ये ते पश्‍चिम रेल्वेमध्ये मुंबई येथे रुजू झाले. १९५५ ते १९९० या कारकिर्दीत त्यांनी पश्‍चिम रेल्वे, उत्तर सीमान्त रेल्वे, दक्षिण-पूर्व रेल्वे, मुंबई मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट रेल्वे, रेल्वे स्टाफ कॉलेज अशा विविध विभागात काम केले. साहायक अभियंता ते मुख्य अभियंता अशी पदोन्नत्ती घेत त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये सर्वेक्षण बांधकाम, रेल्वे व्यवस्थेचे नियोजन अशा जबाबदाऱ्या पार पडल्या. १९६० ते १९६३ या कालावधीत राणे उत्तर सीमान्त रेल्वेमध्ये कार्यरत होते. या कार्यकालात हिमालयाच्या पायथ्याशी, ब्रह्मपुत्रानदीच्या तीरावर तसेच अरुणाचल प्रदेशमध्ये रेल्वेमार्ग बांधकामाची जबाबदारी त्यांच्यावर होती. इराक येथे बांधण्यात आलेल्या स्टॅण्डर्ड गेज ६००कि.मी. लांब रेल्वेमार्गाच्या व्यावसायिक तंत्रज्ञ अभ्यासगटाचे नेतृत्त्व त्यांनी केले.

१९७२ मध्ये राणे यांच्या नेतृत्त्वाखाली राजधानी एक्सप्रेस या गाडीचा मुंबई सेंट्रल ते मथुरा जंक्शन या १३०० कि.मी. लांबीच्या मार्गाचे आधुनिक सुधारित बांधकाम करण्यात आले. या कामामुळे राजधानी एक्सप्रेस ताशी १२० कि. मी. वेगाने सुलभतेने धावू लागली. १९७२ मध्ये राणे यांना भारतीय रेल्वेकडून फ्रान्स येथे रेल्वे ट्रॅक बांधकाम आणि डागडुजी यांचे अत्याधुनिक प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले. या काळात त्यांनी पॅरीस शहरातील मेट्रो रेल्वे आणि फ्रान्समधील रेल्वेमार्गांचा अभ्यास केला.

नोव्हेंबर १९७७मध्ये राणे यांच्यावर इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. या पदावर त्यांनी उत्तम कामगिरी करून भारतीय रेल्वेला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून दिले. इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीने इराण, इराक, सौदी अरेबिया, जॉर्डन, तुर्कस्तान, अल्जेरिया, नायजेरीया, झांबियाइंडोनिशिया, मलेशिया, नेपाळ आणि बांग्लादेश या १२ विकसनशील देशांमध्ये रेल्वेमार्ग बांधकामाची कंत्राटे घेतली. राणे यांच्या नेतृत्त्वाखाली ही सर्व बांधकाम कंत्राटे नियोजित वेळेत, नियिजित बजेटमध्ये आणि गुणवत्तेने पूर्ण होवू शकले. यामुळे रेल्वेमार्ग बांधकाम क्षेत्रातील युरोपियनांची आणि अमेरिकेची मक्तेदारी संपुष्टात आली. जागतिक पातळीवर भारतीय अभियंत्यांनी आपली योग्यता सिद्ध केली. विजयकुमार राणे यांचे उत्तम नेतृत्त्व, संघटन कौशल्य आणि कामातील गुणवत्ता टिकवून ठेवण्याची कार्यपद्धती यामुळेच हे यश भारतीय रेल्वेला प्राप्त होवू शकले.

१९८४मध्ये त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल मॅनेजर यांच्याकडून बेस्ट इंडस्ट्रियल मॅनेजर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९८४-१९८५ मध्ये भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीला सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणून द इकोनॉमिक टाइम्सया दैनिकाकडून गौरवण्यात आले. तसेच त्याच वर्षी या कंपनीला वाणिज्य मंत्रालयाकडून सर्वाधिक नफा आणि परकीय चलन मिळवून देणारी कंपनी म्हणून गौरवण्यात आले. राणे यांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचे हे फलित होते. या अनुभवामुळेच आंतराष्ट्रीय कामगार संघटनेच्या माध्यमातून राणे यांनी मार्केटिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट ऑफ इंटरनॅशनल प्रोजेक्ट या विषयावर चीनमध्ये एका आठवड्याची कार्यशाळा आयोजित केली होती. १९९० मध्ये राणे भारतीय रेल्वे बांधकाम कंपनीचे कार्यकारी संचालक या पदावरून निवृत्त झाले.

इराकमधील बगदाद-हुसैबाद या ५५० कि. मी. लांबीच्या स्टॅण्डर्ड गेज रेल्वेमार्गाचा कार्य आराखडा तयार करणे, मलेशियातील कौलालंपूर ते सिंगापूर दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, बांग्लादेशमधील ढाका ते चितगाव दरम्यानचा रस्ता, नेपाळमधील रस्ते आणि पूल यांचे बांधकाम, मुंबई सेंट्रल ते मथुरा दरम्यानच्या १३०० कि. मी. रेल्वेमार्गाचे अत्यंत कठीण असे नियोजन, कार्य आराखडा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी ही राणे यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

१९९५ ते १९९७ या कालावधीत राणे यांनी बी.ओ.टी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या पश्‍चिम रेल्वेच्या विरंगम मेहेसाणा रेल्वे प्रकल्प, कलकत्ता-हल्दीया दरम्यानचा नवीन रस्ता, मुंबई-पुणे दृतगती महामार्ग आणि केरळमधील एका उर्जा प्रकल्पाचे आर्थिक विश्‍लेषण (फायनान्सिअल व्हाइबिलिटी अ‍ॅनालिसीस) करण्याचे महत्त्वाचे काम केले.

संपूर्ण कारकिर्दीमधील स्थापत्य अभियांत्रिकीतील विशेष वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी राणे यांना २००४ मध्ये विश्‍वेश्‍वरय्या कन्स्ट्रक्शन एक्सलन्सया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतीय रेल्वेच्या बांधकाम संदर्भातील अनेक सरकारी आणि खासगी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय  कंपन्यांसाठी राणे यांनी सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.यामध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन,कॉन्टिनेंटल कन्स्ट्रक्शन, मेट्रो रेल्वे मुंबई, मेट्रो रेल्वे हैद्राबाद यांचा समावेश होतो.

 मेट्रो रेल्वे या विषयावर राणे यांचा विशेष अभ्यास आहे. मेट्रो रेल्वेमुळे शहराच्या मुळ सौदर्याला बाधा निर्माण होवू नये, मेट्रो रेल्वेच्या बांधकामाचा आराखडा तयार करताना किमान पुढील २५ वर्षांचा विचार करावा या विषयी ते आग्रही आहेत. सध्या राणे पुणे येथे कार्यरत असून अभियांत्रिकी  संबंधातील विविध संस्थांमध्ये ते व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करतात. नव्या पिढीतील अभियंत्यांना मार्गदर्शन करणे यामध्ये त्यांना रुची आहे. अभियांत्रीकी क्षेत्रातील ज्ञान तरुण अभियंत्यांना देत असतानाच राणे त्यांना विविध प्रकारचे संशोधनात्मक काम करण्यासाठीदेखील सतत प्रोत्साहित करत असतात.

- संध्या लिमये

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].