Skip to main content
x

राशिवडेकर, अप्पाशास्त्री सदाशिवशास्त्री

      कोल्हापुरातील राशिवडे नामक गावच्या सदाशिवशास्त्री व पार्वतीबाई या अनन्य शिवभक्त दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या अप्पाशास्त्रींनी वडिलांची शिवभक्ती व घराण्यातील पांडित्य परंपरा अतिशय आस्थेने आणि कसोशीने पुढे नेली. प्रथम वडिलांकडून आणि नंतर वेदान्त, व्याकरण, ज्योतिष व न्याय अशा शास्त्रांत प्रवीण असणार्‍या त्यांच्या रुकडीकर, एकसंबेकर इत्यादी सहकार्‍यांकडून अप्पाशास्त्रींनी त्या-त्या शास्त्राचे शिक्षण घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी स्वतंत्र पंचागाची निमिर्तीही त्यांनी करून पाहिली. कोल्हापूर दरबारी असलेले पंडित कांताचार्य यांच्याकडे त्यांनी पुढील शिक्षण घेतले.

      बंगालमधून आयोजित एका निबंधस्पर्धेत अप्पाशास्त्रींच्या ‘मातृभक्ती’वरील लेखाला पहिला पुरस्कार मिळाला. त्या निबंधातून प्रकटलेली त्यांची सहजसुंदर, ओघवती भाषाशैली, भाषेवरील असाधारण प्रभृत्व यांनी प्रभावित होऊन बंगालमध्ये प्रारंभी प्रकाशित होणार्‍या ‘संस्कृतचंद्रिका’ नामक संस्कृत पाक्षिकाचे संपादकत्व त्यांच्याकडे आले आणि त्या वेळेपासून अप्पाशास्त्री संस्कृतचे वृत्तपत्र चालवणारे महाराष्ट्रातले पहिले संपादक/प्रकाशक झाले. ‘संस्कृतचंद्रिका’ चालवणे, त्यामार्फत समाजाचे धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय प्रबोधन करणे, हे अप्पाशास्त्रींचे जीवनध्येय बनले. बंगाली लोकांनीच तेथील संस्कृत संमेलनात अप्पाशास्त्रींना ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी दिली.

      चंद्रिकेतून त्यांनी ‘मणिकुण्डलोपाख्यानम्’, ‘धर्मस्य सूक्ष्मा गति:’ यांसारख्या कथा, ‘मूर्तिपूजनम्’, ‘एकादशीश्राद्धविधिनिर्णय:’, ‘पतितोद्धारमीमांसा खण्डनम्’ असे धार्मिक निबंध, ‘मातृगोत्रवर्जननिर्णयप्रकाश’ आणि ‘निर्णयप्रकाश’ यांसारखे धर्मशास्त्रीय मीमांसा करणारे प्रबंध, ‘केन प्रणीतानि सांख्यसूत्राणि?’, ‘अपि विद्यते कश्चित जीवो नाम?’, ‘मा कर्मफलहेतुर्भू’ असे तत्त्वज्ञानविषयक विवेचन करणारे लेख; ‘जानपदशिक्षणम्’, ‘स्त्रीशिक्षणम्’, ‘किमपराद्धं ब्राह्मणै:’ असे सामाजिक विषयांवरील लेख आणि ‘स्वदेशीयान्दोलनम्’, ‘वङ्गविक्षोभ:’, ‘लेखनस्वातंत्र्यशिरश्‍च्छेद:’ असे सामाजिक व राजकीय विषयांवरील लेख लिहून आपल्या बहुमुखी प्रतिभेचा परिचय त्यांनी दिला. याशिवाय ‘धर्मे सर्वं प्रतिष्ठितम्’ हे घोषवाक्य असणार्‍या ‘सूनृतवादिनी’ नावाच्या संस्कृत साप्ताहिकाची निर्मिती करून त्यामधूनही समाजाला राजकीय, सामाजिक, धार्मिक बाबींचे ज्ञान देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

      प्राचीन विज्ञानाबाबत लोकांमध्ये जागृती करणे हे अप्पाशास्त्रींना महत्त्वाचे वाटत होते. त्यामुळे ‘प्राचीनानां वृष्टिपरिमापनयञन्यम्’, ‘प्राच्यां भूगोलविज्ञानम्’, ‘विज्ञानविलास:’ यांसारखे विविध लेख त्यांनी आवर्जून लिहिले. ‘गोस्तन्यमसूरिका’ नामक लेखात ‘देवीच्या रोगावर लसीकरण हाच उपाय आहे’ असे आग्रहाने प्रतिपादन करताना त्याच्या समर्थनार्थ प्राचीन आयुर्वेदाचा दाखला त्यांनी आवर्जून दिला होता. गद्यलेखनाची त्यांची शैली असामान्य पण ओघवती होती. त्यातून विविध संस्कृत शास्त्रांचे ज्ञान सहजपणे प्रकट होई. खण्डनमण्डनाचे कौशल्य प्रकर्षाने जाणवत असे. मात्र या शास्त्रांच्या ज्ञानाबरोबरच संस्कृत साहित्यविश्वातला त्यांचा संचार अधिक मुक्त होता.

     ‘पज्जरबद्ध:़शुक:’, ‘वल्लभविलापम्’ यांसारखी काव्ये, ‘श्रीशाहोकुमारावाप्ति:’ व ‘तिलकमहाशयस्य कारागृहनिवास:’ यांसारखी खण्डकाव्ये, ‘संमार्जनी शलाका’सारखा लघुनिबंध, समस्यापूर्तीसाठी केलेली काव्यरचना, इंदिरा, लावण्यमयी या बंगाली कादंबर्‍यांचा संस्कृत अनुवाद, महाभारत, विष्णुपुराण इत्यादींची सरस मराठीत केलेली भाषांतरे, ‘न मातु: परदैवतम्’सारखा ललितनिबंध हे सारे वाङ्मय त्यांच्यातील सहृदय लेखकाचा आणि कवीचा परिचय देणारे आहे. ‘अरेबिअन नाइट्स’मधील ‘अश्रश्ररवळि रवि कळी थिविशीर्षीश्र ङराि’ या कथेचा त्यांनी संस्कृतमध्ये केलेला अनुवाद हा मूळ कथेपेक्षा अधिक सरस उतरल्याची ग्वाही श्रीकृष्णम्माचारी यांच्यासारख्या जाणकार समीक्षकाने दिली आहे. सूनृतवादिनी व चंद्रिका या आपल्या नियतकालिकांतून ठरवल्याप्रमाणे अप्पाशास्त्रींनी सात महान व्यक्तींची चरित्रे लिहिली. त्यांत शंकराचार्य होते, महाकवी गुणाढ्य होता आणि महाकवी कालिदासही! या सर्वांच्या काळाचा निर्णय करणे हा अप्पाशास्त्रींचा आवडता विषय होता त्यामुळे त्याबाबतची चर्चा त्या चरित्रांत आवर्जून आढळते. याशिवाय मालविकाग्निमित्रम्, वेणीसंहार, नलोपाख्यान, सावित्री उपाख्यान इत्यादींवर अप्पाशास्त्रींनी अभ्यासपूर्ण टीकाही लिहिल्या.

     प्राचीन धर्मतत्त्वांचा पुरस्कार जसा ‘ग्रहण’, ‘हरतालिका तृतीया महोत्सव’ इत्यादीं धर्मविषयक निबंधांमधून त्यांनी केला, तरी काही आधुनिक महत्त्वपूर्ण विचारांची साग्रह मांडणी हे अप्पाशास्त्रींचे वैशिष्ट्य होते. देवीच्या रोगावर दैवी उपाय न करता लसीकरण करून घेण्याचा आग्रह त्यांनी धरला तसेच चंद्रिकेच्या प्रकाशनासाठीची आर्थिक तरतूद म्हणून त्यांनी त्या काळी भागभांडवलाची कल्पना हिरिरीने मांडली. त्या कल्पनेचा सातत्याने काही काळ पाठपुरावा केला. थोडक्यात जे-जे भारतीय संस्कृतीला उपकारक व मानवी जीवनाला समृद्ध करणारे, ते केवळ जुने वा नवीन म्हणून त्यांनी नाकारले नाही. विरोध झाला तरी विहित कार्याची उमेद न सोडता कोल्हापूर, वाई, पुणे, सातारा अशी ठिकाणे बदलून संस्कृत प्रचार-प्रसाराचे, राष्ट्रीय विचार प्रसाराचे, प्रबोधनाचे आणि  संस्कृतच्या विविध शाखांतील संशोधनाचे काम पदरमोड करून आणि मनस्ताप सोसूनही त्यांनी चालूच ठेवले.

      व्यक्तिगत आयुष्यात प्रापंचिक सुख फारसे लाभले नसले, तरी त्याविषयी दु:ख न करता चंद्रिकेचा संसार अप्पाशास्त्रींनी खूप काटाकाळजीने वाढवला आणि सांभाळलाही. या त्यांच्या कार्याची पावती म्हणून भारत धर्म महामण्डलाकडून ‘विद्यालंकार’ व ‘महोपदेशक’ अशा दोन पदव्या त्यांना मिळाल्या.

      ‘योगवासिष्ठ’ व ‘वाल्मीकि रामायण’ या दोन ग्रंथांच्या अनुवादाचे काम अर्ध्यावर आले असता ग्रंथिज्वराने पुणे येथे २५ ऑक्टोबर १९१३ रोजी अप्पाशास्त्री उर्फ हरि सदाशिव राशिवडेकर या महान प्राच्यविद्या अभ्यासकाचे, महाराष्ट्रातील आद्य संस्कृतवृत्त पत्रकाराचे दु:खद निधन झाले.

       अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात अप्पाशास्त्रींनी संस्कृतच्या प्रसारासाठी, राष्ट्रीय विचारांच्या पुनरुज्जीवनासाठी केलेले काम खरोखर अलौकिक आहे. ‘पारावार: पाण्डित्यस्य प्रतिमूर्ति: प्रतिभाया: निवासभूमी: सौजनस्य धरणिधरो धार्मिकताया:’ हे क्षितीशचंद्र चट्टोपाध्याय यांनी केलेले वर्णन त्यांची नेमकी ओळख सांगणारेच आहे.

डॉ. अंजली माधव पर्वते

संदर्भ
१.  वर्णेकर श्री.भा.; अर्वाचीन संस्कृत साहित्याचा इतिहास; नागपूर.

२.औदुंबरकर वासुदेवशास्त्री; ‘अप्पाशास्त्रिचरितम्’; शारदा गौरव ग्रंथमाला; पुणे.
राशिवडेकर, अप्पाशास्त्री सदाशिवशास्त्री