राठोड, प्रकाश पांडुरंग
प्रकाश पांडुरंग राठोड यांचा जन्म विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील मानोर या तालुक्यातील गिराटा या गावी झाला. त्या गावातील बहुसंख्य गावकरी हे वंजारा या भटक्या-विमुक्त जातीचे आहेत. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या गिराटा गावातच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले व त्यांना त्या गावातून प्रथम मॅट्रिक होण्याचा मान मिळाला. शिकण्याची आवड असल्याने प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी अडचणीवर मात करत एम.ए. (इंग्रजी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळवली आणि वाशीम येथे सावित्रीबाई फुले महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. राठोड यांनी बालपणापासून गिराटा गावची विपन्नावस्था अनुभवली होती. ऋणातून मुक्त होण्यासाठी गावासाठी काही तरी करण्याची प्रबळ इच्छा त्यांच्या मनात होती व त्यासाठी ते योग्य संधीची वाट पाहात होते. विदर्भातील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे कंटाळून वैफल्यग्रस्त अवस्थेत आत्महत्या करत होते. राठोड स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्याशिवाय शेतीचे उत्पन्न वाढणार नाही याची त्यांना खात्री होती. त्यासाठी त्यांनी बचतगट स्थापन करून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा मार्ग दाखवला. त्यांनी शेंदुरजन येथील बँकेत चौकशी केली असता गिराटा हे संपूर्ण गाव थकबाकीदार असल्याने कोणासही कोणतेही कर्ज मिळणार नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याच्या दिशेने अथक प्रयत्न करून त्यांनी गावकऱ्यांना बचतगट स्थापन करण्यास राजी केले. त्यासाठी गावकऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ ते स्वतः बँकेत घेऊन गेले व तेथील अधिकाऱ्यांना त्यांचा संकल्प व निर्धार विस्ताराने सांगितला. बँकेच्या अधिकाऱ्यांना सर्व पटवून दिल्यानंतर बचतगटाला मान्यता मिळाली. राठोड यांनी पुढाकार घेऊन गावात संत सेवालाल महाराज शेतकरी बचतगट हा पहिला बचतगट स्थापन केला. त्या बचतगटाचा सभासद असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने कर्ज घेऊन प्रत्येकी दोन म्हशी खरेदी केल्या आणि गावात दुग्ध व्यवसाय सुरू झाला. यापासून प्रेरणा घेऊन गावात इतर बचतगट सुरू झाले आणि गावाचा कायापालट झाला.
जानेवारी २००८मध्ये वाशीम शहरात तीन ठिकाणी खुले दूधविक्री केंद्रे सुरू करण्यात आली, त्याचे श्रेयही राठोड यांनाच द्यावे लागते. या खुल्या दूध विक्री केंद्राचे उद्घाटन वाशीमचे जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते, जिल्हा पोलीस अधीक्षक वाशीम यांच्या अध्यक्षतेखाली स्टेट बँकेच्या व कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आले. तेथूनच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील या गावच्या उपक्रमाची महती सर्वदूर पसरली.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने राठोड यांची मुलाखत घेतली. त्यांना ‘दै. सकाळ’, नागपूरच्या वतीने ‘उत्कृष्ट शेतकरी’ म्हणून गौरवले. ते गिराटा येथील श्री सेवालाल महाराज शेतकरी गटाचे अध्यक्ष आहेत. तसेच गांधी अध्ययन केंद्र वाशीमच्या नियंत्रण समितीचे सदस्य, अॅन्टी ड्रग फोर्स व रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्राचे संयोजक म्हणूनही ते कार्य करतात. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या कामीही राठोड यांचा सल्ला घेण्यात आला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना गिराटा गावाच्या धर्तीवर अन्य ठिकाणी ‘क्लस्टर अॅप्रोच’वर आधारित मार्गदर्शक प्रकल्प तयार करण्यास सांगितले. राठोड यांनी या कार्यातही मनापासून पुढाकार घेतला. आत्महत्याग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या बचतगटांच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय यशस्वीरीत्या केल्याबद्दल ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान या संस्थेने राठोड यांना उत्कृष्ट पशुपालक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
- डॉ. नागोराव विश्वनाथ तांदळे