Skip to main content
x

राऊत, जयवंत गणपत

            यवंत गणपत राऊत यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील शिरखेड गावी एका मध्यम शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावापासून ३० कि.मी. अंतरावरील वरुड येथे झाले. राऊत हे न्यू इंग्लिश हायस्कूल, वरुड येथून १९५९मध्ये मॅट्रिक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांनी नागपूर येथे कृषी महाविद्यालयातून १९६४मध्ये बी.एस्सी. (कृषी) आणि १९६६मध्ये वनस्पति-रोगशास्त्र या विषयात एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. राऊत यांची बी.एस्सी.ला असताना विद्यापीठ प्रतिनिधी आणि त्याच वर्षी नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाचा उपाध्यक्ष व कार्यवाही अध्यक्ष म्हणून भरघोस मतांनी निवड झाली.

            राऊत यांची एम.एस्सी.नंतर महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामध्ये नियुक्ती झाली. अकोला कृषी महाविद्यालयात कृषि-अधिकारी म्हणून वनस्पति-रोगशास्त्र विभागात त्यांची बदली झाली. त्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून बढती झाल्यानंतर जानेवारी १९७१-७७ या काळात बी.एस्सी.च्या विद्यार्थांना वनस्पति-रोगशास्त्र शिकवण्याचे तसेच डॉ. पं.दे.कृ.वि.तील तेल बियाणे संशोधन केंद्रावरील सूर्यफुलावरील रोगांच्या संशोधनाचे कार्य केले. १९७७-७८मध्ये डॅनिश गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सीड पॅथॉलॉजी कोपनहेगन, डेन्मार्क येथे बीज विकृतिशास्त्राद्वारे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली व त्याआधारे बीज विकृतिशास्त्र प्रयोगशाळा स्थापन केली.

            राऊत यांनी सूर्यफुलाच्या बियाण्यावरील मॅक्रोफोमिना फॅजुलिनी या बुरशीवर संशोधन करून डॉ. पं.दे.कृ.वि.ची १९८०मध्ये पीएच.डी. मिळाली. १९९६ ते १९९९ या काळात विविध पदांवर काम करून ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी १९७८ ते ९९ पर्यंत एम.एस्सी. (कृषी)च्या ३० आणि पीएच.डी.च्या ४ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी तृणधान्ये, तेलबिया, डाळवर्गीय पिके इत्यादींच्या बियाण्यावरील बुरशीजन्य रोगांवर संशोधन करून ८०पेक्षा जास्त शास्त्रीय संशोधनपर लेख लिहिले आहेत.

            शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी १९७९-८०मध्ये डॉ. पं.दे.कृ.वि.तर्फे उत्कृष्ट शिक्षक म्हणून डी.के. बल्लाळ पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी, नवी दिल्ली आणि इंडियन सोसायटी ऑफ सीड टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली या संस्थेतर्फे फेलो म्हणून त्यांना सन्मानित केले. त्यांचे शेतकर्‍यांसाठी मराठी मासिकातून २० मार्गदर्शक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी, नवी दिल्ली या संस्थेचे पश्‍चिम विभाग समुपदेशक म्हणून १९९३मध्ये अकोला येथे देशातील वनस्पति-रोगशास्त्रज्ञांची वार्षिक बैठक आयोजित केली.

- डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

राऊत, जयवंत गणपत