Skip to main content
x

रेगे, पुरुषोत्तम शिवराम

पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म मिठबाव (जि.रत्नागिरी) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण वडील कराचीला असल्याने तेथे झाले व पुढे मुंबईच्या विल्सन हायस्कूल व एल्फिन्स्टन महाविद्यालयातून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर १९३२ साली रेगे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅन्ड पॉलि-टिकल सायन्स या मुंबईच्या संस्थेतून अर्थशास्त्राची बी.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर मुंबईच्या व अहमदाबादच्या महाविद्यालयांमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून तसेच मुंबईच्या एल्फिन्स्टन व गोव्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून त्यांनी आपली व्यावसायिक कारकिर्द पूर्ण केली.

१९५४ ते १९६० या काळात त्यांनी छांदसीया नियतकालिकाचे संपादन केले तसेच १९७७ साली अनुष्टुभया वाङ्मयीन नियतकालिकाच्या निर्मितीत त्यांनी सक्रिय सहभाग दिला. १९६१ साली केरळ येथे ते अखिल भारतीय लेखक परिषदेचे उद्घाटक होते व त्यानंतर त्यांनी वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.

१९३१ साली त्यांचा साधना आणि इतर कविताहा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर फुलोरा’ (१९३७), ‘हिमसेक’ (१९४३), ‘दोला’ (१९५०), ‘गंधरेखा’ (१९५३), ‘पुष्कळा’ (१९६०), ‘दुसरा पक्षी’ (१९६६), ‘स्वानंदबोध’ (१९७०), ‘प्रियाळ’ (१९७२), ‘सुहृदगाथा’ (१९७५) आणि मरणोत्तर’ (अनिह) असे एकूण अकरा काव्यसंग्रह प्रकाशित झाले.

पु.शि.रेगे हे मर्ढेकरांचे समकालीन होत. मर्ढेकरांच्या कवितेत तत्कालीन महायुद्धाच्या झळा, मानवी संबंधांतील परात्मता, मानवी मूल्यांच्या आणि सौंदर्याच्या ओसाडीचे नकारात्मक दर्शन घडते; परंतु पु.शि.रेगे यांच्या कवितेत मात्र जीवनोत्सुकतेचे उत्कट दर्शन घडते. याचे कारण वाङ्मयाकडे व जीवनाकडे पाहण्याची त्यांची भूमिका वेगळी होती. तात्कालिकतेमध्ये ते रमत नसत. स्त्री-शक्तीची अजाणबाला’, ‘मुग्धाप्रियाइथपासून आदिमातेपर्यंतची विविध रूपे त्यांच्या कवितेतून चित्रित झाली आहेत. या सर्व विविधतेत एक समान सूत्र आहे. स्त्री-शक्ती ही सर्जनशक्ती आहे, आनंदाचे केंद्र आहे; त्यामुळे प्रेमभाव, सौंदर्यभाव, कामभाव हा सर्व या सर्जनशक्तीचा विलास आहे, सर्जनाचा उत्सव आहे, अशी त्यांची धारणा आहे.

रेगे यांची अनुभव घेण्याची रीतच त्यांच्या कवितेचा घाट घडवते. शब्द हे अनुभवद्रव्य बनून येते. त्यामुळे स्त्रीच्या शारीर संवेदनांगांचा अनुभव शब्दस्वरूप मुशीतून अर्थरूप धारण करतो. प्रा.गंगाधर पाटील यांनी त्यांच्या कवितेचे वेगळेपणा नेमक्या शब्दांत पुढीलप्रमाणे सांगितले आहेत:

रूप-गंध-स्पर्शादी प्रतिमित संवेदनांनी विणलेला कल्पकतापूर्ण ऐंद्रिय अनुभव हा रेगे यांच्या अनुभवविश्वाचा प्राथमिक आधार आहे. शारीरिक अनुभवातून एक निकोप, शालीन कामविश्व उमलले जाते. हा शरीरानुभव, हा कामभाव स्वतःपलीकडे जातो. प्रत्यक्षातीत होऊन तो मानसिक अंगाने उन्नत होत जातो. प्रेमप्रवृत्ती ही एक मूलभूत सहजप्रवृत्ती असून रेग्यांच्या कवितेत ह्या आल्हादिनी शक्तीचे व प्रेममय जीवनवृत्तीचे दर्शन घडते. सर्जन, शृंगार, प्रेम, आनंद, करुणा हे भाव या आदिप्रतिमेचा भावार्थ मूर्त करतात.” (सुहृदगाथा, १९७५) त्यांच्या पुष्कळा’, ‘त्रिधाराधा’, ‘शहनाज’, ‘मस्तानीइत्यादी कवितांतून स्त्रीच्या आदिप्रतिमेचा विविधांगी प्रत्यय कवितेतून वाचकाला मिळतो.

पु.शि.रेगे यांनी १९५०पासून आपल्या कथालेखनाला प्रारंभ केला. रूपकथ्थक’ (१९५६) आणि मनवा’ (१९६८) या दोन कथासंग्रहांतून या कथा समाविष्ट झाल्या आहेत. मात्र रेग्यांची कथा समकालीन नवकथेच्या प्रवाहातून पूर्णपणे अलिप्त होती. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले यांच्या नवकथेतून ज्या वेळी किडलेल्या माणसांचे चित्रण होत होते, त्याच वेळी पु.शि.रेगे यांच्या कथेतून जीवनातल्या वेल्हाळ कथांची अलवार वेचणी सुरू होती. आपल्या कथांना कथा म्हणण्याऐवजी गोष्ट म्हणणे त्यांनी पसंत केले. भारतीय साहित्य परंपरेतील वृत्तकया प्रकाराशी नाते सांगणारी कथा त्यांनी लिहिली. स्वतःच स्वतःच्या मनाशी केलेली गोष्टीवेल्हाळ क्रीडाअसे रेग्यांच्या कथांचे स्वरूप आहे. मनूही त्यांची कथा बरीचशी आत्मचरित्रात्मक गोष्ट आहे. त्यांच्या कथेतील नायक बरेचसे अनासक्त आहेत. या कथांतल्या स्त्रिया स्त्री-पुरुष संबंधांत स्वतःहून पुढाकार घेणार्‍या असल्या तरी उच्छृंखल नाहीत. मनभाविनी, आनंदभाविनी अशा स्वभावविशेषांच्या या स्त्रिया पुरुषांच्या सहवासात वावरताना स्वतःला विसरू पाहतात. आपल्या होण्याच्याशक्यता अजमावतात. मितभाषी शैली, आटोपशीर संवाद व वेल्हाळ कथनपद्धती ही रेग्यांच्या कथेची वैशिष्ट्ये आहेत.

सावित्री’ (१९६२), ‘अवलोकिता’ (१९६४), ‘रेणू’ (१९७२) आणि मातृका’ (१९७८) अशा चार कादंबर्‍या लिहून रेग्यांनी कादंबरीलेखनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांची कादंबरी मराठीतल्या वास्तववादी वा समस्याप्रधान कादंबरीलेखनाच्या परंपरेत बसत नाही. याचे कारण तात्कालिकतेत त्यांना रस नाही. सावित्रीत येणारे युद्धाचे संदर्भ, ‘रेणूतली राजकीय क्षेत्रातल्या माणसांची वर्दळ, ‘मातृकातले स्थानांतरण हे स्थळकाळाचे संदर्भ केवळ पार्श्वभूमीच्या पडद्यासारखे असून कथानकाला आधार पुरविण्यापुरते असतात. त्यांच्या सर्व कादंबर्‍यांमध्ये माणसांच्या परस्पर संवादांचा आणि स्वतःचा स्वतःशी असलेल्या आत्मसंवादाचा प्रश्न केंद्रस्थानी असतो. स्वात्मसंवादातून, परस्परांच्या संपर्कातून व देवघेवीतून विकसित होणारे मानवी अनुभवविश्व हा त्यांच्या कुतूहलाचा विषय आहे.

सावित्रीया कादंबरीला १९३९ ते १९४७ या युद्धकालाची पार्श्वभूमी आहे. रूढ अर्थाने या कादंबरीला कथानक नाही. सावित्रीने आठ वर्षांत प्रियकराला लिहिलेली ३९ पत्रे म्हणजे ही कादंबरी. अर्थात या कादंबरीला सांकेतिक प्रेमकथेचे स्वरूप येत नाही. प्रियकर-प्रेयसीने परस्परांना आपलंसं’ ‘तुमचंसंकरून घेण्याचा हा प्रवास आहे. या देवघेवीतून दोघांनी अधिक व्हायचे, अनुभवसमृद्धीच्या दृष्टीने उत्क्रांत होत जायचे; हे या कादंबरीचे आशयसूत्र आहे. राधेने स्वतःला विसरून कृष्णमय होणे आणि कृष्णाने स्वतःला विसरून राधेत आपले रूप पाहणे, या देवघेवीचे मिथक उलगडण्याचा कवितेतला छंद रेग्यांनी या कादंबरीतही जोपासला आहे. दुसरे कुणी नसतेच, सारेकाही आपणच असतो, हे रहस्य एकदा उलगडले की सर्व द्वंद्वे, युद्ध संपेल आणि विश्वशांती नांदेल हा चिरंतन मूल्यविचार या कादंबरीतून पुढे येतो.

अवलोकिताया कादंबरीत जे.कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रत्येक क्षण साक्षात अनुभवण्यात जीवन आहे, हे सूत्र कथानकात गुंफले आहे. रेणूया कादंबरीचा बाज मात्र वेगळा आहे. तिथे छोट्याशा चित्रफलकावर बर्‍याच पात्रांचा वावर आहे. एखाद्या कोलाजासारखी पात्रांची गर्दी पसरली आहे. यांतला प्रत्येक जण स्वतंत्र आहे आणि तरीही सर्व सर्वांशी जोडलेले आहेत. रेणू ही त्यातलीच एक. या कादंबरीत कम्युनिकेशन हा विषय हाताळलेला आहे. आपण संवाद साधतो म्हणजे नेमके काय करतो, हा प्रश्न कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. या कादंबरीतली रेणू म्हणते, “आपण आपल्याशी संपर्क काही न करता, काहीही मनात न आणता, मन, विचार सगळे विसरून साधू शकतो.आत्मसंपर्काची ही निराळी रीत हाच रेणूचा विषय आहे.

एखादे भव्य अनाकलनीय असे नाट्य असते, पण खरी पात्रे दोनच असतात. एक मागचा पडदा आणि एक पुढचा पडदा. या कादंबरीत रेणू मागच्या पडद्यासारखी सगळ्यांना उठाव देणारी आहे, तर पूर्णिमा या सर्वांना सामावून पुन्हा पुढच्या पडद्यासारखी निर्विकार उरणारी आहे. रेग्यांच्या कादंबरीलेखनाचे हे तंत्र असे संवादीभ्रमात्मक सौंदर्यरचना साधणारे तंत्र आहे.

मातृकाही रेग्यांची शेवटची कादंबरी आहे. रिलेटिव्हिटी ऑफ लव्हहे या कादंबरीचे आशयसूत्र आहे. भोवतालच्या माणसांच्या कोलाहलातही माणसाची एक वेगळी आत्मशोधाची यात्रा कशी सुरू असते, याचा शोध हे या कादंबरीचे कथानक आहे. आपणच आपल्याला लपवीत असतो. घुंगट असलाच, तर तो आपला असतो. बाहेर सगळे स्वच्छ मोकळे असते,’ हे मानवी संज्ञापनाचे रहस्य या कादंबरीतून लेखकाने उलगडले आहे. सारांश, कलावंत नवीन काही निर्माण करीत नसतो. तो आपल्या साक्षात्काराच्या प्रकाशात कलाद्रव्याची एक नवीन जुळणी करीत असतो. पूर्णापासून पूर्ण उदीत होते, पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक राहते. रेग्यांची सर्जनशीलता या जातीची होती. त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व एखाद्या यक्षासारखे होते. आणि त्यांचे साहित्यविश्वही असेच अलौकिक व वेगळ्या धाटणीचे होते. त्यामुळेच कदाचित रेग्यांच्या गद्यलेखनाची परंपरा पुढे फारशी विस्तारित झाली नाही. कवितेच्या क्षेत्रात मात्र ग्रेस, आरती प्रभू इत्यादी अनेक कवींवर रेग्यांच्या कवितेची छाप आढळते.

- डॉ. रमेश वरखेडे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].