Skip to main content
x

र्‍हिस डेव्हिड्स, कॅरोलिना

       कॅरोलिना र्‍हिस डेव्हिड्स या टी.डब्ल्यू. र्‍हिस डेव्हिड्स यांच्या सुविद्य पत्नी असून आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी ‘पाली टेक्स्ट सोसायटी’चे काम मोठ्या हिमतीने आणि निष्ठेने पुढे नेले. त्या अत्यंत हुशार आणि बुद्धिमान असून ‘लंडन स्कूल ऑफ ओरिएन्टल अ‍ॅण्ड आफ्रिकन स्टडीज’मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. निरनिराळ्या देशांतील विद्यार्थी केवळ त्यांच्यामार्गदर्शनाखाली शिकण्यासाठी त्या संस्थेत येत.

पाली भाषेच्या संशोधनाचे काम करीत असताना त्यांना महायुद्धाची झळ चांगलीच जाणवली. पहिल्या महायुद्धात त्यांचा एकुलता एक पुत्र धारातीर्थी पडला आणि दुसर्‍या महायुद्धात ‘पाली टेक्स्ट सोसायटी’च्या इमारतीवर बॉम्बचा वर्षाव झाला. या दोन्ही संकटांतून बाहेर पडून ही ज्ञानपिपासू विदुषी एखाद्या तपस्विनीप्रमाणे बौद्ध साहित्याचे काम करीत राहिली.

पाली भाषेचा सखोल आणि दांडगा व्यासंग आणि संशोधकांची प्रखर दृष्टी असलेल्या या विदुषीचे ‘साम ऑफ सिस्टर्स’ व  ‘साम ऑफ ब्रदर्स’ (‘थेरीगाथा’ व ‘थेरगाथा’ या पाली ग्रंथांची काव्यात्मक भाषांतरे), ‘बुद्धिस्ट सायकॉलॉजिकल एथिक्स’, ‘विसुद्धिमग्ग’, ‘डायलॉग्ज ऑफ द बुद्ध’ (खंड : १, २, ३), ‘बुद्धिस्ट फिलॉसॉफी’, ‘गौतम : द मॅन’, ‘स्टोरीज ऑफ द बुद्ध’, ‘मॅन्युअल ऑफ बुद्धिझम’, ‘साक्य ऑर बुद्धिस्ट ओरिजिन्स’, ‘व्हॉट वॉज द ओरिजिनल गॉस्पेल ऑफ बुद्धिझम’ हे काही प्रसिद्ध ग्रंथ आहेत.

बौद्धधर्माच्या इतिहासात आणि साहित्यात टी.डब्ल्यू र्‍हिस डेव्हिड्स आणि त्यांच्या विदुषी संशोधक पत्नी सी.ए.एफ. र्‍हिस डेव्हिड्स यांचे योगदान खरोखरच असामान्य दर्जाचे आहे.

डॉ. परिणिता देशपांडे

र्‍हिस डेव्हिड्स, कॅरोलिना