Skip to main content
x

र्‍हिस डेव्हिड्स, थॉमस विल्यम

     थॉमस विल्यम हे बौद्ध वाङ्मयात टी.डब्ल्यू. र्‍हिस डेव्हिड्स या नावानेच अधिक परिचित आहेत. त्यांचा जन्म लंडनच्या ईशान्येस असलेल्या इसेक्स प्रांतातील कोलचेस्टर येथे झाला. आपले शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी सिलोन सर्व्हिसमध्ये प्रवेश केला व तेथे सनदी नोकर म्हणून ते कार्य करू लागले. तेथे असताना बौद्धधर्माबद्दल अभिरुची उत्पन्न होऊन त्यांनी पाली भाषा व साहित्य यांचा अभ्यास सुरू केला. त्याकरिता त्यांनी  सनदी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णपणे बौद्ध साहित्यास वाहून घेतले. १८७७ मध्ये त्यांनी बॅरिस्टरचीही परीक्षा दिली.

     ते अनुराधापूर येथे असताना आर्किऑलॉजिकल कमिशनर होते. १८७८ मध्ये त्यांनी लंडन सोसायटीसाठी ख्रिश्चनांच्या माहितीसाठी बुद्धाचे चरित्र लिहिले. त्याचे नावच ‘बुद्धिझम’ असे दिले. १८८१ मध्ये अमेरिकेत निमंत्रण आल्यावरून त्यांनी बौद्धधर्माची सुरुवात आणि प्रसार दर्शविणारी भाषणे दिली ती ‘हिबर्ट लेक्चर्स’ म्हणून प्रसिद्ध आहेत. १८८२ मध्ये त्यांनी ‘पाली टेक्स्ट सोसायटी’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. या संस्थेने सुमारे १०० पाली ग्रंथ प्रसिद्ध केले असून पाली भाषा युरोप, अमेरिकेत लोकप्रिय करण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले आहेत. पाली भाषेतील ग्रंथ रोमन लिपीत छापण्याचा पायंडा पडल्यामुळे अन्य लिपींची पाश्चिमात्य पंडितांना वाटणारी भीती नाहीशी झाली.

     १८९२ मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन या संस्थेत पाली भाषा व बौद्ध वाङ्मय या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८९४ मध्ये कॅरोलिना ऑगस्टा फोले (रेव्हरंड जॉन फोले यांची कन्या) यांच्याशी त्यांचा विवाह झाला व पती-पत्नी उभयतांनी पाली भाषेच्या सेवेस स्वत:ला वाहून घेतले.

     ‘बुद्धिस्ट बर्थ स्टोरीज’ (१८७९), ‘एन्शन्ट कॉइन्स अ‍ॅण्ड मेझर्स इन सिलोन’ हे ग्रंथ, तसेच श्री कारपेन्टर यांच्याबरोबर ‘दीघनिकाय’ या ग्रंथाच्या तिन्ही विभागांचे इंग्रजी भाषेत भाषांतर (१८८९-१९२१), तसेच ओल्डेनबर्ग यांच्यासह ‘विनयपिटका’चे इंग्रजी भाषांतरही त्यांनी ‘सेक्रेड बुक्स ऑफ दि इस्ट’ या ग्रंथमालेत प्रसिद्ध केले. दीघनिकायाच्या इंग्रजी भाषांतराची प्रस्तावना - हे सारे ग्रंथ त्यांच्या गाढ विद्वत्तेची साक्ष देतात. त्याशिवाय ‘अभिधम्मत्थसंगहो’ (१८४४), ‘दाठावंस’ (१८८४), ‘मिलिंद पन्ह’ दोन भाग (१८९०-९४) हेही याच ग्रंथमालेत प्रसिद्ध झाले. त्यांचे स्वतंत्र ग्रंथ ‘बुद्धिझम’ (१८९६) आणि ‘बुद्धिस्ट इंडिया’ (१९०३) हे तर बौद्ध जगतात मान्यता पावलेले असे ग्रंथ आहेत. त्यांचे शेवटचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी डॉ. वुलियम स्टीड यांच्या साहाय्याने आरंभलेला पाली - इंग्रजी कोश. परंतु, या कोशाच्या फक्त पहिल्या तीन विभागांचे प्रकाशन झाल्यावर त्यांचे निधन झाले.

डॉ. परिणिता देशपांडे

र्‍हिस डेव्हिड्स, थॉमस विल्यम