रणदिवे, अनंत विष्णू
‘आंबा’ या विषयावर पन्नास वर्षे संशोधन करून आंबा उत्पादन विषयात ‘रणदिवे पॅटर्न’ प्रत्यक्षात उतरवणारे अनंत रणदिवे म्हणजे आंब्याचे चालतेबोलते विद्यापीठ. त्यांचे वडील काही काळ महात्मा गांधींचे सचिव होते. त्या अनुषंगाने येणाऱ्या राजकीय पार्श्वभूमीचे रणदिवे यांना कधी आकर्षण वाटले नाही. खुलताबादमधील शंकरपूरवाडीमध्येच राहून आंब्याची कोरडवाहू जमिनीतील लागवड, उत्पादन आणि त्यांवर विविध प्रयोग करून आंबा लागवडीमध्ये एक नवी वाट त्यांनी निर्माण केली. या वाडीत त्यांनी १०० एकरांत भारतातील सर्व उत्तमोत्तम अशा ३० जाती लावल्या होत्या. भारतातील निरनिराळ्या राज्यातील आंबा उत्पादनाचा अभ्यास केला, पण ब्राझिल, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, इस्राएल या देशांमध्ये आंब्याची लागवड कशी केली जाते आणि ३० ते ४० वर्षांत आंबा उत्पादनाचा आलेख कसा आहे याचाही त्यांनी अभ्यास केला आणि त्या दृष्टीने भारतात अनुकूलता असूनही आंबा उत्पादनात आपण मागे आहोत याची खंत त्यांना वाटत असे आणि त्यातूनच त्यांनी कोरडवाहू आंबा लागवड पद्धतीचे संशोधन केले.
रणदिवे १०×१० फूट अंतरावर १×१×१ मीटर आकाराचे एकरी ४३५ खड्डे करून त्याच्या तळाशी ८ ते १० सें.मी. काडीकचरा टाकून त्यावर ५०% कंपोस्ट, ५०% चांगली माती आणि दोन किलो सुपर फॉस्फेट कालवून त्यामध्ये आंब्याची वजनदार कोय रुजवायचे. आंब्याची रोपे ८ ते १२ महिन्यांची झाल्यावर त्यावर पाहिजे त्या जातीचे कलम बांधायचे. या पद्धतीमध्ये कलमांना सिंचनाची किंवा जमिनीतून खताची गरज नसते. तसेच झाडांची उंची ८ ते १० फुटांपर्यंत मर्यादित राहते. रणदिवे यांनी विकसित केलेल्या पद्धतीत आंब्याची झाडे १०० ते १२५ वर्षे टिकू शकतात, असे त्यांचे मत होते. कलम बांधल्यापासून तीन-चार वर्षात फळे लागण्यास सुरुवात होते. त्यांनी थेट कोय लावून झाडाची वाढ कशी चांगली होते हेही दाखवले. त्यासाठी त्यांनी कच्चेघाटी पाणलोटात रोपांऐवजी सर्व जातींच्या कोयींची लागवड केली. मूठभर सेंद्रिय खत टाकून त्यावर कोय टाकायची त्यांची पद्धत होती. या पद्धतीने ८५%पर्यंत रोपांची उगवण होत असे. आंब्यासारख्या सोटमुळाच्या झाडांना पाणी दिले नाही की, ते पाण्याच्या शोधात खोलवर जाते. त्यामुळे झाडांना शक्ती मिळते, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. आंब्याच्या मुळापासून पानापर्यंत प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांनी स्वतःचे आडाखे बांधले होते. एक चौ. मीटरचे खड्डे एकेका रोपासाठी मोठे वाटले तरी झाडाला ओल राहण्यासाठी आवश्यक आहेत तसेच पानांवर एक टक्का युरियाची फवारणी दर महिन्याला करायची त्यांची पद्धत होती. रणदिवे यांना आंध्र प्रदेश सरकारच्या फलोत्पादन विभागाने बोलावून घेतले. त्यांच्या अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली सतरा आदिवासी गावांमध्ये ३५ हजार हेक्टरमध्ये राजा रेड्डी यांच्या सहकार्याने आंब्यांचे जंगल उभे केले. ही त्यांच्या विचारांची स्वप्नपूर्ती होती. यामुळे आदिवासींचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली. प्रकल्प कुठल्याही मानधनाशिवाय पूर्ण केला.
जळगावमध्ये भंवरलाल जैन यांच्या जैन व्हॅलीमध्ये ३० ते ३५ हजार आंब्यांची लागवड त्यांनी यशस्वीपणे केली. कच्चेघाटी, हतनूर महालापिंप्रीसारख्या अविकसित दलित क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. कच्चेघाटीच्या डोंगरात ५०० काजूची झाडे लावली. अतिशय तळमळीने शेतकऱ्यांना सल्ला देणे, व्याख्याने देणे, आंबा या विषयातील आपली माहिती सहजपणे उपलब्ध करून देणे यासाठी त्यांचा लौकिक होता. महाराष्ट्रात एखादे तरी आंब्याचे जंगल उभे राहावे असे त्यांचे स्वप्न होते. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जीवनात आंब्याच्या उत्पादनाने पहाट उगवेल असा त्यांना विश्वास वाटत होता. महाराष्ट्रातील कोणत्या भागात कोणत्या जातीचा आंबा आहे याची अचूक ओळख त्यांना होती.
रणदिवे यांच्याकडे कृषी विद्यापीठाची पदवी नसली तरी स्वबळावर झपाटलेपणाने काम करून त्यांनी ‘आंबा’ या विषयातील आपला अभ्यास सिद्ध केला. ‘आंबा’ हे एकच सूत्र त्यांनी जीवनप्रवासाचे ध्येय मानले होते. त्यांनी स्वानुभवाने संशोधिलेल्या आंबा लागवडीची तंत्रे: १) त्यांनी लंगडा जातीत लहान व चपटी कोय असलेली झाडे निवडली होती. २) आंबा निर्यातीसाठी नैसर्गिक ऋतूच्या आधी फुलोरा आणून बाजारात लवकर फळे आणण्याचे तंत्र विकसित केले होते. ३) इन सीटू कोय लावून आंबा लागवड केल्याने, तसेच हेक्टरी रोपांची जास्त संख्या ठेवल्याने सुरुवातीस उत्पन्नही चांगले मिळते. ती मोठी झाल्यावर फांद्या विरळ केल्याने सूर्यप्रकाश चांगला मिळून हवा खेळती राहते, मुळे खोल गेल्याने जमिनीच्या खालील भागातून अन्नांश व पाणी शोषून घेतात. जमिनीच्या अंतर्भागात मुळांची जाळी तयार झाल्याने मृदा व जल संधारण चांगले होते. कोरडवाहू क्षेत्रातसुद्धा अशी लागवड फायदेशीर ठरते. फळांना उत्तम चव व सुवास येतो. रणदिवे यांनी राज्य पातळीवरची अनेक पारितोषिके तसेच केंद्र सरकारची बक्षिसे मिळवली होती. ध्येयवेड्या, बळीराजाचा सन्मित्र असलेल्या अनंतरावांचे ‘सीडलेस मँगो’चे प्रयोग शंकरपूरवाडीला सुरू होते. या विलक्षण प्रयोगाविषयी, त्या अभ्यासाविषयी माहितीही ते देत असत, पण हे संशोधन पूर्ण होण्यापूर्वीच आंब्याच्या अशा चालत्याबोलत्या विद्यापीठाला, बळीराजाच्या हितचिंतकाला कृषीप्रेमी मुकले.