Skip to main content
x

रणदिवे, कमल जयसिंग

     कर्करोगावर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या पिढीतील अग्रणी डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म पुणे येथील प्रगतिशील समर्थ कुटुंबात झाला. त्यांचे वडील फर्गसन महाविद्यालयामध्ये प्राध्यापक  होते. त्यांनी त्यांच्या मुलांप्रमाणे सर्व मुलींनाही उच्चशिक्षणाची संधी दिली. कमल समर्थ वनस्पतिशास्त्र या विषयात १९३८ साली बी.एस्सी. (ऑनर्स) झाल्या. त्यानंतर त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये ‘अ‍ॅनोनेसिए’ फॅमिलीतील वनस्पतीवर संशोधन करून १९४१ साली मुंबई विद्यापीठाची मास्टर ऑफ सायन्स (एम.एस्सी.) ही पदवी मिळवली. या सुमारास त्यांचा विवाह जयसिंग रणदिवे या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या उदारमतवादी तरुणाशी झाला व त्या मुंबईत स्थायिक झाल्या.

     त्यांचे वास्तव्य कर्करोग्यांसाठी नव्यानेच सुरू झालेल्या टाटा स्मारक रुग्णालयाच्या जवळ होते. साहजिकच, त्यांनी कर्करोग संशोधनात पुढील अभ्यास करण्याचे ठरविले. त्यांचा संपर्क द्रष्टे संशोधक व विकृतिशास्त्रज्ञ (पॅथॉलॉजिस्ट) डॉ. वसंत रामजी खानोलकर यांच्याशी आला. डॉ. खानोलकरांच्या मार्गदर्शनाखाली १९५० साली उंदरांमधील स्तनांच्या कर्करोगावर केलेल्या संशोधनासाठी रणदिवेंना मुंबई विद्यापीठाने पीएच.डी. ही पदवी दिली. पुढील वर्षी त्यांना रॉकफेलर फाउण्डेशनची प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मिळाली. त्या काळी ऊती संवर्धन (टिश्यू कल्चर) हे तंत्रज्ञान नव्यानेच विकसित केले जात होते. या तंत्रज्ञानाची कर्करोग संशोधनात होणाऱ्या भविष्यातील उपयोगाची खात्री पटल्यामुळे रणदिवे यांनी, अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या जगप्रसिद्ध प्रयोगशाळेत काम करण्याची संधी मिळवली. भारतात परतल्यावर रणदिवेंनी स्वत:ला ऊती संवर्धन प्रयोगशाळा बांधणीच्या कामाला वाहून घेतले. लवकरच भारतीय कर्करोग संस्थेत स्थापन केलेल्या प्रयोगशाळेची ख्याती देशभर पसरली व अनेक हुशार विद्यार्थी स्नातकोत्तर पदवी मिळवण्यासाठी या प्रयोगशाळेत दाखल झाले. रणदिवेंनी त्यांच्याबरोबर काम करणारे शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांच्या मदतीने निरनिराळ्या पेशींच्या स्वतंत्र वाढणाऱ्या मालिका प्रस्थापित केल्या. त्यांच्या गुणसूत्रांचा अभ्यास करून या तंत्रज्ञानाचा उपयोग कर्करोग संशोधनासाठी भारतात सर्वप्रथम केला.

     रणदिवेंची चौकस दृष्टी चौफेर फिरत असे. त्यामुळे त्यांनी मुखाचा कर्करोग, स्तनाचा व रक्ताचा कर्करोग व या रोगाशी असणारा विषाणू, तंबाखू-सुपारीचे व्यसन यांचा संभाव्य संबंध या विषयांवरील मूलभूत संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली. डॉ. खानोलकरांच्या प्रेरणेने त्यांनी कुष्ठरोगावरदेखील काम केले. ऊती संवर्धन तंत्र वापरून त्यांनी मज्जापेशींकडे कुष्ठरोगाचे जंतू आकर्षित होतात व तिथे त्यांची वाढ होते, हे सर्वप्रथम दाखवले. या जंतूचे प्रमाण अधिक संशोधनाद्वारे सिद्ध झाले. हे जंतू मायक्रोबॅक्टिरियम लेप्रे, आय.सी.आर.सी., (त्या वेळची कर्करोग संस्था) या नावाने जगभर मान्यता पावले. रणदिवेंना त्यांचे सहकारी, तसेच विद्यार्थीवर्गाची विज्ञानातील आवड हेरण्याची विलक्षण जाण होती. त्यानुसार त्या प्रत्येकास विषय निवडून देत व मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या स्वभावाचा आणखी एक विशेष पैलू होता. त्यांच्या सर्व सहकारी संशोधकांनी नवी दिशा आखून स्वत:च्या आवडीनुसार स्वतंत्रपणे काम करावे असे त्यांना वाटे व त्यानुसार त्यांचे प्रयत्न असत. या सर्वव्यापी व दूरदर्शी विचारांमुळे पेशी, जीवशास्त्र कारसिनोजिनेसिस ट्यूमर इम्युनोलॉजी या स्वतंत्र शाखा कर्करोग संशोधन केंद्रात निर्माण झाल्या. तसेच, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच वर्षांनी प्रस्थापित झालेल्या विषाणूशास्त्र (व्हायरोलॉजी), रेण्वीय जनुकशास्त्र (मॉलेक्युलर जेनेटिक्स) या शाखांचे बीजही  त्यांनीच  केलेल्या स्तनांच्या कर्करोगावरील संशोधनात आढळते.

     रणदिवेंना वासंती देवी अमीरचंद पुरस्कार, वाटुमल फाउण्डेशनचा पुरस्कार, सॅडो अवॉर्ड, टाटा मेमोरियल सेंटरचे सुवर्णमहोत्सवी मानचिन्ह व बनारस हिंदू विद्यापीठाचा पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले. त्यांची इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेत ‘फेलो’ म्हणून  निवड झाली. महाराष्ट्र राज्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान समितीच्या सदस्या असताना त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ ही पदवी बहाल करून राष्ट्रपातळीवर त्यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थीदशेपासूनच्या वाटचालीत त्यांनी कर्करोग संशोधन केंद्रात ऊती संवर्धन विभागाचे प्रमुखपद, तसेच कर्करोग केंद्राचे हंगामी संचालकपद सांभाळले. १९९१ साली कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे भरलेल्या मराठी विज्ञान संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

     सेवानिवृत्तीनंतर त्यांनी महाराष्ट्रातील वनवासी भागांत ग्रामीण आरोग्य प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात सुरू केला. या कार्यात त्यांनी स्त्रिया व मुले यांचे आरोग्य, समतोल आहार व स्वच्छता या बाबींचे जागृतीकरण यासाठी अथक परिश्रम केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काही स्त्रियांचे नेतृत्वगुण ओळखून त्यांना या जाणिवांचा प्रसार करण्याकरिता तयार केले. त्यांच्या सामाजिक जाणिवेची दुसरी बाजू म्हणजे १९७७ साली त्यांनी सुरू केलेली ‘इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशन’ ही संस्था. या संस्थेचे उद्दिष्ट सर्व प्रवाहांतील स्त्री-शास्त्रज्ञांना एकत्र आणून समाजात विज्ञानाचा प्रसार व जागरूकता निर्माण करणे हे होते. या संस्थेची वैज्ञानिक बैठक व सामाजिक दुवा बळकट करण्याकरिता त्यांनी प्रा. भा.मा. उदगावकर, डॉ. एकनाथ चिटणीस, प्रा. यशपाल, डॉ.मंजू शर्मा या धुरीणांचे मार्गदर्शन घेतले. ही संस्था आज त्यांची कार्यपूर्ती जोमाने करीत आहे. डॉ. कमल रणदिवे आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या.

-  डॉ. रजनी भिसे

रणदिवे, कमल जयसिंग