Skip to main content
x

रोकडे, कुंदा बळवंत

           कुंदा बळवंत रोकडे यांचे  शालेय शिक्षण दहावीपर्यंत झाले. त्यांना शेतीची मनापासून आवड  असल्यामुळे त्यांनी उत्तम प्रकारे शेती करता यावी म्हणून मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. त्यांची शेतीविषयक तळमळ पाहून डॉ. बी.डी.टिळक, डॉ.द.र.बापट व डॉ.काळे यांनी शेती सुधारणेसाठी त्यांना प्रोत्साहन दिले व उत्तम मार्गदर्शन केले. त्यामुळे रोकडे यांच्या शेतीतील उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून आली. रोकडे यांना सेंद्रिय शेतीची विशेष आवड होती. त्यांनी रासायनिक खते वापरण्यापेक्षा सेंद्रिय खतांचा वापर करणे महत्त्वाचे मानले. त्यासाठी त्यांनी ज्ञानप्रबोधिनी ग्रामविकास विभागाची मदत घेतली आणि गांडूळखत निर्मितीची माहिती घेतली. त्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीने अंजिराचे पीक घेतले आणि केवळ ३० गुंठ्यांत पहिल्या वर्षी ३०० किलो, दुसर्‍या वर्षी १७०० किलो, तिसऱ्या वर्षी ५००० किलो, चौथ्या वर्षी ६,५०० किलो एवढे भरघोस उत्पन्न घेतले. त्याचप्रमाणे त्यांनी शेतात अंजीर छाटणी प्रकल्प राबवला.

           त्यांनी आपल्या शेतीत चारसूत्री पद्धतीने तांदूळ पिकाची लागवड केली. त्यांनी हेक्टरी ७ ते ९ टन भाताचे उत्पन्न घेतले. तसेच त्यांनी दीड एकरात पुसा बासमती तांदळाची लागवड केली. त्यांनी १० वर्षांहून अधिक काळ २००० किलो तांदूळ या क्षेत्रात पिकवला. रोकडे यांनी शेतीला पूरक उद्योग म्हणून ४-५ गाईम्हशी ठेवल्या ,त्यांच्याकडून त्यांना दररोज २२ लीटर दूध मिळते. ह्याबरोबर त्यांनी सर्व प्रकारचा भाजीपाला, टोमॅटो, वाल, फ्रेंच फरसबी यांचीही लागवड करतात व त्यातून उत्पादन घेतात. त्यांनी आपल्या शेतीमध्ये स्वाती या ज्वारीच्या वाणाची यशस्वी लागवड केली . तसेच त्यांनी निफाड ३४ या गव्हाच्या वाणाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले . 

           रोकडे यांना ग्रामीण महिला विकास या संस्थेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर आपल्या शेतात करण्याचे ठरवले. आपल्या शेतावर केलेल्या विविध उपक्रमांचा इतरांनाही फायदा व्हावा या हेतूने त्यांनी परिसरातील महिलांना एकत्रित करून मार्गदर्शन केले. त्यांनी सुमारे ७ वर्षे शिवापूर येथील महिला सहकारी दूध सोसायटीचे अध्यक्षपदही सांभाळले. त्यामार्फत ५०० ते ७०० लीटर दुधाचे संकलन केले जाते. तसेच रोकडे या ८ वर्षे महिला बचत गटप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. या सर्व उद्योगात त्यांचे पती बळवंतराव यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. त्यांची कन्या-मीनल रोकडे ही संगणक अभियंता म्हणून बंगलोर येथे विदेशी कंपनीत कार्यरत आहे. कुंदा रोकडे यांनी शेती क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना बळीराजा मासिकाचा कै.राजश्री मुकुंद गायकवाड उत्तम महिला शेतकरी पुरस्कार प्राप्त झाला .

- श्रेयस बडवे

रोकडे, कुंदा बळवंत