Skip to main content
x

रोमण, सुनील मारुती

     कराव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये असणाऱ्या हवालदार सुनील मारुती रोमण यांनी ‘ऑपरेशन रक्षक’ या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. २ नोव्हेंबर २००२ रोजी जम्मू-काश्मीरमधील पूंछ क्षेत्रातील शोधमोहिमेमध्ये अतिरेकी एका झोपडीत लपल्याचा संशय होता. त्यांच्या शोधासाठी  ते एका अधिकार्‍याबरोबर गेले.

     हे अतिरेकी जिथे लपले होते, त्या झोपडीसदृश ठिकाणाला आग लागली व एक अतिरेकी तिथून बाहेर पडला. त्यावेळेस तत्परतेने हवालदार रोमण यांनी त्या अतिरेक्याला ठार मारले.

     जळत्या झोपडीतून बाहेर पडण्याचा अतिरेक्यांनी वारंवार प्रयत्न केला पण त्यांच्या मार्गात आड येऊन रोमण यांनी अतिरेक्यांवर गोळीबार करून त्यांना रोखून धरले. तरीही अंदाधुंद गोळीबार करत सहा अतिरेकी बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यांनी आजूबाजूच्या झाडाझुडपांमध्ये लपण्यासाठी आश्रय घेतला. त्यांच्याकडून होणाऱ्या गोळीबाराने जराही विचलित न होता हवालदार रोमण यांनी आपल्या अधिकाऱ्याबरोबर त्यांचा शोध सुरूच ठेवला.

     दगडांच्या मागे लपून बसलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. हवालदार रोमण यांनी सरपटत जाऊन अतिरेक्यांशी समोरासमोर झटापट करून दोन अतिरेक्यांना ठार मारले.

     या मोहिमेमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून हवालदार रोमण यांनी जो पराक्रम केला, त्यासाठी त्यांना ‘शौर्यचक्र’ प्रदान करण्यात आले.

- संपादित

रोमण, सुनील मारुती