Skip to main content
x

रुकडीकर, विश्वनाथ महाराज

     विश्वनाथ महाराज रुकडीकर हे नाथ संप्रदाय परंपरेतील सिद्धपुरुष म्हणूनच जणू जन्माला आले होते. त्यांंचा जन्म कोल्हापूर जवळील वडगाव येथे झाला. बालवयातच बंधूंच्या औषधोपचारासाठी पंढरपुरास येऊन राहावे लागल्याने विश्वनाथ महाराजांना पांडुरंगाचे नित्यदर्शन व संतसहवास लाभला. त्यांचा विवाह झाला; परंतु मुलगा तीन वर्षांचा असतानाच वारला आणि त्यानंतर थोड्याच दिवसांत पत्नीनेही स्वर्गारोहण केले. ‘दैवानेच आपणांस परमार्थाकरिता मोकळे केले’, असे वाटून ते घराबाहेर पडले. तारुण्यातच त्यांना रामचंद्र महाराज तिकोटेकर यांचा अनुग्रह प्राप्त झाला. हे महाराज ‘तिकोटे’ गावी बराच काळ राहिले म्हणून त्यांना ‘तिकोटेकर’ म्हणू लागले. वास्तविक, त्यांचे आडनाव ‘पागे’! हे ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील सहावे अधिकारी पुरुष होते. अशा अधिकारी पुरुषाचा अनुग्रह श्री विश्वनाथ महाराजांना प्राप्त झाला. ते नित्य स्व-स्वरूपानंदानुसंधानात निमग्न असत.

 विश्वनाथ महाराजांचे अनुग्रहित नारो अनंत कुलकर्णी हे ‘रुकडी’ येथे राहत. महाराज त्यांच्याकडे जाऊन राहिले. कुलकर्णी मोठे जमीनदार होते. त्यांनी विश्वनाथ महाराजांना स्वतंत्र खोली दिली. येथे त्यांचे त्रिकाल स्नान, ज्ञानेश्वरी वाचन आणि सोऽहं साधना हे अखंड चालू असे. ते चाळीस वर्षे रुकडीतच राहिले होते म्हणून त्यांना रुकडीकर म्हणू लागले. श्री रामचंद्र महाराज तिकोटेकर वर्षातून एकदा रुकडीस येत. त्या वेळी ज्ञानेश्वरी, सप्तशती यांची पारायणे होत. श्रीसूक्त, पवमान, रुद्र यांचे अभिषेक होत. हा ज्ञानेश्वरी सप्ताह मोठ्या प्रमाणात होत असे. श्री रामचंद्र महाराजांनीच विश्वनाथ महाराजांना रुकडीस नारोपंतांच्या घरी राहायला सांगितले होते. त्या काळात विश्वनाथ महाराज भावावस्थेत जात. ‘बाल, उन्मत्त, रामकृष्ण परमहंस, गौरांग प्रभू’ अशासारख्यांच्या अवस्थेत महाराज जात. पायांत घुंगरू बांधून नाचत असत. स्वामी स्वरूपानंद यांचे गुरू श्री गणेशनाथ वैद्य हे श्री विश्वनाथ महाराजांचे पट्टशिष्य! त्यांना अनुग्रह देण्याचा  अधिकार मिळाला होता. त्यांना बाबा वैद्य असेही म्हणत. ते सांगत, ‘‘पिंड आणि ब्रह्माण्ड यांच्या ऐक्याची अनुभूती हा रसकल्लोळ आहे. श्री गुरुकृपेने मला हा रसभाव प्राप्त झाला. पूर्णातून पूर्णत्वाचा स्पर्श अशी ही मोठी आनंदाची अनुभूती आहे.’’

बाबा वैद्य यांच्या आग्रहावरून विश्वनाथ महाराज १९१७ साली पुण्यास आले. विश्वनाथ महाराजांची अनेक शिष्यमंडळी होती. ज्ञानेश्वरी सप्ताह साजरा झाल्यानंतर महाराज आजारी पडले. ते माघ शुद्ध तृतीया, शके १८४० या दिवशी समाधिस्थ झाले. कोल्हापुरास पंचगंगेच्या तीरावर त्यांनी पूर्वीच आपल्या समाधीची जागा दाखवली होती, तेथेच समाधी बांधण्यात आली.

डॉ. वि.य. कुलकर्णी

रुकडीकर, विश्वनाथ महाराज