Skip to main content
x

शाह, लल्लुभाई आशाराम

         ल्लुभाई आशाराम शाह यांचा जन्म गुजरातमध्ये एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांचे वडील आशाराम दलीचंद शाह काठेवाडमधील अनेक संस्थानांचे कारभारी होते. लल्लुभाई शहा यांचे शालेय शिक्षण अहमदाबाद हायस्कूलमध्ये व उच्च शिक्षण अहमदाबादच्या गुजरात महाविद्यालयामध्ये झाले. १८९२ मध्ये गणितात एम.ए. आणि १८९४ मध्ये एलएल.बी. या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. त्यानंतर १८९५ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिली सुरू केली. त्यांना यशस्वी होण्यास वेळ लागला नाही. त्यांचे कायद्याचे ज्ञान आणि वकिलीतील कसब यांमुळे ते प्रसिद्धीस आले.

        १९१० मध्ये आणि पुन्हा १९११ आणि १९१२-१३ मध्ये हंगामी सरकारी वकील म्हणून लल्लुभाईंची नेमणूक झाली. ते एक अत्यंत उदार सरकारी वकील होते! केवळ आरोपी दोषी ठरून त्याला शिक्षा व्हावी असे नव्हे, तर न्याय झाला पाहिजे आणि तो होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण न्यायालयाला साहाय्य केले पाहिजे, असे ते मानीत.

        मार्च १९१३ मध्ये न्या.नारायण गणेश चंदावरकरांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला, तेव्हा त्यांच्या जागी लल्लुभाईंची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी लल्लुभाईंचे वय जेमतेम ४० वर्षांचे होते. आताच म्हटल्याप्रमाणे न्यायदान हे महत्त्वाचे, असे न्या. लल्लुभाई मानीत असल्याने, कायद्याच्या तांत्रिक बाबींच्या पलीकडे जाऊन खर्‍या अर्थाने न्याय देण्याचे त्यांचे नेहमी धोरण असे. त्यांचा मूळ विषय गणित असल्याने कुठल्याही खटल्यामधील विवाद्य प्रश्नांचे किंवा मुद्द्यांचे तर्कशुद्ध आणि सूत्रबद्ध विश्‍लेषण आणि विवेचन ते सहजगत्या करीत.

        त्या काळात हिंदू कायद्यासंबंधीचे अनेक खटले न्यायालयासमोर सतत येत असल्याने, त्यातील बारकावे समजावेत म्हणून न्या.शाह न्यायाधीश झाल्यानंतर संस्कृत शिकले आणि प्राचीन स्मृती वगैरे ग्रंथांतील वचनांचा अर्थ बदलत्या काळानुरूप लावण्याचे प्रयत्न त्यांनी  केले.

       न्या.शाह यांनी काही काळ उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले.

        स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई उच्च न्यायालयाच्या भारतीय न्यायाधीशांत न्या.लल्लुभाई शाह यांचे स्थान महत्त्वाचे आहे, यात शंका नाही.

- शरच्चंद्र पानसे

शाह, लल्लुभाई आशाराम