Skip to main content
x

साळुंखे, दत्ताजी कोंडिबा

         दत्ताजी कोंडिबा साळुंखे यांनी १९४९मध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्यांनी अमेरिकेतील मिशिगन राज्य विद्यापीठातून एम.एस्सी. व पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साळुंखे यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले व मदतही केली. डॉ. साळुंखे यांनी अमेरिकेतील उटाह राज्य विद्यापीठातील फळबाग विभागात सहयोगी संशोधक व नंतर तेथेच आहार व अन्नशास्त्र या विभागात प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी अमेरिकेतील फळबाग संघटनेचे, तसेच अन्नशास्त्र संस्थेचे सदस्य म्हणून काम केले. ज्येष्ठ मानद सदस्य आणि अतिथी व्याख्याते म्हणून त्यांचा अनेक विदेशी विद्यापीठांशी संबंध होता. विविध अन्नशास्त्र प्रयोगशाळांचे, अन्नप्रक्रिया संस्थांचे आणि ग्राहक संघटनांचे ते सल्लागार होते. डॉ. साळुंखे हे ३ नोव्हेंबर १९८० ते २२ एप्रिल १९८६ या काळात म.फु.कृ.वि.चे कुलगुरू होते. त्यांनी विद्यापीठाचे कामकाज, विकास योजना, संशोधनातील प्रगती आणि आर्थिक बाबींचा सखोल अभ्यास केला. त्यांनी सर्व प्राध्यापक वर्ग व इतर सर्व संवर्गांतील कर्मचारी यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण केली. डॉ. साळुंखे यांनी अनेक आवश्यक नवीन उपक्रम तत्परतेने सुरू केले. विद्यापीठात फळबाग महाविद्यालय, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, बागायती पाणी व्यवस्थापन, बियाणे कक्ष, पदवी स्तरावर बियाणे तंत्रज्ञानाचा नवीन कार्यक्रम त्यांच्या प्रोत्साहनानेच सुरू झाले. कृषि-संख्याशास्त्र विभागाची पुनर्रचना त्यांच्या आधिपत्याखाली करण्यात आली. त्यांनी विद्यापीठात पशुवैद्यकीय विभाग सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडून मान्य करून घेतला. फळबाग, गृहशास्त्र इ. अनेक नवीन आणि आवश्यक विभागांसाठी  संशोधन योजनांचा त्यांनी पाठपुरावा केला. डॉ. साळुंखे यांनी विस्तारशिक्षणाच्या संपूर्ण रचनेत परिस्थितीनुरूप व आवश्यकतेनुसार बदल केले. विद्यापीठाची विस्ताराची कार्ये परिणामकारक रीतीने राबवण्यासाठी अहमदनगर जिल्हा केंद्रस्थानी कल्पून त्यांनी सर्व योजनांची अंमलबजावणी केली. राज्य शासनाने सुरू केलेली प्रशिक्षण व भेट योजना विद्यापीठाकडून तीन जिल्ह्यांत राबवण्यात आली. अभ्यासक्रमाद्वारे पदव्युत्तर एम.टेक. (अभियांत्रिकी) व पीएच.डी. या पदव्या प्राप्त करण्यासाठी नियमावली व कार्यक्रमांची रचना करण्यात आली. प्रयोगशाळेतील आणि शेतीतील प्रत्यक्ष कामांना महत्त्वाचे स्थान देऊन अभ्यासक्रम व अंतिमतः शिक्षण अधिक परिणामकारक केले.

         डॉ. साळुंखे यांच्या प्रोत्साहनांमुळे अनेक अखिल भारतीय तांत्रिक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आणि यशस्वी संशोधनांवर आधारित अनेक कार्यक्रम घेण्यात आले. प्राध्यापक मंडळींना त्यांच्या संशोधनावर आधारित शास्त्रीय लेख लिहिण्यासाठी डॉ. साळुंखे यांनी प्रोत्साहित केले. त्यांचे २६० शास्त्रीय लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले.

- संपादित

साळुंखे, दत्ताजी कोंडिबा