सामंत मोहन
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या पिढीतील, कलेतील काही रूढ परंपरांना छेदत; परंतु पाश्चात्त्य शैली व विचारांचे अंधानुकरण न करता प्रयोगशील राहिलेल्या चित्रकारांपैकी मोहन सामंत हे एक प्रमुख चित्रकार होते.
भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला व नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद आणि उत्साह कलेसह सर्वच प्रांतांत ओसंडून वाहू लागला. अनेक वर्षांपासून गुलामगिरीत राहिलेल्या भारतीयांना ‘आपल्या’ भारतीयत्वाचा शोध नव्याने घ्यायचा होता. ह्या शोधातूनच 1948 मध्ये ‘प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रूप’ स्थापन झाला होता. मुंबई हे भारतीय कलेचे प्रमुख केंद्र, तर सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट हे या भागातील कलामहाविद्यालय प्रसिद्ध होते. बॉम्बे आर्ट सोसायटी तरुण कलाकारांना प्रोत्साहन देत असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वतंत्र नवविचारांचे वारे कलाक्षेत्रात वाहू लागले होते, तर याच स्वातंत्र्याने काही आव्हानेदेखील कलाकारांसमोर उभी केली होती.
एकीकडे पारंपरिक भारतीय कलेचा पगडा, तर दुसरीकडे आधुनिक कलेची ओढ; एकीकडे अजंठा भित्तिचित्रे, लघुचित्रे, गुहाचित्रे यांचा वारसा, तर दुसरीकडे आधुनिक कलाप्रवाहांचे भान आणि दडपण. या तणावातून जाणार्या व चित्रकलेत नवीन वाटा शोधणार्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे चित्रकार म्हणून मोहन सामंत यांचे नाव घ्यावे लागेल.
मोहन सामंत यांचा जन्म मुंबईत एका सधन, सुसंस्कृत व कलारसिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील शाळेत मुख्याध्यापक असल्याने घरात अनेक पुस्तके, मासिके, नियतकालिके यांची रेलचेल असे. सामंतांच्या सर्वच भावंडांना लिहिण्या-वाचण्याची, संगीत, नाटक व गाण्याची आवड होती. मोहन सामंतांनी मात्र आपल्या एकलकोंड्या स्वभावामुळे चित्र व संगीत यांच्याशीच मैत्री केली. अफाट वाचन, तल्लख बुद्धिमत्ता असूनही पिंड कलावंताचा असल्याने शालेय अभ्यासात सामंतांचे मन रमले नाही. त्यांना आपल्या घरातील चित्रांनी सजलेल्या भिंतींचे फार आकर्षण होते. त्यांत राजा रविवर्मांनी काढलेल्या यथार्थवादी, पौराणिक विषय असलेल्या, चित्रांच्या छापील प्रतिकृती होत्या, तसेच त्यांच्याच कुटुंबातील सभासदांची कृष्णधवल छायाचित्रे होती. त्यांच्या जोडीला सामंतांच्या आईने साकारलेल्या काही अद्भुत कलाकृती होत्या. त्या काळात रांगणार्या युरोपियन व भारतीय बाळांची कॅलेंडर्स मिळत. सामंतांच्या आई, त्या बाळांची चित्रे व्यवस्थित कापून त्यांना रंगीत कपडे, बटणे, कृत्रिम दागिन्यांनी सजवीत असे. ह्या उठावपूर्ण कृतींचे सामंतांना खूप अप्रूप होते.
गणेशोत्सवातील घरगुती सजावट स्पर्धेत सामंत भाग घेत. त्या ‘डायोरामा’ पद्धतीच्या देखाव्यांमध्ये ग्रमीण-शहरी दृश्ये असत. त्यांतील निसर्ग, सजावट, समाजजीवन साकारण्याच्या कृतीतच सामंतांच्या चित्रपद्धतीची मुळे दडलेली असावीत. सामंत जिजामाता उद्यानातील भाऊ दाजी लाड संग्रहालयासही नियमितपणे भेटी देत. तेथील एका दालनात भारताच्या विविध भागांतील, प्रांतांतील खेड्यांच्या लहान प्रतिकृतींचा (डायोरामा) एक विभाग होता. ग्रमीण-शहरी समाजजीवनाचे दर्शन घडविणार्या ह्या प्रतिकृती शक्य तितक्या हुबेहूब साकारलेल्या होत्या. हे तंत्रच पुढे सामंतांच्या चित्रांचा एक महत्त्वाचा घटक बनले.
मोहन सामंतांनी त्यांच्या चित्रांची सुरुवात १९४३ च्या दरम्यान स्वयंस्फूर्तीनेच केली. त्या वेळी वेगवेगळ्या चित्रकारांच्या नकला करणे, संग्रहालये व कलादालने यांना भेटी देणे व घरी आपल्या सारंगीवर तासन्तास रियाझ करणे ही त्यांची दिनचर्या होती. सामंत पुढे अतिशय कुशल सारंगीवादकही झाले. मॅट्रिक झाल्यानंतरही त्यांनी आपला सराव सुरूच ठेवला. १९४४-४५ च्या आसपास तेव्हा मुंबईच्या मेट्रो चित्रपटगृहात हॉलिवुडचे चित्रपट लागत. त्या चित्रपटांच्या पोस्टर्समधील नायक-नायिकांची व्यक्तिचित्रे अत्यंत हुबेहूब, रंगीत असत व चित्रपटातील वेगवेगळ्या प्रसंगांची रचना एकाच सपाट प्रतलावर केलेली असे. प्रमुख पात्रे मोठ्या आकारात, तर इतर प्रसंग उरलेल्या जागेत, ही वेगळ्या पद्धतीची मांडणी सामंतांना रोचक वाटली. मेट्रो चित्रपटगृहात त्या वेळी जेरार्ड यांच्या देखरेखीखाली तयार झालेली उत्थित भित्तिचित्रे (म्यूरल्स) लागली होती. जेरार्ड हे स्वत: युरोपीयन सर जे.जे. स्कूल अॅाफ आर्टचे संचालक व युरोपीय आधुनिक कलाप्रवाहांचे ज्ञान असलेले गृहस्थ होते. चित्रपटगृहाबाहेरील काहीशी उत्तान पोस्टर्स व आतील भित्तिचित्रे यांतील आधुनिक कलेसंदर्भातला नेमका फरक सामंतांच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही.
सामंतांनी १९४७ साली सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयात असतानाही सामंतांचे प्रयोग चालूच होते. याच दरम्यान सामंतांच्या चित्रांचे शिक्षक शंकर पळशीकर यांनी सखोल व काहीशा कठोरपणे परीक्षण केले व त्यांना आपल्या रंग, रंगछटा, रचना व सौंदर्यशास्त्राबद्दल अधिक संवेदनशील होण्यासाठी ‘बसौली’ लघुचित्रशैलीचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. पळशीकरांनी केलेल्या परीक्षणामुळे सामंतांच्या कामाला दिशा मिळाली. बसौली चित्रशैलीबरोबरच सामंतांनी जैन, कांग्र, पहाडी, राजस्थानी, दख्खनी व मुघल चित्रशैलींचाही अभ्यास केला. लघुचित्रशैलीचे एक प्रमुख अंग म्हणजे यथार्थदर्शनाचा अभाव; हे वैशिष्ट्य सामंतांच्या चित्रांचा प्रमुख भाग बनले.
सामंत १९५६ मध्ये इटलीच्या सरकारी शिष्यवृत्तीवर रोमला गेले. तिथे त्यांची शिष्यवृत्तीवर आलेल्या एका इजिप्शिअन चित्रकाराशी मैत्री झाली. त्याने सामंतांना इजिप्तला येण्याचे निमंत्रण दिले. इजिप्तच्या भेटीत त्यांनी इ.स.पूर्व ३००० ते विसाव्या शतकापर्यंतच्या जवळजवळ सर्वच ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. तेथील उत्थित भित्तिचित्रांमधील दृश्यभाषेचा बाज, पिरॅमिड्स, थडगी, शिल्पे यांनी सामंतांवर मोहिनी घातली. सामंत काही पुरातत्त्वज्ञ किंवा चिन्हमीमांसक नसले तरीही त्यांतील रंग-आकार-पोत यांचा तोल सामंतांना भावला. त्यांतील दृश्यसाधर्म्य तसेच ठेवून त्याची सांगड सामंतांनी भारतीय लघुचित्रांशी घातली.
पुढे १९५९ मध्ये सामंत रॉकफेलर शिष्यवृत्तीवर अमेरिकेला गेले. तेथे मिळणार्या कलासाहित्याच्या, वस्तूंच्या उपलब्धतेने ते भारावून गेले. विविध रंग, साहित्य, सहज सापडलेल्या वस्तू, खेळणी, आधुनिक रूपातील लघुचित्रे, इजिप्तमधल्या भित्तिचित्रांमधील विशिष्ट पद्धतीचे शिलालेख यांचा सार्वत्रिक परिणाम सामंतांच्या चित्रांत जाणीवपूर्वक दिसू लागला. जाणिवांचा इतिहास अपारंपरिक पद्धतीने मांडणारा चित्रकार व आदिमानवापासून ते आधुनिक कलेपर्यंतच्या स्मृति-संस्कारांतून एक वेगळी दृश्यभाषा बंडखोरपणे साकारणारे कलावंत म्हणून मोहन सामंत ओळखले जाऊ लागले.
पुरातन भारतीय सौंदर्यविचारांना छेद देत त्यांच्या चित्रांमध्ये पाशवी बळाच्या, पौरुषाच्या, मिनोटॉर किंवा बैलाच्या प्रतिमा येऊ लागल्या. मुक्त मानवी वासना आणि आत्मिक समतोल यांच्या तणावपूर्ण मांडणीमुळे त्यांची चित्रे नाट्यपूर्ण होत. इंग्रजांनी १५० वर्षांच्या राजवटीत भारतातील दृश्यकला व साहित्यातील सांस्कृतिक पाळेमुळे उद्ध्वस्त केली. सर्वसाधारण भारतीयांची सांस्कृतिक संवेदना देवळातील देवीदेवतांच्या पूजाअर्चा व कर्मकांडापुरत्याच सीमित राहिल्या. ह्या देवदेवतांमध्येच एक अत्याधुनिक विचार अंतर्भूत आहे याचा आपणांस विसर पडला. जसे प्राण्यांची डोकी असलेले मानव (गणपती, गरुड, तुंबरू, इ.), दोनपेक्षा अधिक हात असलेल्या देवदेवता, दहा डोकी असलेला रावण, साध्या दगडाला शेंंदूर फासल्यानंतर त्यास प्राप्त होणारे देवत्व अशा अमूर्त व एकाच वेळी आदिम आणि अत्याधुनिक सर्जनाकडे झालेले दुर्लक्ष सामंतांना खटकत असे.
पुढे नोकरी करीत असताना सिनेमाची पोस्टर्स रंगविणार्या एका चित्रकाराशी सामंतांच्या झालेल्या मैत्रीतून सामंतांनी चित्राच्या संदर्भातल्या काही गोष्टी पक्क्या केल्या. रंग भरपूर प्रमाणात, पॅलेट नाइफने लावणे, अनेक प्रसंग एकाच कॅनव्हासवर रेखाटणे, भारतीय लघुचित्रशैलीप्रमाणे परिप्रेक्ष्याचा वापर करणे, रंगलेपन उत्स्फूर्तपणे करणे ही सामंतांच्या चित्रांची वैशिष्ट्ये होती.
अपारंपरिक माध्यम व पद्धतीमध्ये काम करणारे मोहन सामंत हे त्यांच्या पिढीतील पहिलेच चित्रकार होते. केवळ ‘चित्र’ या रूढ संकल्पनेत न सामावणार्या कामाची ओळख प्रथम त्यांनीच करून दिली. त्यांच्या चित्रांत सुतळी, दोरी, काथ्या, तारा, विविध टाकाऊ वस्तू व प्लॅस्टर ऑफ पॅरिससारख्या पोत निर्माण करणार्या वस्तूंचा वापर असे. त्यांच्या कामाचे दृश्यमानबंध चित्र, शिल्प, भित्तिचित्र, सहज सापडलेल्या प्रत्यक्ष वस्तू यांनी समृद्ध होते. त्यांच्या चित्रांचे विषय पौराणिक असले तरी मांडणी मात्र रूढ पद्धतीच्या प्रसंगचित्रांसारखी नसे. एखाद्या प्रागैतिहासिक संस्कृतीच्या उत्खननाची आठवण करून देणारी असे. काहीशी त्रिमितीय भित्तिचित्रपद्धत, जाड रंगलेपन, लहान लहान आकारांच्या प्रत्यक्ष वस्तू व खेळणी, तारांपासून आकारास आलेल्या मानवाकृती यांचा वापर करून सामंत मिथकांचे जग आधुनिक पद्धतीने साकारत.
सामंतांनी अर्ध्याहून अधिक आयुष्य अमेरिकेत व्यतीत केले. परदेशी वातावरणाशी एकरूप होऊन, जागतिक कीर्तीच्या कलाकारांच्या मांदियाळीत राहूनही सामंत ‘भारतीय’च राहिले. ‘टाइम’ साप्ताहिकाने १९७३ मध्ये दिलेल्या वृत्तानुसार जगातील १०२ महान चित्रकारांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान मिळाले होते.
सामंतांनी आपले कलाशिक्षण १९५२ मध्ये पूर्ण केले. त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचा पुरस्कार मिळाला. त्यांना १९५६ व १९५८ मध्ये व्हेनिसच्या अतिमहत्त्वाच्या जागतिक द्वैवार्षिक (बिनाले) प्रदर्शनाचे निमंत्रण आले. सामंतांनी १९५७ व १९५९ मध्ये टोकियो, जपानमधील व १९६० मध्ये साओ पावलो येथील जागतिक प्रदर्शनांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांना १९५९ मध्ये न्यूयॉर्क येथे आशियाई सोसायटीची शिष्यवृत्ती मिळाली. तेथे त्यांनी १९६१ ते १९६५ दरम्यान चार एकल प्रदर्शने भरवली.
त्यांची चित्रे न्यूयॉर्कचे राष्ट्रीय संग्रहालय, वॉशिंग्टनचे राष्ट्रीय कलादालन व हिरशॉर्न संग्रहालय, मुंबईतील टीआयएफआर, पिट्सबर्गची कार्नेजी संस्था इ.च्या संग्रहात आहेत. १९६८ च्या भारतीय त्रैवार्षिक प्रदर्शनाबरोबरच देशविदेशांतील असंख्य प्रदर्शनांत सामंतांच्या चित्रांचा सहभाग होता. २००० मध्ये त्यांना अमेरिकेतील आशियाई-अमेरिकन हेरिटेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतात कायमचे वास्तव्य करण्यासाठी ते वयाच्या उतरत्या काळात आले, तेव्हा इथल्या कलाजगताचे चित्र पूर्ण बदलले होते. त्याच्याशी ते काही जुळवून घेऊ शकले नाहीत. त्यांचा भ्रमनिरास झाला आणि ते परत गेले. जागतिक कलाक्षेत्रातले अनेक मानसन्मान मिळूनही भारतात त्यांच्या कामाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. मोहन सामंत यांचे २००४ मध्ये त्यांच्या न्यूयॉर्क येथील निवासस्थानी निधन झाले.
- संतोष मोरे