Skip to main content
x

सामंत, शर्मिला अशोक

चित्रकार

           जागतिकीकरणाचे शहरातल्या गरिबांवर होणारे परिणाम आपल्या कलाकृतींमधून नाविन्यपूर्ण पद्धतीने मांडणार्‍या शर्मिला अशोक सामंत यांचा जन्म मुंबईत झाला. उमा आणि अशोक नारायण सामंत यांच्या त्या कन्या आहेत. शर्मिला सामंत यांनी १९८९ मध्ये सर जे.जे.  स्कूल ऑफ आर्टमधून बी.एफ.ए. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९९० मध्ये एल.एस. रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून इंटिरियर डिझाइन अँड डेकोरशन मधील पदविका मिळवली. राइक्स अकादमीची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे १९९८ ते २००० या काळात त्यांचे परदेशात वास्तव्य होते. १९९४ मध्ये त्यांना बेेंद्रे-हुसेन स्कॉलरशिप मिळाली.

           शर्मिला सामंत चेन्नईला असताना वल्सन कोल्लेरी या शिल्पकाराच्या सहवासात आल्या आणि कोल्लेरी यांची शिल्पांसाठी विविध द्रव्ये वापरण्याची पद्धत, रोजच्या वापरातील वस्तूंचे अर्थ वाकवून त्यांना शिल्पाकृतीचा दर्जा देण्याचे सामर्थ्य यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. अहमदाबाद येथे १९९३ मध्ये जे पहिले एकल प्रदर्शन झाले त्यात त्यांनी काष्ठ आणि टेराकोटा यांचा प्रभावी वापर केला होता.

           पादत्राणे, शीतपेयाच्या बाटल्या, बाटल्यांची झाकणे अशा रोजच्या वापरातील वस्तूंचा प्रतीकात्मक उपयोग करून शिल्पाच्या अथवा मांडणशिल्पाच्या आधारे शर्मिला सामंत समकालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतात. त्यांच्या कलानिर्मितीमध्ये कला आणि समाज यांच्यातला संवाद हा एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. शर्मिला सामंत आणि तुषार जोग यांनी ‘ओपन सर्कल’ ही सामाजिक व राजकीय विचारांनी प्रेरित दृश्यकलेला व्यासपीठ मिळवून देणारी संस्था १९९८ मध्ये स्थापन केली. जागतिक स्तरावरील वर्ल्ड सोशल फोरमच्या उपक्रमांमध्येही दोघांचा सक्रिय सहभाग होता.

           शर्मिला सामंत यांनी एका प्रदर्शनात ‘मेड टू ऑर्डर’ या नावाने एक साडी प्रदर्शित केली होती. ‘कोकाकोला’ पेयाची झाकणे (बिल्ले) एकमेकात गुंफून साडीचे हे वस्त्र तयार करण्यात आले होते. दुसर्‍या एका मांडणशिल्पात कोकाकोलाच्या बाटल्यांमध्ये स्थानिक शीतपेय भरून ते ठेवण्यात आले होते. आणखी एका मांडणशिल्पात बारा देशांमधून आणलेली पादत्राणे ठेवण्यात आली होती. त्यात या पादत्राणांच्या पार्श्‍वभूमीवर निऑन प्रकाशाचा उपयोग करून आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या बोधचिन्हांची (ब्रँडस्ची) प्रतिमा प्रक्षेपित (प्रोजेक्ट) करण्यात आली होती. ‘अगेन्स्ट द ग्रेन’ या मांडणशिल्पासाठी शर्मिला सामंत यांनी धान्याच्या कणग्यांचा वापर केला होता. जनुकीय तंत्रज्ञानाने विकसित केलेले बियाणे (जेनेटिकली मॉडिफाइड सीड) हे समाजाला कसे घातक ठरणार आहे, ते या मांडणशिल्पामधून सूचित करण्यात आलेले होते. कोकाकोलाच्या बाटल्या, बिल्ले यांच्या गुंफणीतून जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे सांस्कृतिक विविधता नष्ट होऊन एकाच प्रकारची संस्कृती कशी उदयाला येते आहे, त्याचे प्रतीकात्मक चित्रण येते. जी खरी संस्कृतिहीनतेची लक्षणे आहेत, ती आधुनिक संस्कृतीची चिन्हे म्हणून आजचा मध्यमवर्ग मिरवतो आहे. परदेशी बँ्रड्सचे आणि चंगळवादी संस्कृतीचे आकर्षण त्याला आहे. हा सारा आशय आणि त्यावरची एक तिरकस प्रतिक्रिया शर्मिला सामंत यांच्या कलाकृतींमधून व्यक्त होते.

           ‘लिसन टू युवर आय’ हे त्यांचे प्रदर्शन २०१२ मध्ये मुंबईत झाले. आपण सवयीने जे पाहतो, त्याच्यामागे अनेक गोष्टी दडलेल्या असतात. आपली बघण्याची आणि आकलनाची प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे, अशी एक भावना त्यामागे होती. शर्मिला सामंत यांच्या एकूणच कलानिर्मितीमागे प्रगतीच्या भ्रामक कल्पना, भ्रष्टाचार, शोषण, नागरी जीवनातले अनेक अंतर्विरोध व व्यापारीकरण आणि या सगळ्या देखाव्यामागे दडलेले सत्य शोधण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न आहे.

           आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी प्रदर्शने, कला मेळावे (आर्ट फेअर्स), काही वेगळ्या कलाकृतींच्या शोधात असलेले संयोजक (क्यूरेटर्स) यामुळे आशियाई देशांमधील - त्यातही चीन, भारत यासारख्या देशांमधील नव्या पिढीतील चित्रकारांच्या कलाकृतींना मागणी येऊ लागली आहे. जागतिकीकरण आणि तिसर्‍या जगातील देश असा विषय मांडणार्‍या चित्रकारांमध्ये सुबोध गुप्ता, जितिश कल्लट अशा भारतीय चित्रकारांच्या कलाकृतींचा एक प्रवाह आता मान्यता पावलेला आहे. शर्मिला सामंत या प्रवाहामधीलच एक कलावंत भाष्यकार आहेत.

- मेधा सत्पाळकर, दीपक घारे

सामंत, शर्मिला अशोक