सामंत, वसंत गजानन
वसंत गजानन सामंत (व्ही.जी. सामंत) यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरूळे येथे झाला. १९५६ साली सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून ते जी.डी. आर्ट, पेन्टिंग आणि ए.एम. झाले. त्यानंतर ते १९५९ साली फिल्म्स डिव्हिजनच्या कार्टून फिल्म विभागात रुजू झाले.
‘अॅनिमेशन’ हे तंत्र त्या काळात नवीन होते. सामंत यांनी या तंत्राचा अभ्यास केला. पंचवार्षिक योजनांची, सरकारी उपक्रमांची माहिती देणारे अॅनिमेशनपट या काळात फिल्म्स डिव्हिजनने तयार केले. सामंत यांचा त्यात महत्त्वाचा सहभाग होता. १९७२ मधील राष्ट्रीय एकात्मतेवरील ‘एकता का वृक्ष’ हा त्यांच्या उल्लेखनीय लघुपटांपैकी एक महत्त्वाचा अॅनिमेशनपट होय. त्यांच्या अनेक चित्रपटांना पारितोषिके आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.
त्यांनी १९९० मध्ये मुख्य अॅनिमेटर या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि स्वत:चा अॅनिमेशन स्टूडिओ सुरू केला. १९९५ मध्ये सिल्व्हर लाइनचा ‘सिल्व्हरटून’ स्टूडिओ साकारण्यास त्यांनी प्रेरणा दिली आणि त्याचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. या काळात सामंत यांनी अनेक अॅनिमेशन चित्रकार आणि तंत्रज्ञ प्रशिक्षण देऊन तयार केले. परदेशातील स्टूडिओजसाठी लाग-णार्या अॅनिमेशनपटांची निर्मिती त्यांनी या कलावंतांकडून करून घेतली.
सामंत यांनी २००८ पासून अॅनिमेशनचे शिक्षण देणारी ‘शारदाश्रम विद्यामंदिर स्कूल ऑफ अॅनिमेशन’ ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी संस्था सुरू केली. भारत सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि बांगलादेशमधील प्रौढांसाठी अॅनिमेशनचे शिक्षण देणार्या सात दिवसांच्या कार्यशाळा त्यांनी घेतल्या होत्या. सामंत यांचे नाव झाले ते २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान’ या पूर्ण लांबीच्या अॅनिमेशन चित्रपटामुळे. द्विमिती (टू-डी) अॅनिमेशन प्रकारातला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. यापूर्वी राममोहन यांनी ‘रामायणावरचा ‘द लीजंड ऑफ प्रिन्स राम’ हा अॅनिमेशनपट सहदिग्दर्शित केला होता; पण त्याची निर्मिती जपानमधली होती. सामंत ‘हनुमान’ या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २५० अॅनिमेशन चित्रकार दोन वर्षे काम करत होते.
‘हनुमान’मधल्या चाळीस व्यक्तिरेखांसाठी जवळपास वीस हजार स्वतंत्र प्रतिमा तयार करण्यात आल्या. ‘हनुमान’ या चित्रपटाची इतर अंगेही दर्जेदार असल्याने हा अॅनिमेशनपट आबालवृद्धांच्या पसंतीस उतरला आणि अॅनिमेशनपटांची एक लाटच आली.
सामंत यांना ‘हनुमान’ या चित्रपटासाठी २००६ साली ‘स्टार स्क्रीन’, ‘झी सिनेमा’ अवॉर्ड’, ‘आयफा’ अवॉर्ड, ‘फिकी’तर्फे ‘जीवनगौरव’ असे अनेक पुरस्कार मिळाले. अॅनिेमेशन चित्रपटांना भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवून देणारे अॅनिमेशन क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अॅनिमेशन तंत्राचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे कलाशिक्षक म्हणून व्ही.जी. सामंत यांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे.
- दीपक घारे, रंजन जोशी