Skip to main content
x

साने, चिंतामण रामचंद्र

      चिंतामण रामचंद्र साने यांचे वडीलही पशुवैद्य होते. पशुवैद्यकीय पदवी घेतल्यानंतर चिंतामण साने यांची १९४०मध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयात अध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर १९४५मध्ये पशु-संवर्धन आणि कृत्रिम रेतन या विषयातील इंग्लंडमधील उच्च शिक्षणासाठी त्यांची दोन वर्षांसाठी निवड झाली. या कालावधीत शिक्षणाबरोबरच इतर देशांनादेखील भेटी देऊन त्यांनी त्या देशातील पशु-संवर्धनातील प्रगतीसंबंधी माहिती घेतली. त्यांनी इंग्लंडमधून परतल्यानंतर १९५० साली महाराष्ट्रात कृत्रिम रेतनाचे तंत्रज्ञान प्रथमच प्रचारात आणले व गायी आणि म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे कार्य सुरू करून पशु-प्रजननशास्त्रात एक नवा अध्याय जोडला.

      डॉ. साने यांची १९५४मध्ये स्टॉकहोम (स्वीडन) येथील पशु-प्रजननविषयक अभ्यासक्रमासाठी निवड झाली. अभ्यासक्रम पूर्ण करून ते १९५५मध्ये भारतात परतले आणि मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करू लागले. या महाविद्यालयात स्वतंत्र प्रसूतिशास्त्र विभाग सुरू करण्याची त्यांची इच्छा होती, तथापि, अखिल भा.कृ.अ.सं.ने या कामासाठी वेगळा निधी देण्यापूर्वी महाविद्यालयाने प्रारंभी गुरांमधील वांझपणाविषयक अभ्यास योजना राबवण्याची अट घातली. डॉ. साने यांनी मोठ्या आनंदाने सदर योजना राबवली. पुढे यथावकाश या योजनेचे रूपांतर १९५८मध्ये स्वतंत्र पशु-प्रसूतिशास्त्र विभागात करण्यात आले. डॉ. साने यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात अध्यापन, संशोधन आणि विस्तार याविषयी कामे सुरू झाली.

      डॉ. साने यांनी मुंबई विद्यापीठाच्या तंत्रविज्ञान विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम केले. ते पशु-प्रजननविषयक अभ्यासकांच्या अखिल भारतीय संघटनेचे संस्थापक सदस्य होते. या संघटनेने अध्यक्ष म्हणून त्यांची १९७२-७३मध्ये निवड झाली होती. ‘पाळीव प्राण्यांमधील प्रजनन’ (थेरीओजेनॉलॉजी) हे पुस्तक १९८१मध्ये प्रकाशित करण्यामध्ये डॉ. साने यांचा सक्रिय सहभाग होता. हे पुस्तक पदवी परीक्षा, पदव्युत्तर परीक्षा आणि संशोधक यांना तर आहेच शिवाय उष्ण कटिबंधातील पाळीव प्राण्यांमधील (ज्यात म्हशी व उंट यांचा समावेश आहे) प्रजननाच्या अभ्यासासाठीसुद्धा पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासले जाते. या पुस्तकाची १९९८मध्ये द्वितीयावृत्ती प्रसिद्ध झाली. डॉ. साने यांना पशु-प्रजननशास्त्रातील उत्कृष्ट संशोधनपर साहित्य प्रकाशनाबद्दल निल्स लॅगरलॉफ स्मृती पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. ते १९७१मध्ये सेवानिवृत्त झाले.

- संपादित

साने, चिंतामण रामचंद्र