Skip to main content
x

साने, प्रफुल्लचंद्र विष्णू

     डॉ. प्रफुल्लचंद विष्णू साने यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या गावी झाला. नागपूरच्या महाविद्यालयामधून कृषि-विज्ञानात बी.एस्सी. आणि एम.एस्सी. या पदव्या मिळवल्यावर ते चार वर्षे दिल्लीच्या ‘इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट’मध्ये साहाय्यक संचालक होते. त्यांनी कॅनडामधील अल्बर्टा विद्यापीठातून पीएच.डी. केली. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या बर्कले येथील प्रयोगशाळेत तीन वर्षे संशोधन केले. भारतात परतल्यावर, मुंबईत भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये चौदा वर्षे संशोधन केल्यावर १९८३ साली ते लखनौच्या राष्ट्रीय वनस्पती विज्ञान संशोधन संस्थेचे उपसंचालक म्हणून रुजू झाले. तेथे ते संचालक झाले आणि १९९७ साली निवृत्त होऊन लखनौमध्येच स्थिरावले. 

     साने यांनी वनस्पती, जीवरसायनशास्त्र या विषयांत महत्त्वाचे संशोधन केले आहे. खास करून प्रकाश संश्‍लेषणासंबंधीच्या त्यांनी केलेल्या संशोधनास जगन्मान्यता मिळाली आहे. हरित वनस्पती प्रकाश संश्‍लेषणाद्वारे अन्ननिर्मिती करतात. या क्रियेमध्ये सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषून घेण्याचे महत्त्वाचे कार्य हरितद्रव्यामुळे होते. हे हरितद्रव्य (क्लोरोफिल) क्लोरोप्लास्ट कणांमध्ये सामावलेले असते. या क्लोरोप्लास्टची घडण आणि त्याची कार्यप्रणाली यांवर महत्त्वाची माहिती मिळवणे, हा त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू होय. क्लोरोप्लास्टच्या थायलाकॉइड आवरणातील महत्त्वाच्या एन्झाइमची स्थळे त्यांनी सुचवली. त्याचप्रमाणे, आवरणांतील प्रथिनांत प्रोटॉनच्या प्रवासाचा सहभाग असतो, हेही त्यांनी दाखवून दिले. आवरणांतून जाणाऱ्या प्रकाशलहरींच्या त्यांच्या संशोधनामुळे वनस्पतींतील ऊर्जासाठवणीच्या क्रियेवर प्रकाश पडला.

     क्षार, उच्च तापमान, प्रखर उन्हे, जमिनीत अल्कलींचे अधिक प्रमाणात अस्तित्व, अशा तणावांखाली वाढणाऱ्या वनस्पतींत अनुकूलनक्षमता कशी निर्माण होते, यावर त्यांचे बरेच संशोधन आहे. या संशोधनात मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर भारतातील उसर (भारी प्रमाणांत अल्कली असलेल्या) जमिनींवर झाडांची लागवड करणे शक्य होते.

     मक्यासारखी काही सी-४ धान्य-वनस्पती, एन्झाइमच्या साहाय्याने हवेतून घेतलेल्या कार्बन-डाय-ऑक्साइडचे नियमन करतात आणि जास्त अन्ननिर्मिती करतात. या तऱ्हेच्या प्रकाश संश्‍लेषण क्रियेत मॅलिक एन्झाइम, फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बोझायलेज, इत्यादी एन्झाइम्सचे नियमन केले जाते, असे साने आणि त्यांचे सहकारी यांनी केलेल्या संशोधनात आढळून आले. या माहितीचा उपयोग कृषी उत्पादन वाढण्यासाठी होऊ शकतो.

     संचालक झाल्यावर लखनौच्या राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेत त्यांनी बरेच नवीन उपक्रम सुरू केले. संस्थेत अनेक वर्षे चालू असलेल्या पारंपरिक संशोधनाबरोबरच त्यांनी जीवरसायनशास्त्र, फिजिऑलॉजी, पर्यावरणशास्त्र, वृक्षजीवशास्त्र इत्यादी नवीन संशोधन शाखा सुरू केल्या. अद्ययावत तंत्रसामग्री आणून नव्या संशोधनास चालना दिली. जैव तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मदत मिळवून मॉलिक्यूलर बॉटनी आणि जैव तंत्रज्ञान या शाखांच्या संशोधनासाठी नवीन प्रयोगशाळा उभारल्या. ‘सेंटर फॉर प्लँट मॉलिक्यूलर बायॉलॉजी’ (सी.पी.एम.बी.) सुरू केले. कीटकांपासून स्वसंरक्षण करू शकणाऱ्या वनस्पतींची निर्मिती केली. फुलपाखरांपासून स्वत:चे रक्षण करणाऱ्या तंबाखूच्या ट्रान्सजेनिक जाती तयार केल्या. ज्वारी आणि तांदूळ या महत्त्वाच्या पिकांतील पुंकेसरांच्या नपुंसकतेची कारणमीमांसा केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी संस्थेत दक्षिण आशियाई देशांतील कडधान्यांच्या माहितीचे संकलन आणि प्रसारण केंद्र सुरू केले. संस्थेतील शास्त्रज्ञांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रयोगशाळांत कामाचा अनुभव देण्यासाठी उत्तेजन दिले, परदेशांतल्या प्रयोगशाळांत प्रवेश आणि भेटी देववल्या, आणि त्यांच्या कार्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी सक्रिय साहाय्य दिले.

     काही प्रकारची कामे शासनाच्या नियमांच्या चौकटीत बसून करणे कठीण असते या जाणिवेने त्यांनी ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर एन्व्हायर्नमेंटल बॉटनिक्स’ (आय.एस.ई.बी.) या स्वयंसेवी संस्थेची १९९४ साली स्थापना करून तिला आपल्या राष्ट्रीय प्रयोगशाळेकडून सर्व प्रकारची मदत केली. या संस्थेतर्फे स्थानिक शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेसाठी पर्यावरण रक्षण, जीववैविध्य जोपासना, वनस्पती संपत्तीचा शाश्वत प्रकारे उपयोग करण्याच्या पद्धती इत्यादींचे अनौपचारिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली. आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन केले.

     सेवानिवृत्तीबरोबरच या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रेही त्यांनी संस्थेच्या नव्या अध्यक्षांकडे सुपूर्द केली. मात्र संस्थेने त्यांची सल्लागार म्हणून निवड केली आणि त्यांच्या तज्ज्ञतेचा लाभ घेणे चालू ठेवले. त्यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनेक नियतकालिकांत आणि पुस्तकांत प्रसिद्ध झाले आहेत. संशोधनाबद्दल त्यांना मिळालेल्या सन्मानांची यादी मोठी आहे. कॉमनवेल्थ फेलोशिप, अलेक्झांडर फॉन हुम्बोल्ट फेलोशिप आणि १९८१ साली बहुमानाचे एस.एस. भटनागर पुरस्कार त्यांना मिळाले होते. नागपूर विद्यापीठ सुवर्णपदक, बिरबल सहानी सुवर्णपदक आणि भारत ज्योती ‘सायंटिस्ट ऑफ द इयर’ त्यांना बहाल करण्यात आले होते.

     याशिवाय ते पुढील संस्थांचे फेलो म्हणून निवडले गेले आहेत: इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी (दिल्ली), इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस (बंगळुरू), नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (अलाहाबाद), नॅशनल अकॅडमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेस (दिल्ली), महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस, इत्यादी.

     विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली या संस्थेचे ते १९८६-८७ साली व्याख्याता होते व दिल्लीतीलच इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे १९९६ ते १९९८ सालांत ‘तज्ज्ञ परिषद’ सभासद होते.

     सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे संशोधन कार्य चालूच आहे. स्वीडन आणि कॅनडा येथील संस्थांमध्ये ते दरवर्षी तीन ते पाच महिने संशोधन कार्यात मग्न असतात. ‘जैन इरिगेशन सिस्टिम्स’ या महाराष्ट्रातील उद्योगाचे ते सल्लागार आहेत. तेथे जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारून त्यांनी संशोधनास दिशा दिली. ऊतीसंवर्धनामार्गे पिकांचा दर्जा उंचावण्यास मदत केली.

     संशोधनाने मानसिक समाधान मिळते आणि सल्लागार या नात्याने उत्पन्न वाढवून शेतीव्यवसाय फायद्यात चालवता येतो, या दोन्ही गोष्टी आत्यंतिक समाधानाच्या व आनंदाच्या आहेत, असे डॉ.साने यांचे मत आहे.

डॉ. शरद चाफेकर

साने, प्रफुल्लचंद्र विष्णू