Skip to main content
x

सांकलिया, हंसमुख धीरजमल

     भारतातील पुरातत्त्व संशोधनाला जागतिक मान्यता मिळवून देणारे डॉ. हंसमुख धीरजमल सांकलिया यांचा जन्म मुंबई येथे झाला. बी.ए., एलएल.बी. केल्यानंतर १९३२ साली मुंबई विद्यापीठातूनच प्राचीन भारतीय इतिहासात त्यांनी एम.ए. ही पदवी मिळवली. त्यानंतर १९३५ साली चान्हुदारो येथे व १९३६ साली मेडन कैसल येथे त्यांनी क्षेत्रीय पुरातत्त्वाचे प्रशिक्षण घेतले. १९३७ साली लंडन विद्यापीठातून पुरातत्त्वात त्यांनी पीएच.डी. मिळवली. त्यासाठी त्यांनी ‘गुजरातचा पुरातत्त्वीय अभ्यास’ केला.

     काश्मीरपासून केरळपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत संपूर्ण भारतभर पुरातत्त्वीय ठिकाणांच्या शोधासाठी त्यांनी क्षेत्रीय सर्वेक्षण केले. सांकलियांच्या मार्गदर्शनाखाली गुजरातमध्ये लांघनाज, अखज, वलसाना, द्वारका व सोमनाथ येथे; महाराष्ट्रात कोल्हापूर, जोर्वे, नाशिक, नेवासा, चिर्की-नेवासा व इनामगाव येथे; मध्यप्रदेशातील महेश्वर, नवदातोली, त्रिपुरी व कायथा येथे; कर्नाटकात संगतकल्लू व टेक्कलाकोटा येथे; राजस्थानातील अहार व आंधप्रदेशातील बेटमचेरिया येथे उत्खनन झाले.

     उत्खननाच्या आधारे द्वारकेची प्राचीनता महाभारत काळापर्यंत जात नाही, हे त्यांनी सिद्ध केले होते. तसेच, भूगोल व वाङ्मयाच्या आधारे रावणाची लंका म्हणजे सध्याचा श्रीलंका देश नाही, असे मत त्यांनी मांडले होते. संस्कृतवरही त्यांचे प्रभुत्व होते.

     १९३९ ते १९७३ सालापर्यंत डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्वविभागाचे प्रमुख, १९५६ ते १९५९ सालापर्यंत डेक्कन कॉलेजचे प्रभारी संचालक, १९६० ते १९६८ सालापर्यंत डेक्कन कॉलेजचे सहसंचालक व १९७० ते १९७३ सालापर्यंत डेक्कन कॉलेजचे संचालक अशी पदे त्यांनी भूषविली. याशिवाय १९७४ ते १९७६ सालापर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाचे शिक्षक, १९७३ ते १९८९ सालापर्यंत पुरातत्त्वातील एमेरिटस प्रोफेसर पद व १९७५ ते १९८९ सालापर्यंत टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे मानद संचालक म्हणून त्यांनी काम केले.

     त्यांच्या संशोधनकार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. यात मुंबई विद्यापीठाचा भगवानलाल इंद्रजी पुरस्कार, रॉयल एशियाटिक सोसायटी, मुंबई यांचे रौप्यपदक, गुजरात साहित्य सभा, अहमदाबाद यांचे सुवर्णपदक, दादाभाई नवरोजी पुरस्कार, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल, कोलकाता यांचे चक्रवर्ती रौप्यपदक, कोलकाता विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागातर्फे रॉबर्ट ब्रूस फूट पदक, दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत यांचा ओम हरी पुरस्कार व एशियाटिक सोसायटी, मुंबई यांचे कॅम्पबेल स्मृती सुर्वणपदक यांचा समावेश आहे. त्यांची संशोधनात्मक २४ पुस्तके प्रसिद्ध झाली. १९६३ साली प्रथम प्रकाशित झालेले ‘प्री हिस्टरी अ‍ॅण्ड प्रो हिस्टरी इन इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान’ हे त्यांचे पुस्तक आजही प्रमाण पुस्तक म्हणून वापरले जाते. इंट्रोडक्शन आर्किऑलॉजीच्या मराठीत प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकाला भारत सरकारचा व ‘आर्किऑलॉजी अ‍ॅण्ड द रामायण’ या पुस्तकाच्या गुजरातीतील आवृत्तीला गुजरात सरकारचा पुरस्कार लाभला.

     ऑल इंडिया संस्कृत अकॅडमी, लखनऊ, द हेरास सोसायटी, सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई यांचे सन्माननीय फेलो म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.

     महेश्वर, मध्य भारत स्टेट, १९५४, अहमदनगर महानगरपालिका, १९७३ व पुणे महानगरपालिकेने त्यांना मानपत्र देऊन गौरवले होते. अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालयातर्फे त्यांना प्रा.एन.जी. नारळकर विद्वत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. १९७४ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण देऊन त्यांना गौरविण्यात आले.

     त्यांचे पुणे येथे निधन झाले.

डॉ.सविता घाटे

सांकलिया, हंसमुख धीरजमल