Skip to main content
x

शास्त्री, अजय मित्र

     जय मित्र शास्त्री यांचा जन्म मध्य प्रदेशातील गुणा येथे झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार होते. १९५७मध्ये बनारस विद्यापीठातून प्राचीन भारताचा इतिहास व संस्कृती हे विषय घेऊन ते पहिल्या वर्गामध्ये एम.ए. झाले. पुढे त्यांनी १९६२साली नागपूर विद्यापीठामधून पीएच.डी. आणि १९८६साली डी.लिट. या पदव्या सन्मानपूर्वक प्राप्त केल्या.

     प्रा. शास्त्री हे एक विद्वान व निष्ठावान अध्यापक होते. १९५७पासून ते नागपूर विद्यापीठातील ‘भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व’ विभागामध्ये अध्यापन करत असत आणि १९९४साली ते त्याच विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले.

     स्वत:च्या अध्यापनाच्या जबाबदार्‍या सांभाळून त्यांनी पवनार, टाकळघाट, खापा, पवनी, माहुरीझरी, भोकरदन व मांदल अशा ठिकाणच्या उत्खननांत भाग घेतला. या क्षेत्रातील उत्खननाबद्दलचा अहवालात लेखन केले. भारतातील शिलालेख आणि मुद्रा (नाणी) या विषयांचे ते जाणकार आहेत व त्या शाखांच्या प्रगतीस त्यांनी हातभार लावलेला आहे.

     आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये प्रा. शास्त्रींचा अनेक शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्थांशी संबंध आला. युनिव्हर्सिटी ग्रँट्स् कमिशनच्या अनेक समित्यांचे ते सदस्य होते.

     भारताच्या पुरातत्त्व संशोधन विभागाच्या ‘शिलालेख आणि मुद्रा’ विषयक सल्लागार समितीचे ते सदस्य होते. तसेच ‘जर्नल ऑफ द न्युमिसमॅटिक सोसायटी ऑफ इंडिया’, ‘दि एपिग्रफिक सोसायटी ऑफ इंडिया’ आणि ‘न्युमिसमॅटिक डायजेस्ट’ यांसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांचे ते संपादकही होते.

     प्रा. शास्त्री यांनी एम. सोमशेखर शर्मा स्मृती व्याख्यानमाला, महाराजा रणवीरसिंह स्मृती व्याख्यानमाला, व्ही. एस. अगरवाल स्मृती व्याख्यानमाला आणि डॉ. एस. पी. तिवारी स्मृती व्याख्यानमाला अशा विद्वन्मान्य व्याख्यानमालांमधून भाषणे दिली आहेत.

     प्रा. शास्त्री यांनी वीस पुस्तके लिहिली आहेत, अनेक पुस्तकांचे संपादन केले आहे आणि त्यांचे ३५०पेक्षा अधिक शोधनिबंध व परीक्षणे यांचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून झाले आहेत.

     प्रा. शास्त्री यांना मध्य प्रदेश शासनाच्या साहित्य परिषदेचा अखिल भारतीय रवींद्र साहित्य पुरस्कार-१९७१, न्युमिसमॅटिक सोसायटी ऑफ इंडिया यांचे अकबर रजत पदक-१९८४, न्युमिसमॅटिक सोसायटी ऑफ इंडिया यांचे आळतेकर पदक-१९८२, एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे यांचे कॅम्पबेल स्मृती सुवर्ण पदक-१९९२-१९९५ आदी पुरस्कार प्राप्त झाले.

    प्रा. शास्त्री यांनी सत्र अध्यक्ष- इंडियन हिस्ट्री काँग्रेस- १९७८, अध्यक्ष-एपिग्रफिकल सोसायटी ऑफ इंडिया- १९८७, अध्यक्ष - इंडियन हिस्ट्री अ‍ॅण्ड कल्चरल सोसायटी-१९९१, अध्यक्ष-इंटरनॅशनल कलोक्विअम ऑन कॉइनेज, ट्रेड अ‍ॅन्ड इकॉनॉमी - १९९१, अंशत: अध्यक्ष - ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स १९९४ पदे भूषवली.

- र. वि. नातू

शास्त्री, अजय मित्र