Skip to main content
x

सातारकर, कांताबाई

         स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या कलेद्वारे तमाशाचे नाव सर्वदूर पोहोचविण्याचे काम कांताबाईंनी केले. एक उत्तम अभिनेत्री, दिग्दर्शक, शाहीर व व्यवस्थापक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखविले. त्यांनी १९४८ ते ८५ पर्यंत तमाशा रंगभूमीवर वावरताना अक्षरश: शेकडो भूमिका जिवंत केल्या.

कांताबाई सातारकरांचा जन्म गुजरातमधील डिंबा (जि. बडोदे) या छोट्याशा गावात झाला. आई-वडील दोघेही दगडाच्या खाणीत काम करायचे. पुढे कुटुंब सातार्‍यात स्थायिक झाले. तिथल्या नवझंकार मेळ्यात कांताबाईंनी वयाच्या नवव्या वर्षी सर्वप्रथम काम केले. त्यांनी काही दिवस स्थानिक तमाशात काम केले. पुढे त्यांनी याच क्षेत्रात मोठे नाव मिळवायचे या हेतूने मुंबई गाठली. मुंबईत सुरुवातीला दादू इंदुरीकरांच्या तमाशात व नंतर तुकाराम खेडकरांच्या तमाशात त्यांनी काम करायला सुरुवात केली.

त्यांचा १९५५ मध्ये तुकाराम खेडकरांशी विवाह झाला. खेडकरांच्या सोबतीने त्यांनी अनेक वगनाट्यांतून भूमिका केल्या. त्यांच्या अभिनयाला सर्वत्र दाद मिळू लागली. अनिता, अलका, रघुवीर व मंदा या चार अपत्यांच्या जन्मानंतर अचानक तुकाराम खेडकरांचे निधन झाले. पुढची तीन-चार वर्षे अतिशय कठीण गेली. कांताबाईंनी काही दिवस खानदेशातील आनंदराव महाजन यांच्या तमाशात काम केले. इतके दिवस फड मालकिणीच्या भूमिकेत असणार्‍या कांताबाईंनी पुन्हा जिद्दीने उभे राहण्याचे ठरवले. अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी स्वत:चा तमाशा फड उभा केला.

त्यांचे रायगडची राणी’, ‘गवळ्याची रंभा’, ‘पाच तोफांची सलामी’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरीअसे असंख्य वग संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजले. तमाशा क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यातही कांताबाईंचा हातखंडा होता. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक अशा विविध प्रकारच्या वगनाट्यांतून त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. कांताबाईंचा तमाशा फड १९८० पासून पुढे महाराष्ट्रातील अग्रगण्य तमाशा फड म्हणून गणला जाऊ लागला. मुलगी अनिता व मंदा यांनी आपल्या नृत्याच्या व अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली. दुसरी मुलगी अलका गायिका म्हणून, तर मुलगा रघुवीर महाराष्ट्रातील अव्वल सोंगाड्या म्हणून परिचित आहे.

मागील पाच दशकांत असंख्य पुरस्कार मिळवणार्‍या कांताबाई सातारकर व त्यांची सर्व मुले संगमनेरला आपली कर्मभूमी मानतात. दिल्ली येथे २०१० मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सप्रसंगी दिल्ली व चंदिगड येथे तमाशा सादर करण्याचा मान श्रीमती कांताबाईंच्या तमाशा फडाला मिळाला. आज त्यांची तिसरी पिढीदेखील तमाशाच्या रंगभूमीवर आपल्या कलेद्वारे रसिकांचे मनोरंजन करीत आहे. तमाशा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना जीवन गौरवपुरस्काराने सन्मानित केले आहे.

संतोष खेडलेकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].