Skip to main content
x

सातारकर साहेबराव राजाराम

            अमरावतीतील एका शेतकरी कुटुंबातील साहेबरावांनी, कलेची कोणतीही कौटुंबिक पार्श्‍वभूमी नसताना शिल्पकलेच्या आवडीमुळे त्याचे रीतसर शिक्षण घेतले. स्वतःतील कलागुण, चिकाटी, जिद्द व परिश्रम या गुणांच्या जोरावर विदर्भाच्या परिसरात शिल्पक्षेत्रात त्यांनी आपल्या नावाची मोहर उठविली. त्यांच्या आईचे नाव जनाबाई होते. त्यांचे पाळण्यातील व कागदोपत्री असलेले नाव साहेबराव हेच आहे. त्यांचे शालेय शिक्षण खामगाव येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयात, १९५६ ते १९६१ या काळात झाले. अमरावतीत त्या काळात गणपती बनविण्याचा व्यवसाय, मूर्ती, शिल्पे घडविण्याची कामे थोड्या प्रमाणात होत असली तरी शिल्पकलेच्या रीतसर औपचारिक शिक्षणाची सोय नव्हती. खामगावच्या त्याच टिळक राष्ट्रीय विद्यालयात पंधे गुरुजी कलाशिक्षण देणारा वर्ग चालवीत असत. साहेबरावांनी १९६१ ते १९६५ या काळात तेथे शिल्पकलेचे शिक्षण घेतले. ते १९७० पर्यंत आपल्या या गुरूंबरोबर काम करताना प्रात्यक्षिके, शिबिरे अशा उपक्रमांत सहभागी होते.

              उपजीविका किंवा चरितार्थासाठी त्यांनी वेगळी नोकरी किंवा व्यवसाय केला नव्हता. पुण्याच्या टिळक स्मारक विद्यापीठातून त्यांनी १९७३ मध्ये ‘मूर्तिकला विशारद’ ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर अमरावती येथे ‘आर्ट टीचर डिप्लोमा’चा शिक्षणक्रम उपलब्ध झाल्यावर त्यांनी १९७५ मध्ये ते शिक्षण घेतले. त्यांचा विवाह सुलभा पांडे यांच्याबरोबर २० एप्रिल १९६५ रोजी झाला. विवाहानंतर त्यांचे नाव सुलोचना झाले. त्यांनीही शिल्पकाम शिकून घेतले व त्या साहेबरावांना त्यांच्या शिल्पकामात मदत करीत असत.

              शिल्पकलेतील प्रगतीकरिता साहेबराव स्वतंत्रपणे १९७० पासून शिल्पनिर्मिती करू लागले. त्यासाठी त्यांनी फाउण्ड्रीच्या  सोयीसह आपला स्वतःचा स्टूडिओ सुरू केला. त्यांनी केलेली व्यक्तिशिल्पे विदर्भात बर्‍याच ठिकाणी, मोक्याच्या जागी उभारली गेली आहेत. त्यांतील ब्राँझमधील काही पुढीलप्रमाणे :   पंजाबराव देशमुख, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शेगावचे संत श्रीगजानन महाराज, संत गाडगेबाबा, इंदिरा गांधी इत्यादींची शिल्पे नागपूर, अमरावती, मध्यप्रदेश अशा ठिकाणी उभारलेली आहेत. दर्यापूर येथील अश्‍वारूढ शिवाजी, डॉ. हॅनिमन (होमिओपॅथीचे डॉक्टर), संत तुकडोजी महाराज ही त्यांची आणखी काही उल्लेखनीय शिल्पे होत.

              परदेशात आफ्रिका व अमेरिका येथे त्यांच्या शिल्पाकृती प्रदर्शित झाल्या आहेत. शेकडो वर्षांपूर्वीच्या  मोहंजोदडो येथील ‘नर्तिका’ हे शिल्प १९२६ मध्ये सापडले होते. त्या प्रसिद्ध शिल्पाच्या प्रतिकृतीकरून त्यांनी त्या अमेरिकेतील आर्किटेक्चर संस्थेकरिता पाठविल्या.   

              महाराष्ट्र राज्याच्या सत्तेचाळिसाव्या राज्य कला प्रदर्शनाच्या वेळी, ५ जानेवारी २००७ रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.

              ऑल इंडिया आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटी, दिल्ली यांच्यातर्फे संस्थेच्या  प्रदर्शनाच्या वेळी, २०१० मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, ललित कला अकादमी, नवी दिल्लीद्वारा प्रकाशित ‘हिस्टॉरिक डेव्हलपमेंट ऑफ कन्टेम्पररी इंडियन आर्ट, १८८० ते १९७४’ या ग्रंथात शिल्पकार साहेबराव व त्यांच्या पत्नी सुलोचना यांचा गौरवपूर्वक उल्लेख आहे. हे पति-पत्नी आपल्या ‘शिल्पज’ या स्टूडिओत कार्यमग्न असत.

              अमरावती येथे डॉ. भाऊसाहेब देशमुख आर्ट अकादमीमार्फत १९८९ पासून राष्ट्रीय पातळीवरचे स्पर्धात्मक प्रदर्शन केले जाते. सदरहू उपक्रमास कायमस्वरूपी जागा मिळवून देऊन तो उपक्रम सातत्याने पार पाडण्यात साहेबरावांचा मोठा सहभाग असे तसेच या संस्थेचे म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

- प्रा. सुभाष बाभूळकर

सातारकर साहेबराव राजाराम