Skip to main content
x

सातपुते, रामचंद्र व्यंकटेश

रामचंद्र व्यंकटेश सातपुते यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सोनेगाव येथे झाला. त्यांचे वडील व्यंकटेश चिमणाजी सातपुते हे सार्वजनिक बांधकाम खात्यात भांडारपाल म्हणून कोपरगाव येथे काम करत होते. सातपुते यांचे प्राथमिक शिक्षण कोपरगाव येथे आणि माध्यमिक शिक्षण संगमनेर येथील पेटिट हायस्कूलमध्ये १९२२ ते १९२६पर्यंत झाले. ते १९२७मध्ये पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातून मॅट्रिक झाले. ते २ वर्षे फर्ग्युसन महाविद्यालयातून शिकले व नंतर पदविकेसाठी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात १९२८मध्ये दाखल झाले. तेथून ते १९३१मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची ५ मे १९३२ रोजी सिंचन खात्यामध्ये पर्यवेक्षक म्हणून नेमणूक झाली व नंतर ऑक्टोबर १९४१मध्ये शेतकी खात्यामध्ये वरिष्ठ सर्वेक्षक म्हणून मृदा संधारण कामासाठी नेमणूक झाली. त्यांच्याकडे गोदावरी लेफ्ट बँक कॅनालच्या सर्वेक्षणाचे काम होते. १९५०च्या दशकात मृदा संधारणास चालना मिळून समपातळीतील बांध बांधणे आवश्यक ठरले. मृदा संधारण कामामध्ये सातपुते यांनी समपातळीतील बांध, ग्रेडेड बांध, टेरेसिंग, नाला बंडिंग, नाला ट्रेनिंग, ग्रास लँड डेव्हलपमेंट, अफॉरेस्टेशन, हॉर्टिकल्चरल डेव्हलपमेंट आणि घायपात लागवड इ. यशस्वीपणे पूर्ण केली.

सातपुते यांची कामाची पद्धत व उरक पाहून सरकारने त्यांना ३० सप्टेंबर १९६७ या निवृत्तीच्या तारखेनंतरही एक वर्ष वाढवून दिले होते. सरकारी नोकरीतून २९ सप्टेंबर १९६८मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भूविकास बँक, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले. तेथून त्यांनी ३० जून १९७५मध्ये निवृत्ती स्वीकारली. ते १९५५ ते १९६० या काळात अहमदनगर येथे असताना त्यांच्या कामावर फिल्म्स डिव्हिजनचे जगत मुरारी यांनी एक लघुपट तयार केला होता. त्यामध्ये मृदा संधारणामुळे शेतकऱ्यांना झालेले फायदे दाखवण्यात आले आहेत.

- प्रा. शाम दत्तात्रेय घाटपांडे

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].