Skip to main content
x

साठे, दिनकर दत्तात्रय

       दिनकर दत्तात्रय साठे यांचा जन्म एका उच्चभ्रू कुटुंबात पूर्वीच्या इंदूर राज्यातील मंडलेश्वर या गावी झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मालघर हे आहे. त्यांचे वडील दत्तात्रय लक्ष्मण साठे भारतीय वनसेवेत कार्यरत होते. त्यांचे एक काका सिव्हील सर्जन तर दुसरे काका जगन्नाथ साठे हे आय.सी.एस. होते. आई चारुमती या पुण्यात एक कर्तृत्ववान समाजसेविका म्हणून ओळखल्या जात. त्या अनेक वर्षे पुणे वुमन काउन्सिल मध्ये कार्यरत होत्या. आई आणि वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा दिनकर साठे यांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा होता.

       साठे यांचे शालेय शिक्षण बंगळुर येथे झाले. इंदूरच्या होळकर महाविद्यालयातून त्यांनी पहिल्या वर्गात बी.ए. पूर्ण केले तर सेंट जान्स कॉलेज, केंब्रिजमधून त्यांनी एम.ए. (काँटॅब) ची पदवी संपादन केली. १९४१ मध्ये त्यांची निवड भारतीय प्रशासकीय सेवेत झाली. डेहराडूनमधील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मद्रास कॅडरमधील कुंदापूर येथे उप जिल्हाधिकारी या पदावर त्यांची पहिली नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते महामार्ग विकास महामंडळाचे (सी.आर.टी.बी.) केंद्रीय सचिव म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी मद्रास राज्यातील खासगी वाहतुकीच्या राष्ट्रीयीकरणाची योजना तयार करून ती एका वर्षाच्या कालावधीत यशस्वीपणे कार्यान्वित केली. यावेळी द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी या योजनेचे यश पाहून मुंबई राज्यामध्ये खाजगी वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण करण्याची योजना राबवण्यासाठी साठे यांना मुंबई येथे बोलावून घेतले. १९४७ ते १९५३ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात रस्ते वाहतूक योजना कौशल्याने राबवली. १९५२ मध्ये तेव्हाच्या मुंबई राज्यातील खाजगी वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि राज्य परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली. यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. महाराष्ट्रातील खेडोपाडी राज्यपरिवहन महामंडळाच्या गाड्या पोहोचाव्यात यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. राज्यपरिवहन महामंडळाचा विस्तार महाराष्ट्रात सर्वत्र होण्याचे श्रेय साठे यांच्या प्रयत्नांनाच आहे. (१९५३ ते ५६) भाषावार प्रांतरचनेनंतर अहमदाबाद या प्रांताची विभागणी करण्यात आली आणि १९५६ ते ५८ या कालावधीत त्यांची अहमदाबादचे विभागीय आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. १९५८ मध्ये साठे यांची नेमणूक मुंबई राज्याचे सचिव-कृषी आणि नागरीपुरवठा या पदावर करण्यात आली. यावेळी त्यांनी ग्रामीण दुग्ध योजना सुरू केली. याद्वारे दूध उत्पादकांना दुधाचे कंटेनर आणि फिरत्या गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. १९६० साली साठे यांची नियुक्ती ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव या पदावर झाली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचा कायदा तयार केला तसेच या दोनही योजना संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीपणे कार्यान्वित केल्या. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले त्यावेळी १९६४ ते ६६ या काळात साठे संरक्षण विभागाचे सहसचिव होते. १९६८ साली एका वर्षांसाठी त्यांची नेमणूक नियोजन आयोगाचे अतिरिक्त सचिव या पदावर करण्यात आली. १९६९ ते ७१ या कालावधीत मसुरीच्या लालबहाद्दुरशास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे ते संचालक होते.  त्यावेळी पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी डॉ.किरण बेदी या संस्थेत प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या होत्या. १९७३-७६ या कालावधीत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव होते. याच पदावरून ते १९७६ साली निवृत्त झाले. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

       - संध्या लिमये

साठे, दिनकर दत्तात्रय