Skip to main content
x

साठे, गजानन कृष्णाजी

           भारतीय रेल्वे सेवेतून मोझांबिक या मागासलेल्या पूर्व आफ्रिकेतील राष्ट्राची रेल्वे सेवा सुरळीत करून देण्यासाठी गेलेले व ही कामगिरी योग्य पद्धतीने पार पाडलेले अधिकारी म्हणजे गजानन कृष्णाजी साठे यांचा जन्म पुण्यात झाला. वडील कृष्णाजी गणेश साठे कोकणातले देवाचे गोठणे हे त्यांचे मूळ गाव. हे साठे कुटुंब पुढे कर्नाटकात धारवाडजवळ स्थायिक झाले. त्यांचे आजोबा मद्रास येथे रेल्वे स्टेशन मास्तर होते. कालांतराने गजानन साठे यांचे वडील पुण्यात स्थायिक झाले. आईचे नाव रूक्मिणी साठे असे होते.

गजानन साठेंचे शालेय शिक्षण पुण्यातील नावाजलेल्या नूतन मराठी विद्यालय शाळेत झाले. अंगभूत हुशारीमुळे ते शाळेत नेहमी बक्षीस मिळवत. त्या वेळी नानासाहेब नारळकर हे मुख्याध्यापक होते. त्या वेळी साठे यांचा एका विषयांत पहिला क्रमांक आला आणि नारळकरांनी गजाननला शेजारच्या दुकानातून हवी असेल ती वस्तू घेण्याची मुभा दिली आणि गजाननने एक पियानो घेतला. परंतु तो पियानो जपानमध्ये तयार केलेला होता. नारळकर यांनी गजानन यांना स्वदेशीचे महत्त्व पटवून दिले.आपल्या देशातला  पैसा परदेशात जाणार तेव्हा स्वदेशीच वस्तू घ्यायला हव्या असे नारळीकरांनी गजानन ह्यांना सांगितले.  बालवयात  त्यांच्यावर झालेले हे संस्कार पुढे त्यांनी आयुष्यभर जपले. 

पु. ग.सहस्त्रबुद्धे ,रा. सं. वाळिंबे यांसारखे विद्वान त्यांना शिक्षक म्हणून लाभले. त्याच्या संस्कारतून साठे यांचे व्यक्तिमत्व घडले. शाळेमध्ये असताना स्काउट चळवळीमध्ये ते सक्रिय होते. १९४५ मध्ये ते नूतन मराठी शाळेतून मॅट्रिकची परीक्षा ८०% गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे सुट्टीत काम करून गजानन साठे पैसे मिळवत. १९४८ मध्ये फर्गसन महाविद्यालयातून बी.एस्.सी. पूर्ण केल्यानंतर ते विजयचित्र मंदीरामध्ये काम करत असत. त्याच वेळी ते आय.ए.एस्. आणि इतर सेवांच्या परीक्षेची तयारी करत होते. १९५३ मध्ये ते युपीएसची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांची भारतीय रेल्वे मध्ये निवड झाली.

रेल्वेमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५५ मध्ये जामनगर येथे साहाय्यक वाहतूक अधीक्षक या पदावर त्यांची नियुक्ती झाली. १९५६ साली राजकोट येथे विभागीय वाणिज्य निर्देशक म्हणून नियुक्ती झाली. १९५९ मध्ये त्यांची मुंबई विभागात भ्रष्टाचारविरोधी अधिकारी म्हणून नेमणूक झाली. याचवेळी गोध्रा येथे नदीवर पूल बांधण्याचे काम चालू होते. या कामादरम्यान नदीचे पाणी अडविण्यासाठी बंधारे घालावे लागत. तेथील अभियंत्याने लबाडीने कागदपत्रात खोटे बंधारे दाखवले व भ्रष्टाचार केला. साठे यांनी याबाबत हाताखालच्या इन्स्पेक्टर्स करवी चौकशी केली. त्यानंतर ती केस विशेष पोलीस अस्थापनेकडे सोपविण्यात आली. त्यामुळे त्या अधिकार्‍यावर कारवाई झाली. त्यांच्या याच कामाला दाद देऊन त्या वेळचे पश्‍चिम रेल्वेचे महाप्रबंधक संचालक श्रीराम सुब्बन यांनी गजानन साठे यांना आपला स्वियसचिव म्हणून निवडले. १९६७ सालापर्यंत ते या ठिकाणी ते कार्यरत होते.

१९६७ मध्ये त्यांना रेल्वे आधुनिक करण्याचे दृष्टीने अभ्यासासाठी अमेरिकेला पाठवण्यात आले. यामध्ये भारतीय रेल्वेतील तीस अधिकार्‍यांचा समावेश होता. साठे या गटाचे प्रमुख होते. अमेरिकेत राहून त्यांनी तेथील रेल्वेचा सखोल अभ्यास केला आणि त्यावरचा मार्केट प्राइस ऑफ रेल्वेया विषयावरचा अहवाल भारतीय रेल्वेला सादर केला. त्यातील बर्‍याच शिफारसी नंतर भारतीय रेल्वे लागू करण्यात आल्या.

यानंतर त्यांची १९६९ मध्ये राजस्थानातल्या उदयपूर येथे असलेल्या रेल्वे प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक झाली. या कालावधीत साठे यांनी केंद्रात बर्‍याच सुधारणा केल्या. साधारण १००० प्रशिक्षणार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत होते. केंद्रातील शौचालये आणि भोजनगृहातून वाहणारे सांडपाण्यामुळे त्यातून येणार्‍या घाणीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. यासाठी साठे यांनी तात्काळ सांडपाण्याची योग्य व्यवस्था केली आणि त्याच्या खतापासून केंद्राच्या आवारात  गहू, मका, भाजीपाला पिकवायला सुरवात केली. तेथील गहू एवढा उत्कृष्ट झाली की, राजस्थान सरकारने बियाणे म्हणून विकत मागितला. याच ठिकाणी कुटुंबनियोजन, व्यायाम, पेपर फुटीवर उपाय अशाही वेगवेगळ्या योजना त्यांनी राबविल्या.

 १९७० मध्ये पश्चिम विभागात उपमुख्य वाणिज्य अधिकारी म्हणून त्यांनी चर्चगेट येथे काम केले. नंतर १९७५ मध्ये वडोदरा येथे डिव्हीजन मॅनेजर या पदावर त्यांची नियुक्ती झाली. १९८० ते १९८१ या कालावधीत मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस (तेव्हाचे व्ही.टी.) येथे त्यांनी उपविभागीय व्यवस्थापक पदावर काम केले. ते या पदावर असतानाच मोझांबिक या देशात त्यांची भारतीय रेल्वेच्या राईटस्तर्फे नियुक्ती करण्यात आली.

२२० कि.मी. किनारपट्टी लाभलेला आफ्रिका खंडातील मोझांबिक हा एक मागासलेला देश. सतत होणाऱ्या बंडांमुळे आणि लुटालुटीमुळे इथली रेल्वे सेवा सततच ठप्प झालेली असे. त्यातून शेजारील देशांकडून चलनात होणाऱ्या फसवणुकीमुळेही ह्या देशाचे नुकसान होत असे. मोझांबिककडून दक्षिण आफ्रिकेत कोळशाचा पुरवठा होत असे. रेल्वेमार्फतच हा कोळसा पाठविण्यात येई. त्या काळात नुकताच दक्षिण आफ्रिकेत सर्व व्यवहारांसाठी सरकारात संगणकाचा वापर होऊ लागला होता. मोझांबिककडून आलेल्या कोळशाचा मोबदला द.आफ्रिकेला द्यावा लागत असे. प्रत्यक्षात दक्षिण आफ्रिका तेथील अधिकाऱ्यांनी कागदपत्रात, संगणकीय नोंदीत फेरफार करून मोझांबिक देशाची, अधिकाऱ्यांची फसवणूक केली. ही सर्व फसवणूक विस्कळीत रेल्वेसेवा सुधारण्यासाठी गेलेल्या साठे आणि त्यांच्या सहकाऱ्याने उघडकीस आणली. दोन्ही राष्ट्रांच्या बैठकीत त्यांनी ती सिद्ध करूनही दाखवली. त्यामुळे द. आफ्रिकेने दहा लाख रँड एवढी रक्कम मोझांबिकला परत केली. साठे यांच्यासोबत याकाळात ३६ जणांचा गट पाठवण्यात आला होता.

१९८१ ते १९८५ या काळात साठे यांनी मोझांबिक रेल्वेत काम केले.  मोझांबिक वाहतूक मंत्र्यांची पत्नी व गजानन साठे यांच्या पत्नी मीराताईंची एक दिवस भेट झाली. मीराताईंनी ग्रंथालय व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम व नोकरी केल्याचे समजल्यावर त्यांनी मीराताईंना मोझांबिक मधील वाहतूक मंत्रालयातील  ग्रंथालये नवीन तांत्रिक पद्धतीने व्यवस्थित बनवण्याची विनंती केली व मीराताईंनी ती पूर्णही केली. १९८६ मध्ये साठे पश्‍चिम आणि मध्य रेल्वेचे अतिरीक्त महाप्रबंधक म्हणून निवृत्त झाले.

निवृत्तीनंतर साठे पुण्यातच स्थायिक झालेले आहेत. ते कविता, कथा असे लिखाण करतात. वेगवेगळ्या दिवाळी अंकांतून त्यांच्या कथाही प्रकाशित झाल्या आहेत.

- दत्ता कानवटे 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].