Skip to main content
x

साठे, शरद श्रीपाद

निकोप, मृदू आवाज, त्याला लाभलेली अविरत मेहनतीची जोड, ख्याल-टप्पा-तराणा या गायनप्रकारांवरील विशेष प्रभुत्व या सर्वांमुळे हिंदुस्थानी शास्त्रीय कंठसंगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या पं. शरद श्रीपाद साठे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांची आई यमुना दिलरुबा वाजवत असे. त्यांची मावशी लीला लिमये या सुप्रसिद्ध गायिका होत्या. त्यांची थोरली बहीण डॉ. कमल केतकर ही पं. द.वि. पलुसकरांची शिष्या होय. घरातून संगीताचा असा वारसा लाभलेल्या शरद साठे यांचे शिक्षण पं. द.वि. पलुसकर यांच्याकडे १९४९ साली सुरू झाले. त्यांच्याकडील विद्यालयीन शिक्षणाबरोबर त्यांच्या सोबत केलेले दौरे, त्यांचा सहवास, श्रवण, निरीक्षण या सर्वांमुळे त्यांची गायकी आणि व्यक्तिमत्त्व या सगळ्यांचाच प्रभाव त्यांच्यावर पडला. मैफलीचे नियोजन, आचार-विचारांतील शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, ‘सुध-बानी, सुध-मुद्रा’ ही गायकाची बैठक या वैशिष्ट्यांमुळे द.विं.प्रमाणेच साठेही लोकप्रिय कलाकार झाले.
त्यांना १९५६ पासून पुढील दहा वर्षे मुंबईत प्रा. बा.र. देवधर यांची तालीम मिळाली. त्यांच्याकडे अनेक प्रचलित आणि अनवट रागांमधील चिजा शरद यांना आत्मसात करता आल्या. त्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. अनेक बुजुर्ग कलाकारांना ऐकण्याची आणि त्यांच्याबरोबर साथसंगत करण्याची संधी शरद साठे यांना मिळाली. अनेक थोर कलाकारांच्या गायकीचा अभ्यासही त्यांना करता आला. १९६६ पासून १९९४ पर्यंत ग्वाल्हेर घराण्याचे अध्वर्यू आणि पं. कृष्णराव शंकर पंडितांचे शिष्य पं.शरच्चंद्र आरोलकर यांचा सहवास त्यांना लाभला. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचे यथार्थ दर्शन शरद साठे यांना झाले आणि ख्याल, टप्पा, तराणा, ठुमरी या गायनप्रकारांचा विशेष अभ्यासही झाला.
तिन्ही विद्वान गुरूंचे मार्गदर्शन, इतर गायकीचा डोळस अभ्यास आणि अविरत मेहनत यांतून पंडित शरद साठे यांची स्वत:ची अशी गायकी तयार झाली. स्वरांचा नजाकतपूर्ण लगाव, ख्यालाच्या मांडणीतील, बोलबनावातील विविधता, समेवर येण्याची पद्धत, रागाची शुद्धता, तानांची विविधता ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये होती. ‘टप्पा’ हा अवघड गायनप्रकार गाणाऱ्या अगदी मोजक्या कलाकारांपैकी एक आणि द.वि. पलुसकरांनी लोकप्रिय केलेली भजने गाणारे कलाकार म्हणून ते ओळखले जात.
पं. शरद साठे यांना ‘संगीत रिसर्च अकादमी’ पुरस्कार (२००६), ‘विनायकबुवा पटवर्धन’ पुरस्कार (२००९), ‘संगीतरत्न - काशी संगीत समाज’ पुरस्कार (२००७), राम मराठे पुरस्कार (२०१४) आदी पुरस्कार प्राप्त झाले. पं. साठे आकाशवाणी व दूरदर्शनवरील उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून ओळखले जात. पं. विष्णू दिगंबर पलुसकरांवरील चित्रफितीसाठी (१९७२) त्यांनी आवाज दिला होता. त्यांनी मुंबई व पुणे विद्यापीठांत, तसेच महाराष्ट्रात इतरत्र ‘टप्पा’ या विषयावरील व्याख्याने दिली होती. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन (सीअ‍ॅटल) येथे पं. साठे यांच्या आवाजातील ग्वाल्हेर घराण्याचे ध्वनिमुद्रण संग्रहित केलेले आहे.

पं. शरद साठे यांनी एन.सी.पी.ए. मुंबई, तानसेन संगीत समारोह, सवाई गंधर्व समारोह, गुणिदास संगीत समारोह, महाराष्ट्र राज्य संगीत नृत्य महोत्सव, आकाशवाणी संगीत सम्मेलन, दूरदर्शन राष्ट्रीय कार्यक्रम, संगीत रिसर्च अकादमी - कोलकाता, विष्णू दिगंबर संगीत संमेलन - दिल्ली, तसेच अमेरिका, लंडन, दुबई, बहारिन येथील कार्यक्रमांत आपले गायन सादर केले आहे.
मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आटर्समधून ‘जी.डी. आर्ट’ ही दृश्यकलाविषयक पदविका मिळवलेले शरद साठे हे उत्तम सुलेखनकार (कॅलिग्राफर) म्हणूनही विख्यात होते. उपजीविकेसाठी त्यांनी ‘लिंटास’सारख्या नामवंत जाहिरात संस्थांमध्ये नोकरी केली व अनेक पुस्तकांचेही कलानिर्देशन केले. मुंबईतील ‘दादर माटुंगा कल्चरल सेंटर’ या महत्त्वाच्या संगीतसंस्थेचे कार्य सुमारे तीस वर्षे त्यांनी केले. त्यानंतर या संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. वयाच्या सत्त्यांशीव्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

स्मिता महाजन

संदर्भ
१ . http://www.sharadsathe.com/awards.html
साठे, शरद श्रीपाद