साठे, सत्यरंजन पुरुषोत्तम
सत्यरंजन पुरुषोत्तम साठे यांचा जन्म अमरावती येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण त्या वेळच्या मध्य प्रदेशात झाले. आय.एल.एस. विधि महाविद्यालयातून एलएल.बी. आणि एलएल.एम. या पदव्या त्यांनी संपादन केल्या. (त्याकाळी एलएल.एम.चे वर्गही विधि महाविद्यालयामध्येच भरत असत.)
कायद्याच्या अध्यापनाच्या, संशोधनाच्या आणि लेखनाच्या क्षेत्रांतील डॉ.साठे यांच्या प्रदीर्घ आणि धवल कारकिर्दीची सुरुवात बनारस हिंदू विद्यापीठापासून झाली. नोव्हेंबर १९५७ ते मे १९५८ या अवधीत ते तेथे कायदा विद्याशाखेत अधिव्याख्याता (लेक्चरर) होते. त्यानंतर जून १९५८ ते एप्रिल १९६० या काळात ते दिल्लीला ‘इंडियन लॉ इन्स्टिट्यूट’मध्ये संशोधन अधिकारी होते. तेथून ते मुंबई विद्यापीठात आले. तेथे ते कायदा विभागात एप्रिल १९६० ते डिसेंबर १९६६ अधिव्याख्याता आणि नंतर जानेवारी १९६७ ते मे १९७६ प्रपाठक होते. अधिव्याख्याता असतानाच १९६४-६५ मध्ये ‘रेमंड इंटरनॅशनल फेलोशिप’ मिळाल्याने ते अमेरिकेत गेले. शिकागोमधील ‘नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ’मधून त्यांनी ‘डॉक्टर ऑफ ज्युरिडिकल सायन्स’ (एस.जे.डी.) ही पदवी संपादन केली.
डॉ.साठे ज्या महाविद्यालयाचे एकेकाळी विद्यार्थी होते, त्या पुण्याच्या आय.एल.एस. विधि महाविद्यालयाचे ते जून १९७६ मध्ये प्राचार्य झाले. पंधरा वर्षांहून अधिक काळ म्हणजे नोव्हेंबर १९९१ पर्यंत त्यांनी महाविद्यालयाची धुरा अत्यंत समर्थपणे आणि यशस्वीरीत्या सांभाळली. याच अवधीत एक वर्षभर (एप्रिल १९८५ ते एप्रिल १९८६) ते पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू होते. कायदेविषयक प्रश्नासंबंधी प्रगत संशोधनास चालना आणि उत्तेजन देण्यासाठी इंडियन लॉ सोसायटीच्या विद्यमाने त्यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड लीगल स्टडीज्’ (आय.ए.एल.एस.) या संस्थेची स्थापना केली. नोव्हेंबर १९९१ मध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्यावर डॉ.साठे या संस्थेचे मानद संचालक झाले. याशिवाय २००१ पासून अखेरपर्यंत ते पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांची ही नियुक्ती मुंबर्ई उच्च न्यायालयाने केली होती.
आय.एल.एस. विधि महाविद्यालयाचे प्राचार्य, ‘आय.ए.एल.एस.’चे मानद संचालक आणि नंतर डेक्कन महाविद्यालयाचे अध्यक्ष या मोठ्या आणि महत्त्वाच्या जबाबदार्या सांभाळत असतानाच डॉ.साठे यांच्याकडे अन्य असंख्य जबाबदार्याही चालत येत असत आणि त्याही ते तेवढ्याच उत्साहाने आणि यशस्वीरीत्या पार पाडीत असत. त्यांपैकी कायद्याशी किंवा कायद्याच्या अध्ययन व अध्यापनाशी संबंधित विशेष महत्त्वाच्या, अॅकॅडमिक जबाबदार्यांचा उल्लेख करायचा झाल्यास, डॉ.साठे यांनी वेळोवेळी ‘इंडियन लॉ इन्स्टिट्यूट’च्या जर्नलच्या संपादकीय सल्लागार समितीचे सदस्य, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अभ्यासक्रम विकास केंद्राचे सदस्य, नवी दिल्ली येथील ‘पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सपोर्ट अॅन्ड रिसर्च सेंटर’चे विश्वस्त आणि पुणे विद्यापीठाच्या ‘कायदेविषयक सल्लागार समिती’चे सदस्य म्हणून काम पाहिले. याशिवाय ते दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंनी नेमलेल्या ‘लॉ फॅकल्टी रिव्ह्यू कमिटी’चे सदस्य, ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रकाशनाच्या ‘लॉ इन इंडिया’ या मालेचे सल्लागार, बटरवर्थ्स् कंपनीच्या ‘हॅल्सबरीज् लॉज् ऑफ इंडिया’ या मालेच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कायदा पॅनलचेही सदस्य होते.
याव्यतिरिक्त १९६६ ते १९७८ डॉ.साठे मुंबईच्या प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयामध्ये आणि नंतर पुण्याच्या ‘राष्ट्रीय विमा प्रबोधिनी’ व ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट’, मुंबईची टाटा समाजशास्त्र संस्था व हैदराबादची सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी यांमध्ये अतिथी अधिव्याख्याते होते. त्याप्रमाणे बंगलोरच्या ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’ व हैदराबादच्या ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ लीगल स्टडीज् अॅन्ड रिसर्च’ या संस्थांचे ते मार्गदर्शक (रिसोर्स पर्सन) होते.
“मी कार्यकर्ता नाही” असे डॉ.साठे स्वत: म्हणत; तथापि ‘अॅकॅडमिक’ विश्वाच्या बाहेरच्या प्रत्यक्षातील जगातल्या जीवनाशी आणि प्रश्नांशी त्यांचा सतत संपर्क असे. वृत्तपत्रांत विविध विषयांवर उद्बोधक लेख लिहिण्याव्यतिरिक्त विविध संस्था आणि संघटनांशीही त्यांचा घनिष्ठ संबंध होता. पुण्याच्या ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’चे ते उपाध्यक्ष होते, तर ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज’चे आणि ‘शिशुआधार’ या संस्थेचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे ‘इचलकरंजी एज्युकेशन एन्डॉवमेंट फंड’चे ते १९७८ पासून विश्वस्त होते.
विविध विद्यापीठांच्या किंवा इतर संस्थांच्या निवड समित्यांचे सदस्य म्हणूनही डॉ. साठे यांनी वेळोवेळी काम केले. यांमध्ये, अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी मिळणार्या फुलब्राइट फेलोशिप आणि फोर्ड फाउंडेशन आंतरराष्ट्रीय फेलोशिप यांसाठीच्या निवड समित्यांचा, तसेच मुंबई विद्यापीठ, कोचिन विद्यापीठ, दक्षिण गुजरात विद्यापीठ, लखनऊचे बाबासाहेब आंबडकर विद्यापीठ, दिल्लीची ‘इंडियन लॉ इन्स्टिट्यूट आणि बंगलोर येथील ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’ यांच्या अध्यापक-निवड समित्यांचा उल्लेख करता येईल.
याशिवाय विशेष उल्लेखनीय दोन गोष्टी म्हणजे, विवेक पंडित विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यात ठाणे जिल्ह्यातील वेठबिगारांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष १तेथे जाऊन पाहणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने डॉ.साठे यांची नियुक्ती केली; त्याचप्रमाणे नोव्हेंबर १९९४ मध्ये नागपूरमध्ये चेंगराचेंगरी होऊन गोवारी समाजाचे शंभरहून अधिक लोक मृत्युमुखी पडले, या घटनेचीही डॉ.साठे यांनी काही सामाजिक संस्थांच्या वतीने चौकशी केली. १९७७ मध्ये ‘कायदेविषयक मदत’ (लीगल एड) या संकल्पनेचा समावेश घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांत करण्यात आला. त्याच्या आधीच म्हणजे, १९७६ मध्ये डॉ.साठे यांनी आय.एल.एस. विधि महाविद्यालयामध्ये ‘लीगल एड सेंटर’ सुरू केले. महाविद्यालयाच्या विद्याथ्यार्र्ंसाठी ‘वकिलीची कौशल्ये’ शिकण्याची प्रयोगशाळा आणि त्याचवेळी भारतीय समाज जवळून समजून घेण्याची संधी’ अशा दुहेरी भूमिकेतून त्यांनी या केंद्राची उभारणी केली. हे कार्य आजही चालू आहे.
डॉ.साठे उत्कृष्ट वक्ते होते. इंग्रजीत किंवा मराठीत, कोणताही विषय सुगम व ओघवत्या भाषेत प्रभावीपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे देशात आणि परदेशात, विद्यापीठांतील परिसंवाद किंवा इतर व्यासपीठांवरून त्यांनी अनेकानेक महत्त्वपूर्ण व्याख्याने दिली. १९८३ ते २००२ या काळात त्यांनी दिलेल्या अशा व्याख्यानांपैकी निवडक व्याख्यानांची संख्या सव्वीस भरते.
डॉ.साठे एकीकडे हाडाचे शिक्षक (किंवा प्राध्यापक) असतानाच दुसरीकडे हाडाचे संशोधक आणि मार्गदर्शक होते. साहजिकच ते पीएच.डी.चे मार्गदर्शक होते. मुंबई, पुणे, उस्मानिया आणि शिवाजी विद्यापीठांतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळविली. ‘आय.ए.एल.एस.’ या आपल्या संस्थेतर्फे डॉ.साठे यांनी स्वत: अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले. याशिवाय या संस्थेने डॉ.साठे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायाधीश, सरकारी अधिकारी, वकील, यांच्यासाठी विविध विषयांवर कार्यशाळा घेतल्या. ग्राहक संरक्षण कायदा आणि ‘स्त्रिया आणि कायदा’ या विषयांवर संस्थेने स्वतंत्र अभ्यासक्रमही तयार केले आहेत.
डॉ. साठे यांनी नऊ पुस्तके लिहिली किंवा संपादित केली आहेत, तर विविध नियतकालिकांतून आणि जर्नल्समधून प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख किंवा शोधनिबंध, त्याचप्रमाणे विविध संपादित पुस्तकांत त्यांनी विशिष्ट विषयांवर लिहिलेली प्रकरणे, या सर्वांची एकूण संख्या सुमारे २०० आहे. ‘अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ’ हे त्यांचे गाजलेले पहिले महत्त्वाचे पुस्तक. १९७० मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या २००४ पर्यंत सात आवृत्त्या निघाल्या. २००२ मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे महत्त्वाचे पुस्तक ‘ज्युडिशिअल अॅक्टिव्हिझम इन इंडिया : ट्रान्सग्रेसिंग बॉर्डर्स अॅण्ड एनफोर्सिंग लिमिट्स्’ हेही गाजले. त्यानंतर अगदी अलिकडे ‘ऑक्सफर्ड’ने प्रकाशित केलेल्या ‘इंटरप्रिटिंग कॉन्स्टिट्यूशन्स् : अ कम्पॅरिटिव्ह स्टडी’ या पुस्तकात डॉ.साठे यांनी आपल्या घटनेवर लिहिलेले प्रकरण ‘फ्रॉम पॉझिटिव्हिझम् टू स्ट्रक्चरॅलिझम्’ अतिशय सरस उतरले आहे.
एवढे चतुरस्र कर्तृत्त्व आणि व्युत्पन्न व्यक्तिमत्त्व असलेले डॉ.साठे अतिशय साधे, निगर्वी, मनमिळाऊ होते. आपल्या विद्यार्थ्यांवर ते पितृवत् प्रेम करीत. प्रथमदर्शनीच त्यांच्याबद्दल मनात आदर उत्पन्न होई आणि मनावर त्यांची कायमची छाप पडे. न्यायशास्त्र (ज्युरिस्प्रुडन्स), तुलनात्मक कायदा आणि भारताची घटना आणि घटनात्मक कायदा या विषयांवरील त्यांचे वर्ग म्हणजे बौद्धिक मेजवानी असे. कायदा हा त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीवर समजून घेतला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. मुख्य म्हणजे वर्गात कोणीही, कोणताही प्रश्न केव्हाही विचारण्याची मुभा असे. त्यांच्या घरीही विद्यार्थ्यांना मुक्तद्वार असे.
आय.एल.एस. विधि महाविद्यालयाचे आज देश-विदेशात जे स्थान आहे, त्याला जी प्रतिष्ठा आहे, त्याचा पाया प्राचार्य घारपुरे यांनी १९२४ मध्ये घातला, त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य प्राचार्य पंडित यांनी त्याचा विस्तार केला आणि विकास घडविला, तर प्रा.पंडितांचे शिष्य डॉ.साठे यांनी त्यावर कळस चढविला, असेे म्हणता येईल.