Skip to main content
x

सौंथलिया, गोपाल राधाकृष्ण

गोपीकृष्ण

      भारतीय अभिजात नृत्यशैलींमधील ‘कथक’ या नृत्यशैलीचे नटराज गोपीकृष्ण यांचा जन्म कलकत्त्याला (कोलकाता), जोडासाकू येथे झाला. आजोबा (आईचे वडील) पं. सुखदेव महाराज हे नेपाळ दरबारामध्ये राजगायक होते. तेच गोपीजींचे आद्य नृत्यगुरू होत. दहा महिन्यांचे असताना गोपीकृष्ण यांनी एका चित्रपटात पाळण्यातील बाळाची भूमिका केली व पुढे तिसर्‍या वर्षापासूनच नूपुरांचे झंकार उमटवण्यास सुरुवात केली. आजोबा सुखदेव महाराज यांच्याकडे नृत्य शिकताना कडवी मेहनत, रियाज हाच त्यांचा कानमंत्र होता. पहाटे तीन वाजल्यापासून सहापर्यंत आणि संध्याकाळी परत चार तास अशी मेहनत गोपीजींनी सलग सहा वर्षे घेतली.
गोपीकृष्णांचे आजोबा त्यांना ‘तिगदा दिग दिग’ हे बोल चौगुनमध्ये पायाच्या घर्षणाने जमीन तापेपर्यंत करायला लावायचे आणि स्वत: जमिनीला हात लावून पाहिल्यावरच त्यांना थांबायची अनुमती द्यायचे. पं. सुखदेव महाराजांनी त्यांना शिवतांडव, कालीपरन, दुर्गापरन इत्यादी अनेक तांडव अंगाने जाणार्‍या रचना शिकवल्या. नंतरच्या काळात गोपीजींना पं. अच्छन महाराज, पं. लच्छू महाराज, पं. शंभू महाराज या कथक नृत्यशैलीतील अध्वर्यूंचेही मार्गदर्शन लाभले.

पं. गोपीकृष्ण यांनी भारतातील इतर प्रमुख अभिजात नृत्यशैलींचेदेखील विधिवत शिक्षण घेतले. चीन युद्धाच्या वेळेस एका धर्मादाय कार्यक्रमामध्ये त्यांनी एक दिवस कथकचा आणि एक दिवस भरतनाट्यमचा पूर्ण वस्तुक्रम सादर केला होता. त्यांनी लोकनृत्यकलाही आत्मसात केली होती. या सर्व नृत्यविधांवरील त्यांचे प्रभुत्व, त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलेल्या चित्रपटांतील या नृत्यप्रगल्भतेचे उपयोजन, आजही आपल्याला स्तिमित करून सोडते.
१९५५ साली व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातील प्रमुख नायकाची भूमिका, तसेच या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन गोपीकृष्णांनी केले आणि ते प्रसिद्धीच्या उच्चतम शिखरावर पोहोचले. त्यांनी हिंदीबरोबरच गुजराती, मराठी, तामीळ, भोजपुरी, कन्नड इ. विभिन्न भाषांमधील चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन केले आणि याबरोबरच त्यांनी देशात, तसेच परदेशांत कथक नृत्याचे कार्यक्रमही सादर केले. आपल्या शिष्यांना गोपीकृष्ण नेहमीच रियाजाची सक्ती करत असत. ते स्वभावाने तापट होते; परंतु ते विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कर्षासाठीच रागवायचे. गोपीकृष्णांची फिल्मजगत आणि कथक नृत्य अशी दुहेरी कारकीर्द असली तरीही त्यात त्यांनी कधीच सरमिसळ होऊ दिली नाही. संध्या, वैजयंतीमाला, हेमामालिनी, रेखा या सिनेनटींबरोबरच मंजिरी देव, राजा केतकर, वैभव जोशी, पद्मा खन्ना व मनीषा साठे या कथक नर्तक- नर्तकींना त्यांनी शिकवले.गोपीकृष्ण एक द्रष्टा कलाकार होते. गुरूंविषयी, परंपरेविषयी त्यांच्या मनात निश्चितच श्रद्धा होती; पण परंपरेचे अंधानुकरण करणे त्यांना पटत नसे. त्यांना नावीन्याची ओढ होती. या इच्छेतूनच त्यांनी १९ एप्रिल १९६७ मध्ये मुंबईच्या पाटणकर सभागृहामध्ये सलग नऊ तास, दहा मिनिटे नृत्य प्रस्तुत करून ‘नाईन अवर्स टू र्‍हिदम’ हा विक्रम घडवला.
गोपीकृष्णांनी आपल्या प्रतिभेने कथक नृत्यात काही नवीन तत्त्वांचा समावेश केला. ठुमरी, भजन यांशिवाय जटायूमोक्ष, पूतनावध इ. प्रसंग स्वतंत्र रचनेच्या (प्रस्तुती) स्वरूपात सादर केले. कथक नृत्याचे लक्षणीय अंग तत्कार, ही गोपीकृष्णांची विशेषता होती. विविध प्रकारच्या भ्रमरी, हस्तसंचलन, यांचेही मोठे दालन त्यांनी स्वप्रतिभेने खुले केले. समाजाला त्यांनी कथक नृत्याची जोशपूर्ण स्वरूपातील एक नवीन ओळख करून दिली. अशा त्यांच्या प्रभावी कारकिर्दीमुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. १९७५ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब बहाल केला.

मनीषा साठे

सौंथलिया, गोपाल राधाकृष्ण