Skip to main content
x

सावंत, वसंत लाडोबा

     वसंत लाडोबा सावंत यांचा जन्म कोकणात झाला. सावंत-वाडीच्या संस्थानिक सावंत घराण्याशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांचे वडील शेतकरी आणि वारकरी. सावंतांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अनुक्रमे फोंडाघाट व मालवण येथेे झाले. त्यांनी एम.ए., पीएच.डी. ह्या पदव्या घेऊन काही काळ वडिलांना शेतीव्यवसायात मदत केली. नंतर रेल्वेत अल्पकाळ कारकुनी केल्यावर १९६३ सालापासून सावंतवाडीच्या पंचम खेमराज महाविद्यालयात ते निवृत्तीपर्यंत अध्यापन करीत होते.

     ‘स्वस्तिक’ (१९७३), ‘उगवाई’ (१९८४), ‘देवराई’ (१९९०), ‘माझ्या घरातले सोनचाफ्याचे झाड’ (१९९३) हे त्यांचे काव्यसंग्रह होत. जन्मभूमी आणि कर्मभूमी कोकणच असल्याने तिथल्या निसर्गावर, माणसांवर, मातीवर त्यांनी मनापासून प्रेम केले आणि तेच त्यांच्या काव्याचे सामान्यपणे विषय झाले. सावंत श्रद्धावान पठडीतले असले, तरी त्यांना नैसर्गिक प्रतीकांमधूनच ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होई, त्यामुळे त्यांच्या काव्यप्रतिभेला चिंतनशील, आध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्यांची प्रेमकविताही काहीशी त्याच पातळीवर विरह आणि व्याकुळता, बंध आणि अनुबंध यांच्या सीमारेषेवर उभी राहणारी आहे.

     त्यांच्या ‘देवराई’ या काव्यसंग्रहाचे समीक्षण ज्येष्ठ कवी डॉ.वि.म.कुलकर्णी यांनी, ‘निसर्ग आणि लोकजीवन यांच्याशी जोडलेले सौंदर्यदृष्टीचे नाते’, अशा शब्दांत केलेले आहे. त्यांची कविता शक्यतो कटुतेपासून दूर राहिली आहे. सावंत यांनी स्वतः ‘स्वस्तिक’मधील ‘बैल’ या कवितेसंबंधी ‘एक अमृतानुभव’ असे म्हटले आहे. ते म्हणतात, “काही, काही जीवनानुभव कवीला भाग्याने लाभत असावेत असे वाटते. त्यांपैकी ‘बैल’ या कवितेचा अनुभव आहे, असे मला वाटते. तिच्या रूपाने मी माझ्याच आतल्या ऊर्मीचे, ऊर्जेचे एक रूप मराठी साहित्यात कोरून ठेवले आहे असे माझा एक मित्र म्हणतो, ते खरे असावे.” (पृ.९३ व ९७, म.सा.प. दिवाळी १९९०).

     वसंतसावंत यांनी आवडीने काही ग्रंथपरिचयात्मक आणि समीक्षात्मक लेखनही केले आहे. त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध ‘प्रवासवर्णन:एक वाङ्मयप्रकार’ या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला आहे. प्रवासवर्णनांचा विस्तृत आढावा घेणारे अशा प्रकारचे मराठीतील हे पहिलेच पुस्तक असल्याचे समीक्षक शंकर सारडा म्हणतात. महाविद्यालयातील अध्यापनकार्याच्या निवृत्तीनंतर अल्पकाळात वसंत सावंत मृत्यू पावले.

- मधू नेने

सावंत, वसंत लाडोबा