Skip to main content
x

शेजवळ, अर्जुन सावळाराम

र्जुन सावळाराम शेजवळ यांचा जन्म मुंबई येथे एका वारकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव यमुनाबाई होते.  त्यांचे वडील ह.भ.प. सावळारामबुवा शेजवळ एक प्रख्यात शास्त्रीय भजन गायक होते, तसेच  मोठे बंधूही उत्तम गायक होते. लहानपणापासूनच अर्जुन शेजवळ यांचा ओढा वादनकलेकडे होता. लहानपणी त्यांचे खेळ म्हणजे गायन-वादन असेच असायचे. 

त्यांचे वडील अकाली निधन पावले; परंतु मोठ्या भावाकडून त्यांच्यावर संगीताचे संस्कार घडत होते. संगीताबरोबरच कॅरम, क्रिकेट हे त्यांचे आवडीचे खेळ होते व त्यांत ते पारंगतही होते. क्रिकेटवर त्यांचे विशेष प्रेम होते. अनेक प्रसिद्ध क्रिकेट खेळाडूंबरोबर ते क्रिकेट खेळत असत.

वडीलबंधू विठ्ठलदादा गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्जुन यांना वयाच्या आठव्या/नवव्या वर्षी मृदंगाचार्य नारायण कोळी यांच्याकडे पखवाजवादन शिकण्यासाठी घेऊन गेले आणि त्यांचे पूर्ण आयुष्य पखवाजमय झाले. नारायण कोळी व विठ्ठल शेजवळ हे अत्यंत घनिष्ठ मित्र होते. दोघेही एकाच इमारतीमध्ये राहत असल्यामुळे पखवाजाच्या शिक्षणास वेळेचे कोणतेही बंधन नव्हते. नारायणरावांच्या मनात आले की ते इमारतीमधल्या या विद्यार्थ्याला बोलावून घेत. गुरूकडे जाऊन आले की अर्जुन घरी पुन्हा रियाझ करायला बसत.

त्यांचा रियाझ त्यांचे भाऊ विठ्ठल करून घेत असत. त्यांचा रियाझ तासन् तास चाले. नारायणराव कोळ्यांचे निधन होईपर्यंत अर्जुन रोज त्यांच्याकडे जात. अर्जुन यांनी धृपद-धमारची पहिली साथ- संगत चतुर्भुज राठोड यांच्याबरोबर केली. त्यानंतर त्यांनी अनेक नामवंत कलाकारांबरोबर साथसंगत केली, त्यांत विशेषत्वाने पं.के.जी.गिंडे, पं.एस.सी.आर.भट तसेच पं.सियाराम तिवारी, पं.रविशंकर हे होते.

त्यांची आणि त्यांच्या गुरूंची पखवाज जुगलबंदी ऐकणे आणि पाहणे ही एक मेजवानी असायची. तबल्याबरोबरही त्यांनी खूप जुगलबंदी केली; परंतु उस्ताद झाकिर हुसेनबरोबर झालेली प्रत्येक जुगलबंदी ही अविस्मरणीय असायची.

सिनेसंगीतामध्येही त्यांनीं आपला ठसा उमटवला, तिथेही त्यांनी भरीव कामगिरी केली. आव्हानात्मक  गोष्टी त्यांनी लीलया करून दाखवल्या. त्यांनी पाश्चात्त्य संगीतकारांसह आणि कलाकारांसह देशात आणि विदेशांत म्हणजे संपूर्ण युरोप, तसेच लंडन आणि अमेरिका येथे अनेक कार्यक्रम केले. त्यांनी स्वतंत्र  कार्यक्रमही सादर केले.

मृदंगाचार्य अर्जुन शेजवळ यांचा मृत्यू मुंबई येथे त्यांच्या राहत्या घरी झाला. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा प्रकाश याने पखवाज वादनाची परंपरा चालू ठेवली आहे.

देविदास शेजवळ

शेजवळ, अर्जुन सावळाराम