शेजवलकर, त्र्यंबक शंकर
मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित विषयावर स्पष्ट, धाडसी आणि वेगळ्या प्रकारची मते बिनधास्तपणे व्यक्त करणारे म्हणून प्रो. त्र्यं. शं. शेजवलकर यांनी मराठी इतिहास लेखनात आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. कोकणातील कशेळी गावी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकर हरी शेजवलकर हे मुंबई नगरपालिकेत नोकरीला होते. शंकर हरींना वाचनाची व सार्वजनिक कार्याची विशेष आवड होती. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आद्य प्रवर्तकांमध्ये त्यांचा समावेश होता.
मुंबई येथे १९११ साली ते मॅट्रिकची, तर १९१७ साली बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर मुंबईतील मिलिटरी अकाउण्ट्समध्ये त्यांनी काही काळ कारकुनी केली. मुंबई विद्यापीठाच्या एम.ए.च्या पदवीसाठी त्यांनी ‘मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव’ या विषयावरील इंग्रजी प्रबंधाचे लेखन केले. पण परीक्षकांशी मतभेद झाल्यामुळे आणि आपल्या मत-प्रतिपादनाशी ठाम राहिल्यामुळे एम.ए.च्या पदवीला ते कायमचे वंचित राहिले.
शेजवलकरांच्या व्यावसायिक कारकिर्दीतील दोन ठळक टप्पे म्हणजे ‘प्रगती’ या साप्ताहिकाचे संपादन (१९२९-३२) आणि पुणे येथील डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्रपाठक म्हणून नोकरी (१९३९-५५).
१९२९ साली मुंबईच्या कर्नाटक प्रेसचे मालक आणि चतुर प्रकाशक मंगेशराव कुळकर्णी यांनी शेजवलकरांसाठी ‘प्रगती’ नावाचे पत्र काढून दिले. पुढील तीन वर्षांत शेजवलकरांनी ते मोठ्या प्रतिष्ठेचे, उच्च दर्जाचे साप्ताहिक म्हणून नावारूपाला आणले. आपली लेखणी त्यांनी चौफेर दांडपट्ट्यासारखी चालवली. शेजवलकरांचा व्यासंग व्यापक होता. वाङ्मयाचे वाचनही वाङ्मयाच्या अभ्यासकाला लाजवील असे होते. विशेषणांची खैरात न करता सूत्रमय लेखनपद्धतीने लिहिण्याकडे त्यांचा कल होता. त्यांनी केलेले वाङ्मय-समीक्षण वैशिष्ट्यपूर्ण आहे.
आज ६०-७० वर्षांनीही त्यांच्या लिखाणाकडे पाहता लेखकाच्या चिंतनातील द्रष्टेपण अधिक पारदर्शक वाटते. ‘माझे रामायण’, ‘ब्राह्मणकन्या’, ‘सुशीलेचा देव’, ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ या पुस्तकांची त्यांनी केलेली परीक्षणे काय किंवा ‘विभावरीचे टीकाकार’ या पुस्तकाची प्रस्तावना काय, ते निर्भीड समीक्षेचे वस्तुपाठ होते. ‘प्रगती’ साप्ताहिकातील राजवाडे आणि भांडारकर, दयानंद, न्यायमूर्ती तेलंग, आगरकर, ‘प्रतिभा’ पाक्षिकातील डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, ‘सह्याद्री’ मासिकातील समाजशास्त्रज्ञ डॉ. केतकर यांच्यासारख्या व्यक्तींच्या कार्यांचे मूल्यमापन करणारे, त्यांच्यातील मतप्रवाहांचे दर्शन घडविणारे, त्यांच्या जीवनादर्शाची चिकित्सा करणारे लेखन केवळ अभ्यासनीयच नव्हे, तर देशकारण, समाजकारण यांसंबंधीची जाण व समज उंचावणारे आहे.
शेजवलकरांनी मराठा इतिहासाचा कालखंड दोन भागांत विभागला होता. एक म्हणजे शिवाजीचे युग आणि दुसरे पेशव्यांचे युग. शिवाजीच्या युगाचे ते फार मोठे समर्थक होते, तर पेशव्यांच्या युगावर त्यांनी टीकेची झोड उठविली होती. त्यांच्या मते, पेशवे यांनी शिवाजीचा मार्ग न अनुसरल्यामुळे मराठ्यांच्या सत्तेचा र्हास झाला.
शेजवलकर १९१८ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात जाऊ लागले. तेथील संशोधकांपैकी द.वि. आपटे यांचा प्रभाव शेजवलकरांवर पडला. गो.स. सरदेसाई यांच्याबरोबर त्यांनी काही काळ बडोद्याला काम केले. या अल्पकालीन सहवासात सरदेसाई यांनी शेजवलकरांची चिकित्सक बुद्धी हेरून त्यांना ‘नानासाहेब पेशवे’ या पुस्तकास प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. शेजवलकरांनी पेशव्यांविरुद्धचे आपले विचार स्पष्टपणे प्रस्तावनेत लिहिले. नानासाहेब पेशव्यांबद्दलची सरदेसाई आणि शेजवलकरांची मते अगदीच विरुद्ध होती. या विचारप्रक्षोभक प्रस्तावनेमुळे शेजवलकरांचे नाव इतिहासक्षेत्रात गाजू लागले.
१९५४ मध्ये शेजवलकरांनी ‘निझाम-पेशवे संबंध’ हा ग्रंथ लिहिला. यामध्येही त्यांनी पेशवेकालावर टीका केली आहे. पेशव्यांनी निझामाला कधीही पूर्णपणे नेस्तनाबूद केले नाही. निझामाबाबतची त्यांची राजनीती नेहमीच अस्थिर होती. दख्खनमध्ये निझाम स्थिर होण्यामागे पेशव्यांची राजनीतीच जबाबदार होती, असे प्रतिपादन शेजवलकरांनी यामध्ये केलेले आहे.
यानंतरचे शेजवलकरांचे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘पानिपत-१७६१’ हे होय. शेजवलकरांनी या पुस्तकात वि.का. राजवाडे व जदुनाथ सरकार यांच्या १७६१ च्या पानिपताच्या प्रसंगावरील लिखाणांतील त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. राजवाड्यांनी पानिपत युद्धाचे खापर मल्हारराव होळकर किंवा गोविंदपत बंदेले यांच्यावर फोडले; परंतु शेजवलकरांनी राजवाड्यांच्या या मताचे जोरदार खंडन केले. त्यांच्या मते, मराठ्यांची प्रशासकीय अव्यवस्था पानिपताच्या पराभवाला कारणीभूत होती. तसेच पानिपत ही राष्ट्रीय आपत्ती होती. मराठ्यांनी मुलूख संपादण्यासाठी अथवा स्वतःच्या भरभराटीसाठी हे युद्ध केले नव्हते. त्यामागे, ‘भारतीयांसाठी भारत आणि भारतीयांचे राज्य’ या तत्त्वाचा बचाव करण्याचे ध्येय होते असे शेजवलकरांचे म्हणणे होते.
शेजवलकरांचे लेख ः
‘दत्तोपंत आपटे व्यक्तिदर्शन’ (१९४०), ‘निजाम-पेशवेे संबंध ः अठरावे शतक’ (१९५९), ‘पानिपत ः १७६१’ (१९६१), ‘कोकणच्या इतिहासाची पार्श्वभूमी’ (१९६१), ‘श्रीशिवछत्रपती ः संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने’ (१९६४), ‘नानासाहेब पेशवे’ (लेखक : गो.स. सरदेसाई) या ग्रंथाची प्रस्तावना आणि शेजवलकरांचे इंग्रजी ग्रंथ : झरळिरिीं : १७६१ (१९४६) आणि ढहश खषिर्श्रीशलिश षि र्चीहराारवरि र्उीर्श्रीीींश िि ींहश कळर्विी उर्ळींळश्रळूरींळिि (१९१८). शेजवलकरांनी छरर्सिीी अषषरळीी, खंड १ (१९५४) आणि खंड २ (१९५९) हे मराठी कागदपत्रांचे संग्रह संपादित करून त्यांचे प्रस्तावनालेखन इंग्रजीत केले आहे.
शेजवलकरांनी हाती घेतलेला शेवटचा मोठा विषय म्हणजे ‘शिवछत्रपतींचे चरित्र’ होय. मुंबईच्या मराठा मंदिराने त्यांच्याकडे हा प्रकल्प सोपविला. त्यांनी हाती घेतलेला शिवचरित्र लेखनाचा महाप्रकल्प त्यांच्या मृत्यूमुळे दुर्दैवाने पूर्ण होऊ शकला नाही ही मराठा इतिहास-लेखनक्षेत्रातील मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. पण शेजवलकरांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी केलेल्या कामाची एकत्र जुळणी करून निदान शिवाजीविषयक सुमारे साडेसहाशे पानी ग्रंथ सिद्ध तरी होऊ शकला. (‘श्रीशिवछत्रपती ः संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने’) हा ग्रंथ व त्यातील अठ्ठ्याण्णव पानी अपूर्ण प्रस्तावना यांचे मोल एवढे मोठे आहे, की या ग्रंथासाठी शेजवलकरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार (मरणोत्तर) प्राप्त झाला.
विविध साहित्य प्रकारांत गती असूनही त्यांचे जीवनक्षेत्र ‘इतिहास संशोधन’ हेच होते. इतिहास, भूगोल, भूस्वरूपवर्णन, कालगणना, राजनीती, सैन्यरचना इत्यादी शास्त्रांचा, तसेच समाजशास्त्र व मानवशास्त्राचा त्यांनी सूक्ष्म अभ्यास केला होता.
२.दीक्षित, राजा; ‘निवडक शेजवलकर’, साहित्य अकादमी, नवी दिल्ली; २००७.
३.देशपांडे, सुरेश; ‘मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार’, गोकूळ मासिक प्रकाशन, पुणे; १९९४.
४. कुलकर्णी, अ.रा.; ‘मराठ्यांचे इतिहासकार’, डायमंड पब्लिकेशन, पुणे; २००७.
५.नाफडे, जगन्नाथ, ‘मराठा इतिहासाचे एक श्रेष्ठ आचार्य कै. त्र्यं.शं. शेजवलकर’, ‘संशोधक’, वर्ष ६१, अंक ३; १९९३.