Skip to main content
x

शेख सत्तार सादी

      काश्मीर ते कन्याकुमारी आणि राजस्थान-गुजरात ते आसाम, मेघालयपर्यंत पसरलेल्या आपल्या भरतखंडातील ग्रमीण जनजीवन आणि तिथली निसर्गचित्रे, विशेष करून जलरंग आणि पोस्टर कलर्सच्या माध्यमांतून कौशल्याने रंगविणारे चित्रकार म्हणून सत्तार सादी ऊर्फ एस.एस. शेख हे परिचित आहेत. त्यांची निसर्गचित्रे अनेक दिनदर्शिका, भेटकार्ड तसेच अनेक वस्तूंच्या दर्शनी भागावर छापली गेली. ही चित्रे घरोघरी आणि देश-विदेशी पोहोचली.

एस.एस. शेख यांचा जन्म सावंतवाडी येथे  झाला. त्यांचे वडील सादी शेख हे एका गिरणीमध्ये काम करीत. त्यांच्या आईचे नाव फातिमा शेख होते. घरात खाणारी तोंडे अधिक आणि कमवणारी व्यक्ती एक अशी परिस्थिती असल्यामुळे आपल्या मुलाने चित्रकलेच्या नादात पडू नये असे वडिलांना वाटे.

बालपणापासून सत्तारांचा चित्रकलेकडे ओढा होता आणि त्यांना अभ्यासाचा कंटाळा होता. त्यांची मोठी बहीण कुलसुम छान चित्रे काढी. आरशासमोर बसून स्वत:चे चित्र (सेल्फ पोर्ट्रेट) ती पेन्सिलीने रेखाटत असे. या मोठ्या बहिणीने आणि आईने सत्तारला खूप प्रोत्साहन दिले. बालपणीच्या चित्रकलेच्या ध्यासाविषयी एस.एस. शेख आठवण सांगतात, की एकदा शाळेतल्या चित्रकलेच्या स्पर्धेतल्या चित्रासाठी मित्राकडून ब्रश घेण्याकरिता ते घरी न सांगताच शेजारच्या गावी गेले होते. ब्रश घेऊन येताना वाटेत त्यांना एका गाडीने धक्का दिला आणि ते रस्त्यात बेशुद्ध होऊन पडले. त्यांना घरी आणेपर्यंत शुद्ध नव्हती. पण हातातला ब्रश मात्र त्यांनी घट्ट धरून ठेवला होता. त्या आजारी अवस्थेतही रात्र जागून त्यांनी चित्र पूर्ण केले.

तत्कालीन चित्रकार एस.एम. काझी आणि जी.डी. त्यागराज हे त्यांचे आवडते चित्रकार होते. त्यांच्या निसर्गचित्रांनी ते प्रेरित झाले. शाळेत शिकत असतानाच एका वरिष्ठ चित्रकाराकडे त्यांनी दरमहा ७५ रुपयांची नोकरी धरली. त्या वेळी दिवसाकाठी उत्साहाने ते चार-पाच निसर्गचित्रे रंगवून देत. परंतु ही चित्रे तो वरिष्ठ चित्रकार मोठ्या हॉटेलांत भरमसाट किमतीला विकतो हे कळल्यावर त्यांनी ती नोकरी सोडली.

सत्तार यांना १९५७ साली एस.एस.सीच्या बोर्ड परीक्षेत चित्रकला विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल रोख बक्षीस मिळाले. मुंबईला सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घ्यायचे नक्की ठरल्यावर वडिलांच्या इच्छेखातर डी.टी.सी.ची प्रथम परीक्षा ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. आपल्या मुलाने निदान शाळेतील कला-शिक्षकाची नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. पण शेख यांनी पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. ते १९६२ मध्ये फाइन आर्ट्सची जी.डी. आर्ट पेंटिंग ही शासकीय पदविका प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

त्यांना १९५९ साली सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे सुवर्णपदक, डॉली कर्सेटजी द्वितीय पारितोषिक, बॉम्बे आर्ट सोसायटीची पारितोषिके : १९६२, १९६८ आणि १९८४, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे पारितोषिक : १९८८, बेस्ट कॅलेंडर पेंटिंगसाठी १९८६ मध्ये नॅशनल अवॉर्ड, १९९७ मध्ये रझा अकादमीतर्फे स्वतंत्रता सुवर्ण महोत्सवी वर्षात विशेष सन्मान पुरस्कार आणि २००४ साली रवी परांजपे फाउण्डेशनतर्फे ‘कृ.रा. परांजपे गुणिजन कला पुरस्कार’, २०१२ मध्ये नाशिक कला निकेतनचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले.

आर्ट स्कूलमध्ये शिकत असतानाच त्यांची निसर्ग- चित्रे मुंबईच्या फ्लोरा फाउण्टन येथील सद्गुरू फ्रेम वर्क्स येथे चांगल्या किमतीला विकली जात. या चित्रांत ग्रमीण जीवन आणि ग्रमीण निसर्गातील वातावरणाच्या विषयांवर भर दिलेला असे. जवळजवळ ५० वर्षांहून अधिक काळ एस.एस शेखांनी ग्रमीण जीवनाधारित निसर्गचित्रे रंगवून आपल्या स्वतंत्र शैलीचा ठसा दिनदर्शिका चित्रांमध्ये उमटविला. सुरुवातीची ८-१० वर्षे ते चित्रकार जे.पी. सिंघल यांच्याकडे बॅकग्रउण्ड आर्टिस्ट म्हणून कार्यरत होते.

काही नामवंत कंपन्यांसाठी काढलेली शेख यांची चित्रे विशेष गाजली. उदा. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ब्राइट प्लॅस्टिक, मफतलाल, माइको, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक इत्यादी. अशा कॅलेंडर चित्रांव्यतिरिक्त त्यांची अनेक तैलरंग आणि जलरंगांतील निसर्गचित्रे देश-विदेशी कॉर्पोेरेट कंपन्यात, हॉटेल्स आणि खासगी संग्रहांत आहेत.

एस.एस. शेखांच्या निसर्गचित्रांत, विशेषत: ग्रमीण भागांचे भौगोलिक स्थानवैशिष्ट्य, वातावरण आणि त्या-त्या गावांतील जनजीवन, वेशभूषा यांची मांडणी अभ्यासपूर्वक असे. चित्रांतील छाया-प्रकाश आणि रंग छटा यांना प्राधान्य देऊन ते आकारांची रचनाकृती  साकार करीत. त्यांच्या चित्रांत रंगांचा भगभगीतपणा दिसून येत नाही. त्यांचे म्हणणे असे, की निसर्ग हा सौम्य रंगांचा कोलाज आहे. निसर्गात वातावरणातून जाणवणारा कोणताही रंग भडक नाही आणि कोणतीही छटा अगदी गडद नसते. हाच फॉर्म्यूला ते आपल्या चित्रात लागू करतात.

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ निसर्गचित्रांत रमणारे एस.एस. शेख यांना २००५ साली अर्धांगवायूचा पहिला झटका आला आणि २००९ मध्ये दुसरा; त्यामुळे आता त्यांचे काम पूर्णतया थांबले. तरीदेखील अजूनही ते आपल्या चित्रकार मित्रांसमवेत कलाजगताच्या आठवणींत रमत असतात.

- वासुदेव कामत

शेख सत्तार सादी