Skip to main content
x

शेख याकुब मलक

     नागपुरातल्या ज्येष्ठ चित्रकारांपैकी एक महत्त्वाचे चित्रकार याकूब मलक शेख यांचा जन्म नागपूर येथील मेहंदीबागमध्ये झाला. त्यांचे वडील मौलाना मलकसाहेब हे नागपुरातील अत्बा-ए-मलक बदर समुदायाचे प्रमुख होते. याकूब शेख यांचे धार्मिक शिक्षण मौलाना बदरुद्दीनसाहेब यांच्याकडे झाले.

लहानपणापासून कलेची आवड असलेल्या याकूब शेख यांचे कलाशिक्षण मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये झाले व तेथे ग्लॅडस्टन सॉलोमन, रावबहादूर धुरंधर व जगन्नाथ अहिवासी यांसारखे गुरुवर्य त्यांना लाभले. शेख १९३४ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पुनश्‍च नागपूरला परत आले.

नागपूरला परतल्यानंतर ते त्या काळच्या प्रसिद्ध ‘मेहदीबाग शॉप’मध्ये पिढीजात कौटुंबिक व्यवसायाची सूत्रे सांभाळण्यात मग्न झाले. उपजीविकेची व्यवस्था लावल्यानंतर मात्र त्यांनी आपला रविवारच्या सुट्टीचा व इतर फावला वेळ चित्रकलेत सत्कारणी लावला.

शेख यांनी जे.जे.मध्ये तैलरंग, जलरंग, पेस्टल, चारकोल इ. माध्यमे व निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, स्थिरवस्तुचित्र व रचनाचित्र असे विविध प्रकार हाताळले होतेच. याखेरीज ते भित्तिचित्रांचे तंत्र शिकावयास राजस्थानात बनस्थली येथे गेले व तेथे त्यांनी ‘जयपूर फ्रेस्को’ पद्धतीचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी शिल्पकला शिकण्याच्या जिद्दीपोटी मध्यप्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातल्या सुवासरा येथील शिल्पकार दादासाहेब यावलकर यांच्याकडून माती व प्लॅस्टरमध्ये काम करायचे प्रशिक्षण घेतले.

याकूब शेख यांच्या चित्रसंपदेत विविध विषयांवरील चित्रे आहेत. त्यांपैकी त्यांच्या धार्मिक चित्रांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. शेख स्वत: त्यांच्या धार्मिक समुदायाचे म्हणजे अत्बा-ए-मलक याचे द्वितीय क्रमांकाचे प्रमुख होते. त्यांची अनेक चित्रे इस्लाम धर्मावर असली तरी इतर धर्माच्या विषयांनाही त्यांच्या चित्रांत महत्त्वाचे स्थान होते. ‘इख्वान’ या शीर्षकाच्या चित्रात याकूब यांनी एका हिंदू व एका मुसलमान व्यक्तीला एकमेकांना आलिंगन देताना दर्शविले असून त्यातून बंधुत्वाचा संदेश दिला आहे.

इस्लामी रीतिरिवाजांवर आधारलेली, तसेच नमाज हा विषय घेऊन साकारलेली त्यांची चित्रमालिका आहे. या दोन्हींत सावल्यांसारख्या आकृत्यांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर केला आहे.

शेख यांची आणखी एक प्रसिद्ध मालिका म्हणजे ‘लाइट ऑफ एशिया’. यात ख्रिस्ती, पारशी, बौद्ध इत्यादी धर्मांतील संत व धर्मगुरू हा विषय आहे. ‘पांडवांचा शेवटचा प्रवास’ आणि ‘सीता अग्निपरीक्षा’ असे हिंदू विषयही त्यांनी सहजसुंदरपणे हाताळले आहेत.

ख्रिस्ती विषयांबद्दलही त्यांना विशेष आस्था असल्याचे त्यांच्या बायबलवरील अनेक चित्रांवरून स्पष्ट होते. त्यांच्या ‘ख्राइस्ट बिफोर अ‍ॅपोसल्स’ या चित्राला नॅशनल बायबल सोसायटीतर्फे आयोजित एडिनबर्ग येथे, सन १९५९ मधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये प्रथम पारितोषिकाने गौरविले गेले.

महात्मा गांधी यांच्याबद्दल त्यांना नितांत आदर होता. गांधीजींची विविध रूपे त्यांनी साकारली. महात्मा गांधींचे त्यांनी एक भव्य चित्र रंगवले असून हे गांधीजींचे व्यक्तिमत्त्वदर्शक प्रतीकात्मक चित्र आहे. त्यात कबूतर व पंख असलेल्या आकृत्या ही स्वातंत्र्याची प्रतीके आहेत; मधमाश्या व चरखा उद्योगाचे, पॅलेट व कुंचला संस्कृतीचे, सितार सुसंवादाचे, स्तंभ सरलतेचे, कमळ व लिली सोवळेपणाची प्रतीके आहेत. इमारतीचा पाया खंबीरपणाचे, मशाल ज्ञानाचे, जहाज आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण व विमान प्रगतीचे प्रतीक म्हणून उपयोगात आणले आहे. हिंदू-मुसलमान दर्शवण्यासाठी खजूर व नारळाची झाडे दाखवली आहेत. तुटलेली तलवार अहिंसेचे प्रतीक आहे. काळे ढग हे वाईट प्रवृत्तीचे प्रतीक असून त्यातून उजळून निघणारी सूर्यकिरणे आशा व सत्यविजय दर्शवतात. याकूब हे चित्र घेऊन महात्माजींना भेटावयास सेवाग्रम येथे गेल्याचा व या चित्रावर त्यांची स्वाक्षरी घेतल्याचा उल्लेख नागपूरच्या एका वृत्तपत्रात सापडतो. या चित्राच्या खालील बाजूस तसेच शेखांनी साकारलेल्या गांधीजींच्या एका रेखाचित्रावरही गांधीजींची स्वाक्षरी आहे. याकूब शेख यांना संगीताची  अभिरुची होती. मुंबईच्या प्रा. बी.आर. देवधर यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले होते. ही आवड सावल्यांच्या स्वरूपात आकृतिबंध काढलेल्या ‘रागमाला’ या चित्रमालिकेतून व्यक्त झाली.

याकूब शेखांचे व्यक्तिचित्रणावर विशेष प्रभुत्व होते. त्यांनी त्यांच्या संप्रदायातल्या अनेक धर्मगुरूंची व्यक्तिचित्रे रंगवली, तसेच आपल्या कुटुंबीयांतील अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांपैकी याकूब यांची कन्या झेनाब हिचे ऐन तारुण्यातले पारंपरिक वेषातले व्यक्तिचित्र उल्लेखनीय आहे.

व्यक्तिचित्रणातला एक आगळावेगळा प्रकार म्हणून रंगविलेले चित्र म्हणजे याकूब यांचे स्वत:चे व त्यांच्या पत्नीचे व्यक्तिचित्र होय. या दोहोंत चित्रकाराने मोगल लघुचित्रातील लयपूर्ण नाजूकपणा आणि पाश्‍चात्त्य युरोपियन वास्तवदर्शन यांचा सहजसुंदर मेळ साधला आहे. मुसलमानी पारंपरिक पेहरावातील ही व्यक्तिचित्रे शेखांच्या प्रयोगशीलतेचा उत्तम नमुना आहेत.

याकूब शेखांना प्रवासाची, विविध स्थळे बघायची हौस होती. आपला व्यवसाय व प्रपंच सांभाळून त्यांनी देशभ्रमंती केली. त्यांनी काश्मीर, मसुरी, देवप्रयाग, लखनऊ, एलिफन्टा अशा अनेक ठिकाणची निसर्गचित्रे रंगवली. नागपूर व आसपासच्या निसर्गदृश्यांची संख्या मोठी असून छिंदवाडा येथील मलक कोठी, चिखलदर्‍याच्या किल्ल्याचे प्रवेशद्वार इत्यादी त्यांची चित्रे लक्षणीय आहेत.

शेख याकूब मलक यांच्या समग्र कलाकृतींचे १९७८ मध्ये नागपूर येथे प्रदर्शन झाले. त्यांची चित्रे सालारजंग म्यूझियम, हैदराबाद; नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय; तसेच अनेक खासगी संग्रहालयांत आहेत. नागपूरचे प्रसिद्ध साहित्यिक ग.त्र्यं.माडखोलकर आणि याकूब हे घनिष्ठ मित्र होते. तसेच नागपुरातील समकालीन चित्रकार बापूसाहेब आठवले, विनायक मसोजी व भानजीभाई पाटणकर यांच्यामध्ये शेख यांना आदराचे स्थान होते. त्यांनी आयुष्यभर वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळून सातत्याने विविध प्रकारच्या कलाकृतींची निर्मिती करून चित्रकलेच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले.

- डॉ. मनीषा पाटील

शेख याकुब मलक