Skip to main content
x

शेळके, गंगाधर जगन्नाथ

       गंगाधर जगन्नाथ शेळके यांचा जन्म वैजापूर तालुक्यातील महागाव या खेडेगावात एका सुखवस्तू शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब एकत्र होते व शेती हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. काही प्रमाणात शेतीसाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था होती. जन्मगावी शिक्षणाची पुरेशी व्यवस्था नसल्याने ते शिक्षणासाठी औरंगाबादला काकांकडे येऊन राहिले व पुढे तेथेच स्थायिक झाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयातून पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर शेळके यांनी डॉ. आंबेडकर विद्यापीठातील छापखाना विभागात नोकरी स्वीकारली. नोकरीत त्यांनी दाखवलेली सचोटी व कार्यक्षमता यामुळे त्यांना नोकरीत वेळोवेळी बढती मिळाली व छापखाना व्यवस्थापक म्हणून ते २०००मध्ये निवृत्त झाले. फावल्या वेळेत आपल्या काकांनाही ते छपाई व्यवसायात मदत करत असत. काही काळानंतर त्यांनी स्वतंत्र छापखानाही सुरू केला व त्यात नावलौकिक मिळवला.

       औरंगाबाद येथे स्थायिक झाल्यावर औरंगाबादच्या आसपास जमीन घ्यायचे ठरवले. त्यांनी १९८७मध्ये मित्रांकडून चढ्या व्याजाने कर्ज घेऊन गंगापूर तालुक्यात पन्नास हजार रुपयांना सात एकर कोरडवाहू जमीन खरेदी केली. त्यामुळे त्यांना ज्वारीसारखे एकच पीक घेता येत असे. जमिनीपासून थोड्या अंतरावर जायकवाडी धरणाचे बॅकवॉटर नदीत बारा महिने असते, पण ते पाच किलोमीटर दूर आहे. जमीन उंचावर असल्यामुळे कालव्याद्वारे पाणी येणे शक्य नसल्यामुळे इंजिनांद्वारे शेतापर्यंत पाणी आणणे सोयीचे होईल हे लक्षात घेऊन त्यांनी इंजिन बसवण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतीसाठी कर्ज द्यावे असे शासनाचे धोरण होते. त्यांनीही सहकार्याचा हात पुढे केला. त्यामुळे शेतीला शाश्‍वत पाणी मिळण्याची व्यवस्था झाली. अशा तर्‍हेने पाच किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्यासाठी पाइपलाइन टाकली. त्यांचे यश पाहून इतर शेतकऱ्यांनीही हाच मार्ग अनुसरला.

       शेळके यांनी काळानुसार पिकांचीही जाणीवपूर्वक अदलाबदल केली. पाणी उपलब्ध झाल्यावर त्यांनी उसाचा प्रयोग केला व तो यशस्वीही झाला. को. ४९१ व एम.एस. २६५ या सुधारित जातीचे बियाणे वापरल्याने दर एकरी ५५ ते ६० टन उत्पन्न मिळू लागले.

       शेळके उसाबरोबर कापूसही लावत. त्यांनी सुरुवातीच्या काळात देशी, मग कंबोडिया, एच ४ आणि आता बी.टी. कापसाचे वाण वापरले. एकरी तीन-चार क्विंटल मिळणारे उत्पादन आज एकरी १० ते १२ क्विंटल मिळत आहे. बी.टी. कापसामुळे क्रांती झाली आहे. पाणीपुरवठ्याची खात्री असल्यामुळे शेळके यांनी गव्हाचे जी. डब्ल्यू. ४९६ हे सुधारित वाण वापरून दर एकरी २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवले. नव्या पीक पद्धतीमुळे ज्वारी पेरा कमी झाला. त्यामुळे घरची भरवशाची वैरण कमी झाली व जनावरे सांभाळणे कठीण झाले. तेव्हा त्यांनी शेतीचे यांत्रिकीकरण करण्याचे ठरवले. त्यांच्याकडे ट्रॅक्टर व त्याच्या सर्व अ‍ॅक्सेसरीज आहेत. कापणीसाठी हार्वेस्टरही आहे. ते सर्व पिकांसाठी मुख्यत: रासायनिक खते वापरतात. सुधारित लागवडीचे तंत्रज्ञान वापरून त्यांनी पिकांच्या उत्पन्नात भरघोस वाढ केली आहे व त्यांची शेती इतरांना मार्गदर्शक ठरत आहे.

       - डॉ. निळकंठ गंगाधर बापट

शेळके, गंगाधर जगन्नाथ