Skip to main content
x

शेळके, शांता जनार्दन

     विविध साहित्य प्रकारांत लीलया चौफेर मुशाफिरी करणार्‍या शांता जनार्दन शेळके यांचा जन्म इंदापूर, पुणे येथे झाला. पुण्याजवळ मंचर या गावी शेळक्यांचा भला मोठा वाडा होता. एकत्र कुटुंबामुळे वाडा सदैव गजबजलेला असे. वाड्याच्या मागच्या दालनात साड्या विणण्यासाठी मागावर कोष्टीकाम चाले. त्याचा आवाज आणि वास शांताबाईच्या मनात घर करून राहिलेला असे. शांताबाईंचे आजोबा (वडिलांचे वडील अण्णा) हे शाळामास्तर होते. त्यामुळे शेळक्यांचे घर शिकलेले होते. शांताबाईंचे वडील वन खात्यात अधिकारी होते. त्यांच्या बदलीच्या नोकरीमुळे शांताबाईंचे बालपण चिखलदरा, नांदगाव, खर्डी या पुण्याच्या परिसरात गावोगाव फिरत-फिरतच गेले.

     त्यांच्या वडिलांना त्या दादा आणि आईला (अंबिका वहिनी) वहिनी म्हणत असत. त्यांना पाच मुले झाली. त्यांत शांताबाई सगळ्यांत मोठ्या! शांताबाई वडिलांच्या नोकरीच्या प्रत्येक गावी आईसोबत सतत होत्या; त्यामुळे आईच्या मृदू स्वभावाचे, तिच्या चित्रकलेचे, वाचनवेडाचे संस्कार कळतनकळत त्यांच्यावर होत राहिले. शेळक्यांच्या वाड्यात आजी-आजोबांकडे अथवा सुट्टीत आजोळी गेले की लहानपणी विविध पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक त्यांच्या कानांवर पडत. त्यामुळे कवितेची आवड, वाचनाची आवड त्या संस्कारक्षम वयात कळतनकळत रुजत गेली. शांताबाईंच्या कवितेचा अंकुर उशिरा फुलला असेल, पण त्याची बीजे मात्र बालपणीच खोलवर रुजली गेली.

     १९३०मध्ये काविळीचे निमित्त होऊन शांताबाईंच्या वडिलांचे निधन झाले. त्या वेळी शांताबाई केवळ नऊ वर्षांच्या होत्या. त्यानंतर सारे जण पुण्याला, काकांकडे आले. त्या वेळी शांताबाईंचे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते. बरीच खटपट केल्यानंतर शाळा बदलत-बदलत अखेर पुढील शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागेत झाले. सुविद्य, सुसंस्कृत आणि अभिजात अशा शाळेतील वातावरणाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले. १९३८मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. पुण्याच्याच सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्या बी.ए. झाल्या. प्रा.श्री.म. माटे, प्रा.के. ना. वाटवे, प्रा.रा.श्री. जोग यांच्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचनाची, कवितेची गोडीही वाढत राहिली. या काळात त्यांच्यावर साहित्याचे सखोल संस्कार झाले. यातूनच केव्हातरी आपण स्वतःही काही लिहून बघावे, अशी ऊर्मी मनात दाटून आली आणि महाविद्यालयाच्या नियतकालिकासाठी त्यांनी लेख लिहिला. प्रा.श्री.म. माटे यांच्या वरील अभिप्रायाने त्यांना हुरूप आला. हळूहळू शांताबाई कविता, लेख लिहू लागल्या. बी.ए. झाल्याबरोबर त्यांचा ‘मुक्ता आणि इतर गोष्टी’ नावाचा एक कथासंग्रहही निघाला. याला माटेसरांनी प्रस्तावना दिली, पण परखड मते मांडून खडसावलेसुद्धा!

     शांताबाई १९४४मध्ये संस्कृत घेऊन एम.ए. झाल्या. बी.ए.ला हुकलेले सुवर्णपदक एम.ए.च्या परीक्षेत मिळाले. पहिल्याच वर्षीचे तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांना खुद्द तात्यासाहेबांच्याच हस्ते मिळाले, ही विशेष गोष्ट होय. ‘देवांग कोष्टी’ समाजातील एम.ए. झालेल्या त्या पहिल्या महिला होत. एम.ए. झाल्यावर त्या मुंबईला आल्या. सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘समीक्षक’ या मासिकात व नंतर ‘नवयुग’ या अत्र्यांच्याच साप्ताहिकात आणि ‘दैनिक मराठा’त दोन-तीन वर्षे काम केले. विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना इथे मिळाली. साहित्यविषयक अनेक गोष्टी त्यांना शिकता आल्या.

     नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, मुंबईचे रुईया महाविद्यालय आणि महर्षी दयानंद महाविद्यालय येथे त्यांनी प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य केले. एकीकडे लेखन चालूच होते. कविता, कथा, कादंबरी, गीते, चित्रपटगीते, बालवाङ्मय, अशा विविध साहित्यप्रकारांत जवळपास शंभर पुस्तके त्यांच्या खाती जमा आहेत. लेखिका म्हणून साहित्यक्षेत्रात त्या वावरत होत्या; पण त्यांची खरी ओळख, खरी जवळीक राहिली ती कवितेशीच! हळुवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तिगीते, कोळीगीते, चित्रपटगीते, बालगीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपांतून त्यांची कविता वाचकांना भेटत असते.

     गरजेनुसार, मागणीनुसार भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील, लता मंगेशकर, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, सलील चौधरी यांसारख्या अनेक संगीत दिग्दर्शकांसाठी, चालीबरहुकूम गीते लिहून दिली. ‘पुनवेचा चंद्रमा आला घरी’, ‘ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु’सारखी चालीबरहुकूम अशी त्यांची खटकेबाज गीते आजही लोकप्रिय आहेत. आणि त्यामुळेच ‘तोच चंद्रमा नभात’ या त्यांच्या पहिल्या गीतसंग्रहाचेही रसिकांनी मनापासून स्वागत केले.

      हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिलेली, सर्वांत गाजलेली लोकप्रिय गीते आहेत कोळीगीते : ‘वादलवारं सुटलं ग’, ‘वल्हव रे नाखवा’, ‘राजा सारंगा माझ्या सारंगा’ ही सारी कोळीगीते समुद्र न पाहिलेल्या शांताबाईंसाठी एक प्रयोग होता; पण तो प्रचंड यशस्वी प्रयोग ठरला हे निश्चित.

     जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या ‘वासवदत्ता’ आणि ‘हे बंध रेशमाचे’ या दोन्ही नाटकांसाठी शांताबाईंनी गाणी लिहिली. तसेच, गारंबीचा बापू या चित्रपटासाठी शांताबाईंनी गाणी लिहिली. अशा प्रकारे कवितेच्या विविध रूपांत, विविध लेखनप्रकारांत त्या रमलेल्या होत्या.

     वैशिष्ट्य असे की, त्यांना मनापासून भावलेल्या कवितेची, त्यांच्या काव्यलेखनाची सुरुवात मात्र खूपच उशिरा सुरू झाली. शांताबाई बी.ए.च्या पहिल्या वर्षात असताना म्हणजे १९४१मध्ये त्यांची पहिली कविता ‘शालापत्रक’ मासिकात छापून आली. तीही काहीशी योगायोगाने, बालगीत या स्वरूपात. एकीकडे अनेक कवींच्या कवितांचे वाचनही मनापासून सुरू होते. रविकिरण मंडळातील कवींचा, विशेषतः माधव जूलियन यांच्या काव्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे सुरुवातीला त्या वळणाची कविताच त्या लिहीत राहिल्या.

     १९४७मधील त्यांचा ‘वर्षा’ हा पहिला काव्यसंग्रह व त्यानंतरचा ‘रूपसी’ (१९५६). या दोन्ही संग्रहांतील कवितांवर रविकिरण मंडळाच्या कवितेचा प्रभाव दिसतो. या दोनही संग्रहांचे शांताबाई स्वतःच पुढे जाऊन - ‘माझे अगदी वाईट संग्रह’ म्हणून वर्णन करतात. यानंतर ‘गोंदण’ (१९७५), ‘अनोळख’ (१९८५), ‘कळ्यांचे दिवस’, ‘फुलांच्या राती’ (१९८६), ‘जन्मजान्हवी’ (१९९०), ‘पूर्वसंध्या’ (१९९६), ‘इत्यर्थ’ (१९९८), ‘किनारे मनाचे’ हे सारे काव्यसंग्रह प्रसिद्ध होत राहिले.

     ‘गोंदण’पासून शांताबाईंची कविता कुणाच्याही अनुकरणापासून दूर असलेली होती.‘त्यांची’च कविता म्हणून शांताबाईंच्या कवितेला चेहरा मिळाला. त्यांची कविता अधिकाधिक अंतर्मुख, चिंतनशील व प्रगल्भ होत गेली. बालपणाच्या सुखद आठवणी, प्रेमवैफल्य, मानवाच्या अपुरेपणाचा वेध, एकाकीपण, नाही मी इथली, नसेन तिथली अशी मनाची हुरहुर, सृष्टीची गूढता हे सारे काव्यविषय ‘गोंदण’पासून पुढील कवितेत अधिक प्रगल्भपणे प्रतिमारूप धारण करून आपल्यापुढे येतात. वृत्तबद्ध कविता जशी त्यांनी लिहिली, तेवढ्याच सहजतेने त्यांनी गीते, बालगीते, सुनीते आणि मुक्तछंद रचनाही केल्या. ग.दि. माडगूळकरांप्रमाणेच उत्कृष्ट भावानुकूल चित्रपटगीते लिहिणारी गीतलेखिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली.

     १९९६मध्ये आळंदी येथे भरलेल्या एकोणसत्तराव्या अखिल भारतीय साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय अनेक मानसन्मान शांताबाईंना लाभले. ‘जन्मजान्हवी’ या काव्यसंग्रहासाठी कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचा ‘कुसुमाग्रज’ पुरस्कार (१९१९) मुलुंडच्या महाराष्ट्र मंडळाचा सु.ल.गद्रे ‘मातोश्री’ पुरस्कार (१९९४), उत्कृष्ट गीतलेखनाबद्दलचा पुण्याचा ‘गदिमा’ पुरस्कार (१९९५).

    शांताबाईंच्या प्रकाशित ग्रंथसंपदेपैकी विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल त्यांपैकी ‘मुक्ता’ (१९४४), ‘गुलमोहोर’ (१९४९), ‘प्रेमिक’ (१९५६), ‘काचकमळ’ (१९६९), ‘अनुबंध’ (१९८०) इत्यादी कथासंग्रह. ‘पुनर्जन्म’ (१९५०), ‘ओढ’ (१९७५) (देवांग कोष्टी समाजाच्या जीवनावर आधारित), ‘माझा खेळ मांडू दे’ इत्यादी कादंबर्‍या; ‘शहांच्या दुनियेत’ (१९५९), ‘पावसाआधीचा पाऊस’ (१९८५), ‘संस्मरणे’ (१९९०) इत्यादी वाङ्मयीन लेखसंग्रह; ‘धूळपाटी’ (१९८२) हे आत्मपर लेखन; ‘वडीलधारी माणसे’ (१९८९), ‘अलौकिक’ (१९९३) इत्यादी व्यक्तिचित्रात्मक लेखन; ‘एक पानी’ (१९८९) हे सदरलेखन यांशिवाय अनेक विदेशी इंग्रजी चित्रपटकथांचे अनुवाद, इंग्रजी कादंबर्‍यांचे अनुवाद; ‘संस्कृत सुभाषित रत्नभंडार’ आणि मेघदूताचे मराठी रूपांतर; ‘पाण्यातील पाकळ्या’ हे दोनशे जपानी ‘हायकू’ कवितांचे मराठी रूपांतर, ‘चिमणचारा’ (१९६०), ‘थुई थुई नाच मोरा’ (१९६१) इत्यादी बालगीतसंग्रह.

     “साहित्यावर जीवतोड प्रेम करणारी व्यक्ती अशीच माझी खरी ओळख,” असं शांताबाई म्हणतात, त्यांचा हा आत्मविश्वास मनाला भिडणारा आहे.

     - मंगला गोखले

शेळके, शांता जनार्दन