Skip to main content
x

शेंडे, राजेंद्र

      सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या तालुक्यातील रहिमतपूर येथे राजेंद्र शेंडे यांचा जन्म झाला. त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर मुंबईच्या पवई येथील ‘आय.आय.टी.’मधून रसायन अभियांत्रिकीतील पदवी १९७२ साली मिळवली. त्यानंतर सुमारे २० वर्षे त्यांनी भारतभरच्या विविध उद्योगसमूहांत काम केले. त्या काळात उच्च अभियांत्रिकी प्लॅस्टिकची निर्मिती, ओझोन थर नष्ट करणाऱ्या पदार्थांना पर्यायी पदार्थ शोधून काढणे, रासायनिक उद्योगात पुनर्निर्मित ऊर्जेचा वापर करणे, अशा क्षेत्रांत त्यांनी भरीव काम केले.

     या गोष्टी करत असताना त्यांचे सारे लक्ष पर्यावरण संरक्षणाकडे असे. शीतकपाट, वातानुकूलन यंत्रणा आणि अन्य उपकरणांत वापरली जाणारी क्लोरो फ्लुरो कार्बनसारखी (सी.एफ.सी.) रसायने ओझोन थर विरळ करीत आहेत असे जगाच्या लक्षात आल्यावर १९८५ साली मॉन्ट्रिअल येथे भरलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत असे पदार्थ हळूहळू वापरणे कमी करून त्याऐवजी पर्यायी पदार्थ शोधून काढण्याचे ठरले. त्यासाठी पुढील २५ वर्षांचा काळ ठरवून देण्यात आला. राजेंद्र शेंडे यांनी अशा पदार्थांवर भारतातच काम सुरू केले होते. त्यामुळे याबाबतची भारताची भूमिका ठरवण्यासाठी नेमलेल्या कृती गटात भारत सरकारने त्यांची नेमणूक केली. हा करार स्वीकारण्याच्या बदल्यात विकसित देशांनी, विकसनशील देशांना विकासासाठी आर्थिक सहकार्य मिळवण्याचा मुद्दा लावून धरला. विशेष म्हणजे, या आंतरराष्ट्रीय वाटाघाटींना यश आले आणि विकसित देशांनी भारतासारख्या विकसनशील देशांना देण्यासाठी स्वतंत्र, दोन अब्ज अमेरिकन डॉलरचा निधी उभा केला. मॉन्ट्रिअल करारानुसार जगातल्या १४५ देशांनी पृथ्वीवरील ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी काही खास उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. राजेंद्र शेंडे यांच्या नेतृत्वाखालील ‘ओझोन कृती विभाग’ या देशांना त्याबाबत सहकार्य करतो. राजेंद्र शेंडे यांच्या कामाची दखल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने घेतली असून त्यांना ‘क्लायमेट चेंज अवॉर्ड’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण हे करताना, हरितगृह वायूंचे उत्सर्जन टाळण्यासाठी नवनवे प्रयोग राबवून या देशांना मॉन्ट्रिअल कराराचे दुहेरी लाभ मिळवून देण्यापाठीमागे असलेली शेंडे यांची कल्पकता आणि चिकाटी यांमुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे पुरस्कार समितीने स्पष्ट केले.

     २००५ साली शेंडे यांच्या नेतृत्वाखालील ‘ओझोन कृती कार्यक्रम’ हा अमेरिकन सरकारच्या पर्यावरण संरक्षण संस्थेचा ‘स्टॅटोस्फिअरिक ओझोन संरक्षण’ पुरस्कार मिळणारा युनोचा पहिला कार्यक्रम ठरला. २००९ साली तापमानविरोधी कार्याबद्दल दोन अमेरिकन पुरस्कार मिळवणारे शेंडे हे पहिले भारतीय ठरले आहेत. डॉ.शेंडे यांचे वास्तव्य पॅरिसमध्ये असते. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या. १९९९ साली त्यांची पॅरिस येथे स्थापन झालेल्या ओझोन कृती गटाच्या प्रमुखपदी नेमणूक झाली. तेव्हापासून ते याच क्षेत्रात काम करीत आहेत. गेली काही वर्षे ते युनोच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या अंतर्गत काम करणाऱ्या ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट’ (आय.पी.सी.सी.) या संस्थेच्या ओझोन कृती विभागाचे प्रमुख आहेत. २००७ साली या संघटनेच्या पर्यावरण स्थितिदर्शक अहवालाचे संपादन करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्या वर्षी या संघटनेला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. जगभरातले तापमान झपाट्याने वाढत असल्याची ओरड गेली काही वर्षे सातत्याने ऐकायला मिळते. तरी त्यासंबंधी काही ठोस भूमिका घेऊन काम करणाऱ्या अपवादात्मक व्यक्तींत शेंडे यांचे नाव घ्यायला हवे.

     ओझोन थर विरळ झाल्याने त्वचेचे कर्करोग उद्भवतात, शिवाय एकूण जीवसृष्टीवर त्यामुळे विपरीत परिणाम होतो. परंतु शेंडे यांच्यासारख्या व्यक्तींनी ‘युनो’च्या पातळीवर केलेले काम आणि जगातल्या सर्व देशांनी सी.एफ.सी.सारख्या पदार्थांऐवजी इतर पदार्थ वापरायला केलेली सुरुवात यांमुळे ओझोन थराचा विरळपणा कमी होऊ लागला असून तो पूर्ववत व्हायला अजून ४०-५० वर्षे लागतील. पण ‘युनो’सारख्या संस्था पृथ्वीचे झालेले नुकसान परत पूर्ववत करू शकतात हा भरवसा यातून मिळत असल्याने एक मोठा दिलासा प्राप्त होतो आणि यात एखाद्या भारतीयाचा मोठा वाटा असणे ही बाब आपल्याला कितीतरी आनंद मिळवून देणारी आहे.

     शेंडे यांनी सौरऊर्जेवर चालणारे शीतकपाट (रेफ्रिजरेटर) बनवले. त्याला ‘सौरचिल’ असे नाव दिले; कारण या शीतकपाटामध्ये सौरऊर्जा बॅटरीत न साठवता, ती बर्फात साठवली जाते. यात डी.सी. विजेवर चालणारे कॉम्प्रेसर्स वापरतात. आपल्या घरच्या शीतकपाटामध्ये ए.सी. विजेवर चालणारे कॉम्प्रेसर्स वापरले जातात. या  शीतकपाटांना ‘सोलर पॉवर्ड’, ‘ओझोन फ्रेंडली’, ‘व्हॅक्सिन रेफ्रिजरेटर्स’ असे म्हणतात. यात पर्यावरणस्नेही ‘हायड्रोकार्बन रेफ्रिजरंट’ वापरतात. नेहमीसारखे ‘क्लोरो फ्लुरो कार्बन’ (सी.एफ.सी.) आणि ‘हायड्रो फ्लुरो कार्बन’ (एच.एफ.सी.) रेफ्रिजरंट वापरत नाहीत. २००५ साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी पहिली दोन शीतकपाटे शेंडे यांच्याकडून विकत घेतली होती आणि आपल्या राष्ट्रपती भवनातील निवासात वापरले होते.

     राजेंद्र शेंडे हे जरी पॅरिसला स्थायिक असले तरी त्यांचे आपल्या मूळ रहिमतपूर गावावर चांगलेच लक्ष असून, तेथे आता पर्यावरण विकासाचे काही प्रकल्प त्यांनी हाती घेतले आहेत.

अ.पां. देशपांडे

शेंडे, राजेंद्र