Skip to main content
x

शेंडगे, भीमाशंकर रामचंद्र

           अ‍ॅनिमेशन तंत्र भारतात विकसित करण्यात महत्त्वाचा सहभाग असलेले चित्रकार भीमाशंकर रामचंद्र शेंडगे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९३६ रोजी सांगली येथे झाला. विद्यार्थिदशेत चित्रकार पंत जांभळीकरांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि पुढेही वेळोवेळी त्यांनी दिलेला सल्ला शेंडगे यांनी शिरोधार्य मानला. कलाशिक्षणासाठी ते मुंबईत आले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी पेन्टिंग व कमर्शिअल असे दोन्ही अभ्यासक्रम एकाच वेळेस शिकण्यास सुरुवात केली. १९५९ मध्ये पेन्टिंग, १९६० साली डीटीसी (ड्रॉईंग टीचर्स सर्टिफिकेट) आणि १९६१ मध्ये कमर्शिअल आर्ट व आर्ट मास्टरची पदविका त्यांनी संपादन केली. परुळेकरांच्या सांगण्यावरून ते बांद्रा स्कूल ऑफ आर्टमध्ये अध्यापक म्हणून काही काळ जात होते.

१९६१ मध्ये शेंडगे यांना फिल्म्स डिव्हिजनमध्ये नोकरी मिळाली. तिथे त्यांनी ग्रेड टू आर्टिस्टपासून सुरुवात केली व अ‍ॅनिमेशनचे तंत्र चौकसपणे स्वत:हून आत्मसात करत ऑफिसर इनचार्ज, प्रोड्युसर अशा वरच्या पदापर्यंत पोहोचले. १९९४ मध्ये ते फिल्म्स डिव्हिजनमधून निवृत्त झाले. अभिजात चित्रकलेचा वारसा जपत अ‍ॅनिमेशन तंत्राला कल्पक कलात्मकतेची जोड देणारे आणि पटकथा लेखनापासून कॅरॅक्टर डिझाइन, पार्श्‍वभूमी, दिग्दर्शन अशा विविध अंगांची उत्तम जाण असलेले अ‍ॅनिमेटर म्हणून शेंडगे यांचा उल्लेख करावा लागेल. फिल्म्स डिव्हिजनच्या अ‍ॅनिमेशन विभागाला स्वत:ची वेगळी ओळख देणारे राम मोहन यांनी राजीनामा दिल्यानंतर शेंडगे यांनीच या विभागाला सावरले आणि त्याचा कलात्मक दर्जा कायम ठेवला. शेंडगे यांच्या कारकिर्दीत फिल्म्स डिव्हिजनला अ‍ॅनिमेशन लघुपटांसाठी असलेली राष्ट्रीय पातळीवरची अनेक पारितोषिके राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालीच; पण झाग्रेब, अ‍ॅनेसी यांसारखी प्रतिष्ठेची सर्वाधिक आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे व चार आंतरराष्ट्रीय पारितोषिकेही शेंडगे यांना मिळालेली आहेत. त्यानिमित्ताने त्यांना परदेशी जाण्याची आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अ‍ॅनिमेटर्सशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

शेंडगे यांच्यावर चित्रकार म्हणून जांभळीकरांचा आणि सोलेगावकरांचा प्रभाव पडला. ‘निसर्गचित्रामध्ये जवळच्या भागावर (ऋिीशर्सीिीवि वर) लक्ष केंद्रित करा, पार्श्वभूमीची काळजी आपोआप घेतली जाईल; चित्रांमध्ये ईश्वराप्रमाणे मध्यवर्ती असलेला केंद्रबिंदू शोधा आणि त्याभोवती रचना करा.’ अशी जांभळीकरांची शिकवण होती. तर सोलेगावकर सांगत, ‘निसर्गदृश्यातला प्रकाश पकडा, सावलीचा भाग व त्या भागातील बारकावे बघू नका.’ भारतीय शैलीतून आलेली मातीच्या रंगांशी सादृश्य असलेली रंगसंगती (एरीींह उर्श्रििीीी) हे सोलेगावकरांचे वैशिष्ट्य होते.

चित्रकार म्हणून असलेल्या या कलाजाणिवेचा शेंडगे यांना अ‍ॅनिमेशनमध्ये खूप उपयोग झाला. अ‍ॅनिमेशन हे खरे तर व्यंगकला आणि कार्टून यांचे माध्यम, पण लघुपटातील पात्रांची व्यक्तिमत्त्वे साकारताना आणि पार्श्वभूमीसाठी कधीकधी कोलाज, कधी पॉईंटिलिझम शैलीमधले रंगांचे ठिपके, तर कधी जाड रंगांचा वापर (खारिीीिं) करून शेंडगे यांनी अ‍ॅनिमेशनच्या तंत्राला अभिजाततेचा स्पर्श दिला व कथावस्तूच्या आशयात भर घातली. शेंडगे यांच्या लघुपटांमध्ये पेंटिंगमधील लयबद्ध रचनेची समृद्ध जाण आणि अ‍ॅनिमेशनचे तंत्र यांची सांगड दिसते ती त्यामुळे.

अ‍ॅनिमेटर म्हणून वॉल्ट डिस्नेच्या सफाईदार, आकर्षक शैलीचा प्रभाव शेंडगेंवर फारसा पडला नाही. नॉर्मन मॅक्क्लॅरेन यांच्या सर्जक प्रायोगिकतेचा (फिल्म खरवडून रेखांकित प्रतिमा गतिमान आणि जिवंत करणे) ट्रंका यांनी केलेल्या पपेट्सच्या वापराचा आणि जॉन हॅलास यांच्या तंत्राचा शेंडगेंवर विशेष प्रभाव पडला. ‘अंब्रेला’, ‘सिंथेसिस’, ‘प्रेशियस वॉटर’, ‘लॉ ऑफ नेचर’, ‘द थिंकर’, ‘रेस विथ डेथ’, ‘एण्ड गेम’, ‘द बलून’, ‘माय ट्री’ ही त्यांनी केलेल्या आणि गाजलेल्या काही लघुपटांची नावे.

मर्यादित तांत्रिक साधने असूनही शेंडगे यांनी अ‍ॅनिमेशनच्या सुरुवातीच्या काळात जी सर्जक कलात्मक दृष्टी आणली, ती आजच्या अ‍ॅनिमेशनच्या तंत्रदृष्ट्या प्रगत काळातही तितकीच महत्त्वाची आहे.

- दीपक घारे, रंजन जोशी

शेंडगे, भीमाशंकर रामचंद्र