Skip to main content
x

शेट्टी सुदर्शन

      अभिव्यक्तीच्या आधुनिक आणि नवनवीन वाटा चोखंदळपणे अभ्यासणारे सुदर्शन शेट्टी यांचा जन्म मंगलोर येथे झाला. त्यांचे संपूर्ण बालपण मुंबईतील दादर येथे गेले. त्यांचे वडील वासू शेट्टी हे मुंबईत उपजीविकेसाठी आले. त्यांनी प्रपंचासाठी अनेक लहानसहान उद्योग केले. ते स्वतः यक्षगान कलावंत होते. यक्षगानात रामायण, महाभारतील पौराणिक विषय सादर केले जातात, आणि नृत्य, गायन, वादन, अभिनय या सर्वांचा एकत्रित परिणाम रंजक व मनोहारी असतो. असा संपन्न कलेचा वारसा लाभलेले सुदर्शन शेट्टी यांना कन्नड एज्युकेशन सोसायटीतील कलाशिक्षक  एस.के. प्रभू यांनी चित्रकलेचे प्राथमिक धडे दिले. त्यांची चित्रकलेची ओढ पुढे अधिकाधिक वाढत गेली.

शालेय शिक्षणानंतर सुदर्शन शेट्टी यांनी वाणिज्य शाखेत महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पण चित्रकलेबद्दलच्या ओढीमुळे वाणिज्य शाखेचे शिक्षण अर्धवट सोडून शेट्टी पुढे कलाशिक्षणासाठी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. तेथे त्यांची १९८० ते १९८५ या काळात प्रा. प्रभाकर कोलते यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या मार्गदर्शनातून पुढील वाटा दिसू लागल्या. जे.जे.तील शिक्षण सुरू असतानाच ते अनेक मोठ्या कलावंतांना भेटले. बडोदा, बंगाल स्कूलबद्दल त्यांना माहिती मिळाली.

आधुनिक कलेतील विविध प्रवाह, शैली व परंपरा यांच्यातील बदल त्यांच्या लक्षात आला. आपण या सर्वांत नवीन काय करू शकतो, हा प्रश्‍न त्यांना भेडसावत होता. रॉबर्ट रॉशेनबर्ग, जॅस्पर जॉन्स यांचा प्रभाव पचवून त्यांनी आपला स्वतंत्र मार्ग विकसित केला.

कला व जीवनाकडे पाहण्याचा पाश्‍चिमात्यांचा  दृष्टिकोन भिन्न आहे; त्यांचे अनुकरण करण्यापेक्षा आपण स्वतः आपली मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकतो, अशा भावनेतून शेट्टी यांचा कला आविष्कार फुलला आहे.

मांडणशिल्पे (इन्स्टॉलेशन) सारखी आधुनिक माध्यमे आज ते यशस्विरीत्या हाताळत आहेत. वस्तूची उपयोगिता आणि सौंदर्यमूल्ये यांच्याविषयी सुदर्शन शेट्टी नेहमी विचार करतात. वस्तूंचा पोत, रंग, छायाभेद व हालचाल यांचा अभ्यास करून आपल्या इन्स्टॉलेशनला  ते नवीन रचना व बोधमूल्ये देतात. कलाकृतीत सूचकता अतिशय महत्त्वाची असते. ती विषयाला दिशा देते व सौंदर्य फुलवते.

त्यांच्या कलाकृतीतून समकालीन नागरी जीवन प्रतिबिंबित होते. बालपणीच्या आठवणीतील व्यक्तिरेखा ही त्यांची प्रेरणास्थाने आहेत. विशिष्ट रचनातंत्राने त्यांच्या कलाकृती विलक्षण परिणामकारी ठरतात. त्यांत कल्पकता व खेळकरपणा असतो. राजकारण व अर्थकारणापासून मुक्त होऊन निखळ आनंद देणार्‍या शेट्टी यांच्या कलाकृतीत निरागस बाल्य दिसून येते.

सामाजिक चौकटीपासून मुक्त; परंतु दैनंदिन जीवनातील सभोवताली विखुरलेले छोटे-छोटे अनुभव यांच्या संयोजनातून तयार झालेल्या त्यांच्या कलाकृती काहीशा प्रातिनिधिक, अमूर्त वाटतात. या छोट्या-छोट्या अनुभवांची मांडणी करीत असताना समकालीन समाजातील विविध बाबी नावीन्य घेऊन समोर येतात.

शेट्टी यांची शैली त्यांच्या कामांमधून विकसित झाली. शेट्टी यांच्या बहुतेक कलाकृती म्हणजे मांडणशिल्पे असतात. ‘पेपरमून’ हे पेपरच्या माध्यमातून केलेले त्यांचे शिल्प विशेष गाजले. याआधी शेट्टी कॅन्व्हसवर वस्तू चिकटवून त्रिमितीच्या दिशेने प्रयोग करीत होते. ‘पेपरमून’ हे १९९५ मध्ये झालेले त्यांचे पहिले प्रदर्शन होय. मुंबईच्या ‘भाऊ दाजी लाड म्युझियम’मध्ये २०१० मध्ये ‘धिस टू शॅल पास’ नावाचे त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरले होते. मुंबई, भोपाळ, सिंगापूर, टोकियो, कोरिया, पॅरिस इ. ठिकाणी त्यांच्या कलाकृतींची प्रदर्शने झालेली आहेत.

‘पेपरमून’नंतर त्यांनी मांडणशिल्पे करण्यास सुरुवात केली. मोठा घोडा आणि त्याच्या पाठीवरचे छोटेसे घर, डायनोसॉर आणि मोटार, अगदी अलीकडच्या प्रदर्शनातली लाकडी कोरीवकाम असलेली कमान, स्वतःचे व्यक्तिचित्र असलेले शिल्प अशी मांडणशिल्पे ते करतात तेव्हा ती नाट्यपूर्ण परिणाम साधणारी आणि रंजकही असतात. शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार ती नेत्रदीपक असतात; पण अर्थहीन असतात.

जगातल्या वस्तूंचे संदर्भ बदलले की त्यांचे अर्थही बदलतात. वस्तूंना कवटाळून बसण्यापेक्षा अर्थपूर्ण संदर्भांच्या अवकाशात वस्तूंची नित्यनूतनता आणि क्षणभंगुरता अनुभवणे यांतून शेट्टी यांच्या मांडणशिल्पांची निर्मिती झालेली आहे.

नव्या माध्यमांमुळे चित्रकारांची बीज अंकुरित करण्याची पद्धत आणि ती व्यक्त करण्यातली विविधता वाढलेली आहे. त्यामुळे दृश्यकलेतली भावगर्भता कमी होऊन तिची जागा वैचारिकतेने घेतलेली दिसते. शेट्टी यांच्या शिल्पांनाही हे वैचारिक संदर्भ आहेत.

- गणेश तरतरे

शेट्टी सुदर्शन