Skip to main content
x

शहाणे, किशोरी

     घरात अभिनयाचा वारसा नसूनही, आपल्या अभिनयाच्या जोरावर लहान वयातच मोठ्या पडद्यावर आपले अस्तित्व सिद्ध करणारी एक रूपसंपन्न अभिनेत्री म्हणून किशोरी शहाणे यांच्या नावाचा उल्लेख करावा लागतो. किशोरी शहाणे यांचा जन्म पुणे येथे झाला. पण त्यांचे बालपण, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबईतील अंधेरी या उपनगरातील डिव्हाईन इंग्लिश हायस्कूलमध्ये त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. याच काळात ‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्यनाटिकेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. दहावीची परीक्षा दिल्यावर लगेचच त्यांना ‘मोरूची मावशी’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या  नाटकाचे त्यांनी जवळपास १२५ प्रयोग केले. याच काळात त्यांनी ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकातही काम केले.

     दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर किशोरी शहाणे यांनी मुंबईतील विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयात प्रवेश घेतला. इयत्ता ११ वीत असतानाच त्यांना ‘प्रेम करूया खुल्लमखुल्ला’ (१९८७) या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांनी अशोक सराफची नायिका (सीमा) म्हणून काम केले. पदार्पणातल्या चित्रपटातील अभिनय पाहूनच त्यांना अनेकानेक संधी मिळत गेल्या. याच दरम्यान त्यांचे शिक्षणही जोमाने चालू होते. चित्रपटात व्यग्र असल्यामुळे त्यांना महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता येत नसले, तरी त्यांनी एकदिवसीय कार्यक्रमात सहभागी होत ‘मिस मिठीबाई’चा किताबही पटकावला होता. बी.कॉम. होईपर्यंत त्यांनी एकूण २० चित्रपटांमध्ये काम केले. ‘माझा पती करोडपती’, ‘चंगूमंगू’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘आत्मविश्‍वास’, ‘माहेरची साडी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘गृहप्रवेश’ यांसारख्या चित्रपटांमध्ये कामे केली. त्यांच्या वाट्याला अनेक वेळा तरुण प्रेयसीच्या भूमिका आल्या. त्यांनी साकारलेली प्रेयसीची भूमिका त्यातल्या विभ्रमांमुळे, त्या विभ्रमांना अपेक्षित असणाऱ्या लालित्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या.

      या भूमिका करत असतानाच त्यांची दीपक बलराज विज यांच्याशी मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे पुढे प्रेमात परिवर्तन झाल्यावर वयाच्या २३ व्या वर्षी त्या विवाहबद्ध झाल्या. याच काळात त्यांनी हिंदी चित्रपटामधूनही काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी ‘हफ्ताबंद’, ‘बॉम्बलास्ट’ या चित्रपटांमध्ये कामे केली. ‘बॉम्बलास्ट’ या चित्रपटात त्यांची नायिका म्हणून निवड झाली. मुलाच्या - बॉबी विजच्या जन्मानंतर त्यांनी काही काळ आपले काम बंद केले. आपल्या कारकिर्दीचा बहरता काळ असूनही त्यांनी कुटुंबाकडे लक्ष देण्याचा घेतलेला निर्णय व त्यासाठी आपल्या आवडत्या क्षेत्रातून किंचित काळ घेतलेली विश्रांती त्यांच्यातल्या कर्तव्यदक्ष गृहिणीपणाची व आयुष्यात समतोल साधण्याच्या वृत्तीची साक्ष देणारे आहे. सर्वसामान्य स्त्रीला कुटुंबासाठी करावा लागणारा स्वेच्छेचा त्याग व त्यातून आनंद मिळवण्याची वृत्ती किशोरी शहाणे या प्रथितयश अभिनेत्रीने जोपासली, हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे.

     त्यांच्या या वृत्तीमुळेच व समतोल साधण्याच्या कौशल्यामुळेच त्या २००३ मध्ये पुन्हा एकदा आपल्या क्षेत्राकडे वळल्या आणि आपली कारकिर्द नव्याने सुरू केली, हे वाखाणण्याजोगे आहे. पुन्हा नव्याने सुरुवात करताना त्यांनी पहिल्यांदा हिंदी धारावाहिक मालिका केल्या आणि मग पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळल्या, त्या सचिन पिळगावकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकार म्हणून. या चित्रपटातील ‘चला जेजुरीला जाऊ’ ही त्यांच्यावर चित्रित झालेली लावणी त्यातल्या अदाकारीमुळे लोकप्रिय झाली. ‘एक डाव धोबीपछाड’ या चित्रपटातील त्यांची गंभीर प्रवृत्तीची भूमिकाही महत्त्वपूर्ण होती.

     त्यानंतर त्यांनी निर्मिती व दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवून ‘मोहट्याची रेणुका’ या सामाजिक भक्तिप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन केले, तर ‘ऐका दाजीबा’ या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी ‘लंगर’, ‘अघोर’, ‘येडा’, ‘एकुलती एक’ या चित्रपटांमध्येही अभिनय केला.

     स्वीकारलेल्या भूमिका, भूमिकांना अभिप्रेत असणारे तारतम्य, वेषभूषेतील सोज्ज्वळता, अभिनयातील आपलेपणा या गुणांमुळे किशोरी शहाणे या अभिनेत्री चित्रपटसृष्टीत नावाजल्या गेल्या.

- संपादित

शहाणे, किशोरी