Skip to main content
x

शहाणे, रेणुका विजय

     लेखन, दिग्दर्शन, चित्रपट, मालिका, नाटक व कार्यक्रमाचे संचालन-निवेदन करणाऱ्या रेणुका शहाणे घरोघरी पोहोचल्या त्या ‘सुरभि’ या दूरदर्शनवरील मालिकेतून. निवेदक म्हणून त्यांनी जगभरातल्या अनेकविध आश्‍चर्यांची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. ‘सर्कस’ ही शाहरुख खानसमवेत त्यांनी अभिनय केलेली अशीच एक लोकप्रिय मालिका. अफाट गाजलेल्या ‘हम आपके है कौन?’मध्ये रेणुका यांनी केलेली माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीची भूमिका आणि त्यातील ‘लो चली मैं, अपनी देवर की बारात लेके’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गीतही जबरदस्त गाजले.

      रेणुका शहाणे यांनी आजवर सुमारे चौदा मालिका, दहा चित्रपट आणि काही नाटके केली आहेत. एक विशेष दृष्टी असलेली ताकदीची अभिनेत्री आणि संवेदनशील कलाकार म्हणून रेणुका यांची आज स्वतंत्र ओळख असली, तरी अभिनेत्री होण्याचा विचार त्यांनी कधी जाणीवपूर्वक जोपासलाच नव्हता. प्रख्यात लेखिका शांता गोखले आणि नौदलात असलेले विजय शहाणे यांच्या या मुलीने मुंबईच्या सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या कलाशाखेतून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. क्लिनिकल सायकॉलॉजी हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. केले. अभिनयाची फारशी पार्श्‍वभूमी नसतानाही त्यांनी १९८६ साली ‘बंबईके कौवे’ या सत्यदेव दुबे निर्मित नाटकात ‘कावळ्या’ची भूमिका केली. त्यात फक्त दोन वाक्ये बोलण्याचे काम त्यांना करायचे होते. पुढे रेणुका यांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या ‘आंतरनाट्य’ नावाच्या ग्रूपसाठी ‘ऐन वसंतात अर्ध्या रात्री’, ‘सांधा’, ‘मागोवा’ या नाटकात अभिनेत्री म्हणून काम केलेच, त्याचबरोबर ‘आपसातल्या गोष्टी’ या नाटकाचे दिग्दर्शनही केले. पुढे ‘रीटा’ हा चित्रपट दिग्दर्शित केल्यावरही रेणुका शहाणे यांच्यातल्या दिग्दर्शकाचा पिंड प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘रीटा’ हा रेणुका यांनी दिग्दर्शक म्हणून केलेला पहिला मराठी चित्रपट. त्यांच्या आईने लिहिलेल्या ‘रीटा वेलिंगकर’ या कादंबरीवर त्यांनी हा चित्रपट बेतला. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या जाणकार नजरेने कौतुकाची पावती दिली. ‘रिश्ते’ या दूरदर्शनच्या मालिकेसाठी रेणुका यांनी ‘क्रॉस कनेक्शन’ या कथेचे दिग्दर्शनही केले. स्वत: रेणुका शहाणे यांनीच ही कथा लिहिली होती.

      राजश्री प्रॉडक्शनच्या ‘हम आपके है कौन?’मधील ‘दीदी’, ‘भाभी’ची अप्रतिम भूमिका रेणुका यांनी साकारली. सूरज बडजात्या यांनी या भूमिकेसाठी त्यांची तीन वेळा स्क्रीन टेस्ट घेतली होती. ही भूमिका अफाट लोकप्रिय झाली आणि रेणुका त्यानंतर ‘एक अलग मौसम’, ‘मासूम’, ‘दिलने जिसे अपना कहां’, ‘तुम जियो हजारो साल’ या चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतच राहिल्या.

      अभिनय व दिग्दर्शन याबरोबरच चित्रपटाची पटकथा लिहिण्याचे काम सध्या करत असलेल्या रेणुका, ‘हाच सूनबाईचा भाऊ’ या चित्रपटातून प्रथम मराठी चित्रपटरसिकांसमोर आल्या. ‘आपली माणसं’, ‘अबोली’, ‘अंतर’, ‘कथा दोन गणपतरावांची’, ‘रीटा’ हे त्यांचे मोजके आणि त्यांच्यातल्या कलाकाराची क्षमता दाखवणारे चित्रपट. ‘अबोली’ या चित्रपटासाठी रेणुका यांना १९९४ साली ‘फिल्मफेअर’चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

     रेणुका यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘रंगतरंग’ नावाच्या पुरवणीसाठी ‘विचारा ना प्रश्‍न’ हे सदर चालवले. ‘संडे-मिड डे’साठीदेखील त्यांनी ‘फ्लाईंग सोलो’ नावाचे सदर दीड वर्ष लिहिले. ‘आविष्कार’चे ‘यळकोट’, आंतरनाट्यसाठी ‘ऑथेल्लो’, थिएटर युनिटसाठी ‘संभोग से संन्यास तक’ ही रेणुका यांनी अभिनय केलेली नाटके. ‘यळकोट’ हे नाटक हिंदीत ‘प्रेमभंजन का अंजन’ म्हणून सादर झाले आणि ‘यळकोट’मधल्या भूमिकेसाठी त्यांना ‘नाट्यदर्पण’चा विशेष लक्षवेधी अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.

     रेणुका यांनी ‘सर्कस’, ‘लाईफलाईन’, ‘इम्तिहान’, ‘सैलाब’, ‘घुटन’, ‘९ मलबार हिल’, ‘जुनून’, ‘कोरा कागज’, ‘दाल मे काला’, ‘मिसेस माधुरी दीक्षित’, ‘खामोशियाँ कब तक’ या हिंदी आणि ‘दिनमान’ व ‘आरंभ’ या मराठी मालिका केल्या, गाजवल्या. ‘क्लोजअप अंताक्षरी’ हा अन्नू कपूर यांच्याबरोबर सूत्रसंचालन केलेला कार्यक्रम आणि त्यांच्या ‘खुल्या हास्या’मुळे सिद्धार्थ काक यांनी त्यांची निवड केलेली ‘सुरभि’ ही मालिका या दोन्हीही प्रेक्षकप्रिय ठरल्या.

     रेणुका यांनी प्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणा यांच्याशी लग्न केल्यानंतर अभिनयाला काही काळ थोडे बाजूला ठेवले. आज शौर्यमान आणि सत्येंद्र ही दोन मुले थोडी मोठी झाल्यावर त्या अभिनयक्षेत्राकडे पुन्हा परतत आहेत. सांदान इन्स्टिट्यूट आणि मुंबई मंत्रा यांच्यावतीने होणाऱ्या पटकथेच्या कार्यशाळेत ५०० स्क्रिप्टमधून आठ पटकथा निवडण्यात आल्या, त्यात रेणुका शहाणे यांची पटकथा आहे. त्या पटकथेवर ‘त्रिभंग’ नावाचा चित्रपट त्यांनी केला आहे. चित्रपटाच्या क्षेत्रात आपल्या वेगळ्या दृष्टीने नेहमीच वेगळे काही करणाऱ्या रेणुका अभिनय, दिग्दर्शन, लेखन यासह पटकथेच्या क्षेत्रात नवे काय करणार आहेत, याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आजही कायम आहे.

     - स्वाती प्रभुमिराशी

शहाणे, रेणुका विजय