Skip to main content
x

शहाणे, त्रिंबक गणपत

       त्रिंबक गणपत शहाणे यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील लोहगाव या गावी झाला. त्यांच्या गावात प्राथमिक सुविधाही उपलब्ध नव्हत्या. वडील शेतकरी असल्यामुळे लहानपणापासून त्यांना शेतीचे जवळून निरीक्षण करता आले. परंपरागत पद्धतीने शेती करताना आधुनिक ज्ञानाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे याची जाणीव असल्यामुळे शेतीविषयक शिक्षण घेऊन शेतकरी सुखी करायचा याच जिद्दीने कृषी शिक्षणास त्यांनी सुरुवात केली. १९६१मध्ये परभणी येथील कृषी विद्यापीठातून बी.एस्सी. (कृषी) पदवी, १९६९मध्ये नागपूर येथील कृषी विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र या विषयात  एम.एस्सी. (कृषी) या पदव्या संपादन केल्यानंतर १९८१मध्ये वनस्पतिशास्त्र याच विषयांतर्गत प्लँट ब्रीडिंग अँड जेनेटिक्स या विषयावर संशोधनात्मक प्रबंध सादर करून पीएच.डी. मिळवली. संशोधनात्मक कार्य हा एकच ध्यास असल्याने १९६१-७२ या संपूर्ण काळामध्ये परभणी येथे कृषी खात्यामध्ये कृषि-अधिकारी या पदावर त्यांनी संशोधनात्मक कार्य केले. पुढे १९७२-७९ या काळात कृषी विद्यापीठ, परभणी येथे साहाय्यक प्राध्यापक या पदावर अध्यापन व संशोधन कार्य केले. नंतर १९७९-९३ या काळात (निवृत्तीपर्यंत) परभणी येथील कृषी विद्यापीठातील बीजोत्पादन तंत्र या विभागात ते कार्यरत होते. त्यांनी १९६४मध्ये ज्वारीच्या नर/मादी वाणांचे मूलभूत व पायाभूत बियाणे तयार करून त्यापासून नवीन संकरित वाणांची निर्मिती केली व त्यांची उत्तम उत्पादन क्षमता सिद्ध करून दाखवली. त्यांनी या नवीन संकरित वाणांची शेतकऱ्यांना ओळख पटवून त्यांनी त्याखालील लागवड क्षेत्रामध्ये वाढ केली.

       शहाणे यांनी १९७७-८६ या काळात बीजोत्पादनतज्ज्ञ म्हणून काम करत असताना ज्वारी, बाजरी व कापूस यांच्या मूलभूत आणि प्रमाणित बीजोत्पादनाचा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. तसेच या काळात त्यांनी पिकाची काळजी घेण्याबाबत अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी १९८६-९१ या काळात बाजरी-पैदासकार या पदावर काम करताना ए-३ हे सायटोप्लाझमवर आधारित नवीन मादी वाण निर्माण केले, तसेच या वाणाची रोगप्रतिकारक क्षमता व लवकर तयार होणारे नर वाण सिद्ध करून दाखवले. त्याचप्रमाणे त्यांनी ८१ - अ या मादी वाणावर आधारित ए.एच.बी - २५१ (देवगिरी) हा नवीन संकरित वाण निर्माण केला व या वाणामुळे उत्पादनात ९% ते २२% भर पडली, केवडा रोगास हा वाण बळी पडत नाही हे सिद्ध केले.

डॉ. शहाणे यांचे २० संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत. तसेच आकाशवाणी केंद्र परभणी येथे अनेक शेतीविषयक परिसंवाद प्रसारित झाले आहेत.

- मिलिंद कृष्णाजी देवल

शहाणे, त्रिंबक गणपत