सहस्रबुद्धे, नीळकंठ रघुनाथ
‘लोकसत्ते’चे माजी संपादक माधवराव गडकरी यांनी ‘पार्ल्याचे वैभव’ म्हणून ज्यांचा गौरव केला, शिक्षणातील सरस-नीरस भाग दाखवून त्यातील समरसता कशी वाढवता येईल आणि नीरसता दूर कशी करता येईल हे कृतीने सिध्द करुन अनेक ‘यशवंत’ घडविणारे असे नीळकंठ रघुनाथ सहस्त्रबुध्दे असे हे शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकरांचे ‘अत्यंत कुशाग्र व कष्टाळू’ असे विद्यार्थी होते.
विलेपार्ले, मुंबई येथील पार्ले टिळक विद्यालयात १९५८ मध्ये शिक्षक म्हणून प्रवेश केलेले सहस्त्रबुध्दे १९७२ मध्ये मुख्याध्यापक झाले तेव्हा त्यांचे वय फक्त ३७-३८ होते. त्यांच्या वडिलांची रेल्वेच्या नोकरीत वरचेवर बदली होई. त्यामुळे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यात सोलापूरच्या हरीभाई देवकरण प्रशालेत वि. वि. चिपळूणकरांसारखे आदर्श शिक्षक लाभल्याने शिक्षक पेशाबद्दल आकर्षण उत्पन्न झाले व शिक्षण हाच त्यांचा ध्यास ठरला. आईच्या आग्रहामुळे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत रुईया महाविद्यालयात झाले आणि त्यांना प्रा. न. र. फाटक, राम जोशी, द. के. केळकर, विं दा करंदीकर, विठ्ठलराव कुलकर्णी इत्यादींचा सहवास लाभला.
भाऊराव पाटील यांच्या सातारा येथील बी.एड. महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. तेव्हा तेथे सर्वांत लहान वयाचे सहस्त्रबुद्धेच होते. बी.ए. ला सुध्दा एकच विशेष विषय न घेता चार सर्वसाधारण विषय घेणारे ते एकटेच होते. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश मिळविणारे हुशार विद्यार्थी व वर्गातील हुशार मेहनती विद्यार्थ्यांना निवडून सहस्त्रबुध्दे यांनी अधिक सराव, मेहनत करवून, परीक्षेचे तंत्र दाखवून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
१९७४ मध्येच त्यांच्या प्रयत्नांना यश आले व पुढे सातत्याने अधिकाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. राष्ट्रीय गुणवत्ता शोध परीक्षा उत्तीर्ण होण्यास त्यांनी मुलांंना उत्तेजन दिले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा चांगला फायदा मिळुन उच्च शिक्षणाचा आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत झाली. सहस्त्रबुद्धे यांनी आठवी, नववीच्या मुलांना बाँबे टॅलेंट सर्च परीक्षेला बसवले. त्यासाठी अभ्यासवर्ग, शिबिरांचे आयोजन केले. विज्ञान युगाचे आव्हान पेलण्यासाठी नववी पासूनच संगणक व (इलेक्ट्रॉनिक्स, विद्युतयांत्रिकी) या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केला. अनुभवसिध्द लेखन, उमलत्या पिढीच्या हिताची कळकळ, भरभक्कम तात्त्विक बैठक आणि नवनवीन वाटांचा शोध घेण्याची कल्पकदृष्टी असलेल्या सहस्त्रबुध्दे यांनी विद्यार्थी, सहकारी शिक्षक व कर्मचारी यांच्या गुणांचा शोध घेऊन त्यांना विकासाची संधी व प्रोत्साहन दिले. इतर शाळांच्या मुख्याध्यापकांना, शिक्षकांना व विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले व मदतीचा हात दिला; आपल्या देशातील शैक्षणिक धोरणातील व व्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवून विधायक दृष्टीने उपायही सुचविले. सहस्त्रबुध्दे यांनी ‘नवीन अभ्यासक्रमाची उद्दिष्टे-शोध आणि बोध’, ‘शालेय विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन - एक सर्वेक्षण’, ‘घरकाम करणाऱ्या नोकरांचे कौटुंबिक जीवन-एक अभ्यास’, ‘दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील यशाचा मागोवा’ या विषयांवर शैक्षणिक प्रकल्प सादर केले.
‘पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण’, ‘परीक्षा पध्दती’, ‘कॉपीसारखा ज्वलंत प्रश्न’, ‘शिक्षण संस्थांचा घसरणारा दर्जा’, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, शालान्त परीक्षेच्या प्रश्नपत्रिका इत्यादी बाबतीत जाणवणाऱ्या त्रुटी यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
सहस्त्रबुध्दे आपल्या लेखात म्हणतात, “लहान वयात शिकवण्याची भूमिका अतिशय महत्त्वाची असून शिक्षक कोणत्याही विषयाचा न असता विद्यार्थ्यांचा असला पाहिजे... विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलेतला वाव देता येईल असे शिक्षण शाळांमधून देणे जरुर आहे.”
दूरचित्रवाणी, ‘शिक्षण संक्रमण’ मासिक, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता इत्यादी माध्यमातून त्यांचे शिक्षणविषयक लेख समाजासमोर आले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा मंडळावर सल्लागार सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
तशीच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या कायदेमंडळावरही झाली. विशेष म्हणजे माध्यमिक शालान्त परीक्षा अभ्यास मंडळावर आणि मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीवर यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल राज्य शासनाने १९७७ मध्ये त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते. १९८२ मध्ये सेऊल (कोरिया) येथे जागतिक शिक्षण परिषदेला गेलेल्या भारतीय शिक्षण तज्ज्ञ मंडळात सहस्त्रबुद्धे यांचा समावेश होता. त्याचवेळी जपानला जाऊन तेथील पूर्व प्राथमिक ते महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या व्यवस्थेचा अभ्यास करुन ते आले.
चौफेर वाचन, सुस्पष्ट विचार, अनुभव सिध्द मते व उत्तम वक्तृत्व या यांच्या गुणामुळे ते शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत म्हणून महाराष्ट्रात परिचित झाले.