Skip to main content
x

सहस्रबुद्धे, रावसाहेब

सहस्रबुद्धे बाबा

     द्गुरू रामानंद बीडकर यांच्या स्वरूप संप्रदायाचा विस्तार करण्यासाठी स्वत: अक्कलकोट स्वामींनीच रावसाहेब सहस्रबुद्धे यांच्या रूपाने पुन्हा अवतार घेतला असे दत्त संप्रदायामध्ये विशेष आदराने मानले जाते. रावसाहेब तथा बाबामहाराज सहस्रबुद्धे यांचा जन्म हुबळी येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या परमपावन दिनी झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे अभियांत्रिकी खात्यात ओव्हरसियर होते. नोकरीनिमित्त ते कोकणातून हुबळीस आलेले होते. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील ‘कोतवडे’ हे होय. संतकवी दासगणू यांचेही मूळ गाव कोतवडेच होते.

रावसाहेब यांचे शिक्षण हुबळी, कुरुंदवाड आणि पुणे येथे झाले. ते १८९८ साली मॅट्रिक झाले आणि १९०४ साली ‘एल.सी.ई.’ पदवी घेऊन अभियंता झाले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी केली. ते १९२८ साली निवृत्त झाले व पुण्यात बीडकर महाराजांच्या मठाशेजारीच भिडेवाड्यात त्यांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते. इ.स. १९०२ मध्ये रावसाहेबांच्या वडिलांचे निधन झाले. ठाण्याला त्यांचे मोठे बंधू नोकरी करीत होते, त्यांनी रावसाहेबांचे शिक्षण पूर्ण केले.

१९०४ साली रावसाहेबांचे मातृछत्र हरपले आणि ते अशा उदास अवस्थेत संत रामानंद बीडकर यांच्याकडे विशेष आकर्षित झाले. अहमदाबाद येथील हंगामी नोकरीचा राजीनामा देऊन रावसाहेब १९०९ मध्ये पुण्यात आले. रावसाहेबांनी लग्न करावे म्हणून घरच्या मंडळींनी बीडकर महाराजांकडे आग्रह धरला. अखेर गुरु आज्ञा म्हणून १९१० साली रावसाहेबांचे पुण्याजवळील जुन्नरचे बोडस यांची कन्या दुर्गाबाई यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर पत्नीचे नाव सीता असे ठेवण्यात आले.

बीडकर महाराजांच्या कृपेनेच रावसाहेबांचा संसारही सफल-सुफल झाला. त्यांना एक कन्यारत्न होते. साधनाकाळातच एके दिवशी बीडकर महाराज रावसाहेबांच्या डोक्यावर हात ठेवून ‘मी तुला पर्मनंट केले आहे,’ असे म्हणाले आणि रावसाहेब देहभान हरपून समाधी अवस्थेतच गेले. येथून पुढे रावसाहेब, बीडकर महाराजांच्या शिष्यांपैकी प्रमुख शिष्य बनले. ‘रावसाहेब माझा मोतीदाणा आहे,’ असे बीडकर महाराज त्यांचे कौतुक करीत असत. साधनाकाळात काही वर्षे त्यांची अवस्था पाहून लोक त्यांना वेडे समजले आणि त्यांना चक्क वेड्यांच्या इस्पितळात दाखल केले. त्यांनी सुमारे एक वर्षभर इस्पितळात काळ कंठल्यानंतर २३ मार्च १९२७ रोजी त्यांना घरी आणले गेले. आपल्या विदेही अवस्थेतील पतीची सीताबाईंनी ईश्वरनिष्ठेने सेवा करून व त्यांना सांभाळून संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या स्वत: पुढाकार घेऊन पार पाडल्या. मुलगी चिमाताईचे लग्न त्यांनीच सर्वांच्या सहयोगाने करून दिले. दुर्गाताई यांचे १९४५ साली निधन झालेे व रावसाहेबांचा प्रपंच येथेच संपला. रावसाहेब खूप अबोल होते. त्यांना चर्चा-उपदेशपर भाषण याची आवड नव्हती. सहज संवाद हाच त्यांचा उपदेश असे. त्यांचा शिष्यपरिवारही मोठा आहे. डेरवण शिवसृष्टीकर्ते विठ्ठलराव जोशी तथा दिगंबरदास, नरहरीप्रभू काळे महाराज, भाऊसाहेब आंबेकर, रामभाऊ जोगळेकर हे त्यांचे प्रमुख शिष्य होत.

रावसाहेबांना तीर्थयात्रा करण्याची भारी आवड होती. आपले शिष्य आणि पत्नी दुर्गाताईसमवेत त्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. अयोध्येमध्ये शरयू नदीत जलसमाधी घेण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी शिष्यांना घेऊन ते अयोध्येस गेले; पण शरयू नदीत सर्वत्र केवळ गुडघाभर पाणी पाहून म्हणाले, ‘‘आपणांला इथे स्थान दिसत नाही, चला पुण्यालाच परत जाऊ.’’ पुण्यात परतल्यावर सुमारे वर्षभरानंतर श्रावण वद्य चतुर्थीला रावसाहेबांनी आपला देह गुरुस्मरण करीत ईश्वरचरणी अर्पण केला. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळ त्यांचे समाधी मंदिर आहे. अक्कलकोट स्वामीरूपात सर्वांना दर्शन देणारे साक्षात्कारी संत म्हणून रावसाहेबांचे स्मरण केले जाते.

विद्याधर ताठे

सहस्रबुद्धे, रावसाहेब