Skip to main content
x

शिखरे, दामोदर नरहर

     दामोदर नरहर शिखरे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे झाला. त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले. राष्ट्रप्रेम आणि समाजसुधारणाविषयक तळमळ, त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रकार्यास जोडलेले लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांचे संस्कार झाले. एम.ए. झाल्यानंतर त्यांनी वृत्तपत्रक्षेत्रात पत्रकार म्हणून काम केले. १९२९ साली ते ‘केसरी’त उपसंपादक झाले. ‘केसरी’चे धोरण गांधीविरोधी झाल्यानंतर त्यांनी ‘केसरी’चे काम सोडले. गांधीवादाचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी स्वतःचे ‘अग्रणी’ (१९३९) हे साप्ताहिक सुरू केले. कालांतराने (३ - ४ वर्षांत) ते बंद पडले.

      महात्मा गांधी आणि गांधीवाद हा त्यांच्या चिंतनाचा अन् लेखनाचा विषय होता. ‘गांधी जीवनकथा’ (१९४२), ‘गांधीचरित्र’ (१९४४) हे ग्रंथ लिहिताना स्वतःला माहीत झालेले सत्य सर्वांगांनी प्रकट व्हावे, अशी त्यांची भूमिका होती. गांधीजींना अहिंसेचा पाठ कसा मिळाला, त्यांनी पहिला यशस्वी सत्याग्रह कसा केला, दांडीयात्रेने राष्ट्राच्या आत्म्याला कशी हाक घातली, ऑगस्ट आंदोलनाचा ज्वालामुखी कसा भडकला इत्यादींचे चित्रण यात केले आहे.

      त्यांनी ‘गांधी रणगीता’, ‘महात्मा गांधी व त्यांचे सहकारी’ (१९६९), अशी अनेक पुस्तके लिहिली. गांधी वाङ्मय प्रकाशन समितीतर्फे गांधी वाङ्मयाच्या अनुवादाचे वीस खंड प्रकाशित झाले. ‘गांधी गौरव ग्रंथ’  (१९६९) हा एक महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी संपादित केला. ‘जातीय ऐक्य’ (१९६१), ‘अर्थकारण’ (१९६२) हे संपादन, अनुवादाचे कार्यही त्यांनी केले.

      राजकीय कादंबर्‍यांमध्ये शिखरे यांची ‘थोरली आई’ (१९३४) ही राजकीय कादंबरी या नात्याने थोर कलाकृती होती. थोरली आई म्हणजे आपली जन्मभूमी. तिच्या सेवेकरिता आपल्या ध्येयवादी प्राध्यापकाच्या मार्गदर्शनानुसार कौटुंबिक स्नेह आणि प्रणयीजनाच्या अनुरागाला बाजूला सारून या कादंबरीचा नायक तुरुंगवास पत्करतो. राजकीय आंदोलनाच्या आणि तुरुंगवासाच्या वर्णनात वास्तवतेची बूज राखण्यात लेखक शिखरे हे यशस्वी झाले आहेत.

      ग्रामोद्धाराशी संबंध असलेल्या विविध चळवळीचे चित्रण ‘आईची कृपा’ (१९३८) या कादंबरीत आहे. ‘देशाविषयीची तळमळ’ हा ‘क्रांतिकिरण’ (१९३१) या कथासंग्रहाचा विशेष विषय आहे. आधुनिक एकलव्याच्या ‘भावकथा’ (१९३३) यात त्यागबुद्धीने दुःख सहन करणार्‍या दुर्दैवी स्त्रियांचे करुणाजनक चित्रण आहे.

      ‘गंगेचे थेंब’ (१९४५), ‘टिळकांचे चरित्र’ (१९४१), ‘डॉ. राधाकृष्णन यांचे चरित्र’ (१९४२), ‘राष्ट्रमाता कस्तुरबा’ (१९४४), ‘आजकालचे साहित्यिक’ (१९३९) असे चरित्रपर ग्रंथ त्यांनी लिहिले. ‘१९३५ सालातील मराठी वाङ्मयाचे समालोचन’ त्यांनी १९३६ साली  ‘सह्याद्री’मध्ये लिहिले, तसेच ‘सर्वश्रेष्ठ हिंदुधर्म’ हा निबंध, ‘दिव्यभाव’ हे काव्य त्यांनी लिहिले. चरित्रात्मक ग्रंथात आगरकर (१९५०), नेहरू (१९५५), जमनालाल बजाज (१९५६) आदींची चरित्रे, कथा, कादंबर्‍या, नाटके अशी सुमारे १५० पुस्तके त्यांनी लिहिली व प्रकाशित झाली, त्यांत ‘डॉन क्विक्झोट’ (१९७४) हा अनुवाद, ‘हीच माझी कमाई (१९७४) हे आत्मचरित्र यांचाही समावेश आहे.

      ‘मराठीचे पंचप्राण’ या ग्रंथमालेतून शिखरे यांनी संतसाहित्यापासून १९५०पर्यंतच्या साहित्याचा सोप्या पद्धतीने करून दिलेला परिचय हा साहित्यविषयक अभ्यास करणार्‍यांसाठी महत्त्वाचा ऐतिहासिक ऐवज ठरणार आहे.

- डॉ. रजनी अपसिंगेकर

शिखरे, दामोदर नरहर