Skip to main content
x

शिंदे, वसंत शिवराम

    मकालीन पुरातत्त्वज्ञांमध्ये अग्रणी वसंत शिवराम शिंदे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मोरवणे या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण खेड तालुक्यात खोपी या गावी, तर पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथे झाले. सन १९७९मध्ये त्यांनी डेक्कन कॉलेजमधून प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व या विषयांत एम.ए. पदवी संपादन केली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुरातत्त्वज्ञ प्रा. म. के. ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सन १९८४मध्ये डॉक्टरेट संपादन केली. त्यांचा डॉक्टरेटसाठीच्या प्रबंधाचा विषय ‘अर्ली सेटलमेन्ट इन सेंट्रल तापी बेसीन’ हा होता. पोस्ट-डॉक्टरल संशोधन हे त्यांनी केंब्रिज विद्यापीठ व डेन्मार्कमध्ये राष्ट्रीय संग्रहालयात केले.

     डॉक्टरेटच्या प्रबंधाचे काम करत असतानाच वसंत शिंदे सन १९८२मध्ये संशोधन साहाय्यक या पदावर डेक्कन कॉलेजमध्ये रुजू झाले. त्यानंतर त्यांच्या पुरातत्त्वातील सातत्यपूर्ण कामांमुळे त्यांची संपूर्ण कारकिर्द डेक्कन कॉलेजमध्ये बहरत गेली. उत्खनन पर्यवेक्षक, प्रपाठक, प्राध्यापक व सहसंचालक असे क्रमाक्रमाने जात सन २०१४मध्ये प्रा. शिंदे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू झाले. ते १९९९-२००० च्या दरम्यान जपानच्या इंटरनॅशनल रिसर्च सेंटर फॉर जापानीज स्टडीज, क्योटो स्थित संस्थेमध्ये व्हीजिटिंग प्रोफेसर होते.

     प्रा. शिंदे यांनी गुजरात व हरियाणा या राज्यांमधील सिंधू संस्कृतीच्या अभ्यासात मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या पाद्री, फर्माना, गिरावड, मिताथल व राखीगढी या उत्खननांनी सिंधू संस्कृतीच्या आपल्या आकलनाला सर्वस्वी नवी दिशा दिली आहे. गुजरातमधील पाद्री येथील संशोधनामधे त्यांनी सिंधू संस्कृतीचा इ.स. पूर्व ४०० चा काळ प्रथमच प्रकाशात आणण्याचे महत्त्वाचे योदान आहे. याखेरीज राजस्थानात त्यांनी बालाथल व गिलुंड या ताम्रपाषाणयुगीन पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन केले. या ठिकाणी करण्यात आलेल्या संशोधनामुळे मध्य भारतातील आद्य शेतीचा उगम व विकास राजस्थानमध्ये झाला. त्याचा पुरावा प्रथमच प्रा. वसंत शिंदे यांनी शोधला. सध्या चालू असलेल्या हरियाणातील राखीगढी येथील संशोधनामुळे सिंधू संस्कृतीचे सगळ्यात मोठे शहर राखीगढी हेच होते हे सिद्ध केले आहे. तसेच या संशोधनामुळे सिंधू संस्कृतीचे लोक कोण होते, त्यांचे समकालीन तसेच अर्वाचित लोकांशी काय संबंध होते हे डी.एन.ए. संशोधनातून प्रकाशात आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. संशोधनानिमित्त त्यांनी जवळ जवळ सर्व जगभर प्रवास केला आहे.

     महाराष्ट्राच्या संदर्भात प्रा. शिंदे यांचे पुरातत्त्व क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांची या क्षेत्रातली जडणघडण इनामगाव या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ताम्रपाषाणयुगीन पुरातत्त्वीय स्थळाच्या उत्खननाच्या दरम्यान झाली. प्रा. म. के. ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या वाळकी व कवठे या ठिकाणच्या उत्खननात त्यांचा मोठा सहभाग होता. तसेच त्यांनी त्यांच्या इतर सहकार्‍यांबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सिद्धापूर व मुढवी आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे उत्खनन करून महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात मोलाची भर घातली आहे.

     प्रा. वसंत शिंदे यांची संशोधनावर आधारित नऊ पुस्तके आहेत व विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून दिडशेपेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांनी बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत.

     दक्षिण आशियातील पुरातत्त्व अभ्यासकांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून प्रा. वसंत शिंदे यांनी सोसायटी ऑफ साउथ एशियन आर्किओलॉजी या संस्थेची स्थापना केली. त्यांनी ३० विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे.

डॉ. प्रमोद जोगळेकर

शिंदे, वसंत शिवराम